अतिथी कट्टा

दिनांक : ०१-०२-२०१९

‌‌‌‌‌‌‌‌‘युथट्युब’द्वारे महिला सबलीकरणाचा संदेश…




‘गोड गुपित’, ‘ना.मुख्यमंत्री गणप्या गावडे’, ‘सुंदर माझं घर’यासारखे वेगळे चित्रपट देणाऱ्या प्रमोद प्रभुलकर यांनी आजवर दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांचे चांगलेच कौतुक झाले आहे. या चित्रपटांच्या यशानंतर ‘युथट्यूब’हा नवीन चित्रपट १ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यानिमित्तानं त्यांचं हे मनोगत.

——

कलेचे माध्यम कोणतेही असो नवीन, सर्जनशील विचारांची निर्मिती आणि त्याची देवाणघेवाण होणे गरजेचे असते. कलेच्या बाबतीत हे सातत्याने घडणे आवश्यक असते. नवनवीन कलाकार, दिग्दर्शक, तंत्रज्ञ घडत जातात तेव्हाच सर्जनशीलतेला वाव मिळत असतो. याच विचारसरणीतून आम्ही ‘मिरॅकल्स अॅक्टिंग अकॅडमी’ची स्थापना केली. अनेक उत्तम कलाकार मिरॅकल्स अक्टिंग अकॅडमी’ च्या माध्यामतून प्रकाशझोतात आले. त्यांना भक्कम पाठिंबा देण्याचं काम केले. ‘युथट्यूब’या नव्या चित्रपटातही ‘मिरॅकल्स अक्टिंग अकॅडमी’तील ३०० विद्यार्थी या सिनेमामध्ये झळकणार आहेत. एकाच अक्टिंग अकॅडमीच्या ३०० विद्यार्थ्यांनी एकाच सिनेमात काम करण्याची ही पहिलीच वेळ असून मनोरंजन सृष्टीच्या आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडले असावे.आजकाल फेसबुक, ट्विटर आणि व्हॉटस अॅप हे तर आपल्या कुटुंबाचे सदस्य झालेत. हल्ली आपण घरातल्यांसमोर किती व्यक्त होऊ माहित नाही पण सोशल मीडियावर प्रत्येकजण व्यक्त होतोच. सोशल मीडियाच्या आहारी जाऊन सद्सदविवेक बुद्धीचा विसर पडत कुटुंबातील संवाद हरवत चाललाय. हाच धागा पकडून ‘युथट्यूब’ चित्रपटाची कथा लिहिण्यात आली आहे.

तुम्ही विषयाशी प्रामाणिक राहून तुमचा चित्रपट करायला पाहिजे. तुम्हाला नेमका कसा चित्रपट करायचा आहे हे समजलं पाहिजे. तरच तुम्हाला चित्रपटाच्या माध्यामतून जो विषय प्रेक्षकांपर्यंत पोहचवायचा आहे तो सहजरीत्या पोहचवता येतो. ‘युथट्यूब’च्या निमित्ताने प्रेक्षकांना एक चांगली कलाकृती पाहिल्याचा आनंद मिळेल. समाजात स्त्रियांना दिली जाणारी हीन वागणूक, त्यांच्यासोबत केले जाणारे गैरव्यवहार ही विदारक परिस्थिती बघता ‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते’ या विधानासमोर प्रश्नचिन्ह उभे रहाते. घरात, कामाच्या ठिकाणी, प्रवासात, शाळेत प्रत्येक ठिकाणी महिलांना अनेकदा अपमानास्पद आणि घृणास्पद वागणुकीला सामोरे जावे लागते. याच परिस्थितीवर सडेतोड भाष्य या चित्रपटामधून करण्यात आलं आहे.

दिवसेंदिवस महिलांवर होणाऱ्या अत्याचारांचे प्रमाण कमालीचे वाढले आहे आणि त्या विरोधात महिलांनीच काहीतरी ठोस पावलं उचलायला हवी. महिला सबलीकरण हे केवळ बोलण्यापुरती मर्यादित न रहाता आचरणातही आणले गेले पाहिजे. जे हात लाटणं धरू शकतात तेच हात वेळ पडल्यास हातात शस्त्र ही घेऊ शकतात, गरज असते ती केवळ स्वतःतील आंतरिक शक्तीला जागं करण्याची. स्वसंरक्षणासाठी स्वतःला कणखर करण्याची. हाच संदेश देत, स्त्रियांकडे बघण्याच्या पारंपरिक दृष्टिकोनाला छेद देणारा हा चित्रपट आहे.

शिवानी बावकर, पूर्णिमा डे, शर्वरी गायकवाड, मृण्मयी कुलकर्णी, सिद्धांत धोत्रे, विनय रावल, रतीश आरोलकर, अनिकेत वाघ आदि कलाकारांसोबत मधुराणी प्रभुलकर यात पाहुण्या कलाकारांच्या भूमिकेत दिसणार आहे. संगीत व पार्श्वसंगीताची जबाबदारी पंकज पडघन यांनी सांभाळली आहे. मधुराणी प्रभुलकर, सायली केदार, शिल्पा देशपांडे यांनी लिहिलेल्या गीतांना सायली पंकज शिखा जैन, आर्या आंबेकर, सागर फडके यांनी स्वरबद्ध केले आहे. पुणे तसेच आसपासच्या परिसरामध्ये आम्ही हा चित्रपट चित्रीत केला आहे. ‘सुंदर माझं घर’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनानंतर मी बराच काळ ‘ब्रेक’ घेतला होता. त्यामागचं कारण म्हणजे माझ्या मुलीचा जन्म. तिला अधिक वेळ देता यावा यासाठी मी दिग्दर्शनापासून थोडा काळ लांब गेलो होतो. परंतु, आता पुन्हा एकदा नव्या जोमाने दिग्दर्शन करणार आहे. आणखी एका चित्रपटाची कथा तयार असून लवकरच आम्ही त्याच्या शूटिंगला सुरुवात करणार आहोत.

– प्रमोद प्रभुलकर

ठेवणीतले लेख

    आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा



    [recaptcha]

    काही निवडक प्रतिक्रिया:

    नरेंद्र चौधरी


    आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
    संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया