अतिथी कट्टा

दिनांक : ३०-१२-२०१७

‌‘ये रे ये रे पैसा’ म्हणजे चमचमीत मनोरंजन..‌मराठी चित्रपटसृष्टीसाठी गत वर्ष फारसं चांगलं गेलं नाही. मात्र २०१८ची सुरुवात ‘ये रे ये रे पैसा’ या बिगबजेट चित्रपटानं होते आहे. अमेय खोपकर यांची निर्मिती आणि संजय जाधव यांचं दिग्दर्शन असलेल्या या चित्रटात संजय नार्वेकर, मृणाल कुलकर्णी, उमेश कामत, तेजस्विनी पंडित अशी वेगळी ‘स्टारकास्ट’ पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाबद्दल चित्रपटामधील प्रमुख कलाकारांचं मनोगत. ‘झी टॉकीज’नं या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे.
———-

संजय नार्वेकर : संजय जाधवनं दिग्दर्शित केलेल्या ‘चेकमेट’ या पहिल्या चित्रपटामध्येही मी होतो. संजयची काम करण्याची पद्धत, त्याच्या चित्रपटाचं प्रेझेंटेशन खूप वेगळं असतं. हा दिग्दर्शक दर वेळी प्रेक्षकांना काही तरी नवीन देण्याचा प्रयत्न करीत असतो. त्यामुळे अशाप्रकारच्या दिग्दर्शकाच्या हाताखाली काम करताना आमच्यासारख्या कलाकारांना खूप काही शिकायला मिळतं. त्याच्याबरोबर काम करताना सतत ‘अलर्ट’ राहायला लागतं.

मृणाल कुलकर्णी : संजय जाधवबरोबर चित्रपट करण्याची खूप दिवसांपासूनची इच्छा होती. अमेय खोपकर या चित्रपटाचे निर्माते असल्यामुळे एक चांगला निर्माता आणि दिग्दर्शकाबरोबर काम करण्याची संधी मला मिळाली याचा विशेष आनंद आहे. या चित्रपटाची स्टारकास्ट खूप वेगळी आहे. संजय नार्वेकर, उमेश कामत, सिद्धार्थ जाधव आणि तेजस्विनी पंडित असे कलाकार माझ्यासोबत आहेत. आतापर्यंतच्या माझ्या बहुतेक सगळ्या भूमिका गंभीर पद्धतीच्या आहेत. प्रत्यक्ष आयुष्यात तशी मी नाही. त्यामुळे थोडी वेगळी भूमिका मला या चित्रपटानं साकारण्याची संधी दिलीय. या सगळ्या कलाकारांबरोबर मी पहिल्यांदाच काम केलं आणि त्यात खूप मजा आली.

उमेश कामत : संजय जाधव या ‘ठार’ वेड्या दिग्दर्शकानं आमच्यासारख्या ‘ठार’ वेड्या कलाकारांना एकत्र करून हा ‘ठार’ वेडा सिनेमा बनवला आहे. या चित्रपटाद्वारे त्यानं संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावण्याचा विडा उचलला आहे. त्यामुळे ५ जानेवारीपासून सर्वांनी ‌‘वेडे’ व्हायची तयारी ठेवायला हवी.

तेजस्विनी पंडित : संजय जाधव माझ्यासाठी केवळ दिग्दर्शक नाही तर तो माझ्या कुटुंबातीलच एक सदस्य आहे. संजय जाधव यांच्या चित्रपटात काम केलं की आपण मराठी चित्रपटसृष्टीचे एक भाग आहोत, असं वाटतं. संजय मूळचा सिनेमॅटोग्राफर आहे. त्यामुळे तो आपल्या कलाकारांना खूप चांगल्या पद्धतीनं ‘प्रेझेंट’ करतो. अशा दिग्दर्शकाच्या कोणत्याही कलाकृतीचा आपण एक भाग बनतो, हीच गोष्ट माझ्यासाठी महत्त्वाची आहे.

सिद्धार्थ जाधव : या चित्रपटाचा निर्माता अमेय खोपकर माझ्या आयुष्यात खूप महत्त्वाचा माणूस आहे. ‘रुपारेल’ कॉलेजमध्ये असल्यापासून त्यानं मला मदत केली आहे. अमेयदा आणि संजूदा यांच्या या ‘ड्रीम प्रोजेक्ट’मध्ये माझी निवड केल्याबद्दल मी खरं तर त्यांचे आभारच मानायला हवेत. या चित्रपटाच्या प्रोमोजवरून ती खूप धमाल आहे याची कल्पना येते. संजूदानं या चित्रपटात मला माझ्या झोनमध्ये बॅटिंग करायला दिली आहे, त्याचाही आनंद आहे.

मंगेश कुलकर्णी : नवीन वर्षाच्या सुरुवातीला एखादी चांगली कलाकृती सादर करण्याचा ट्रेंड ‘झी टॉकीज’नं सुरू केला. यापूर्वी आम्ही ‘नटरंग’, ‘टाइमपास’, ‘ती सध्या काय करते’ यासारखे यशस्वी चित्रपट दिले आणि आता आम्ही ‘ये रे ये रे पैसा’ हा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस आलोय. थाळीमध्ये वेगवेगळे पदार्थ असतील तरच ती चविष्ट होते. गोड, तिखटाप्रमाणे सोबत लोणच्याची फोडदेखील हवी. त्यामुळे मी या चित्रपटाचं वर्णन चमचमीत मनोरंजन असं करीन.

ठेवणीतले लेख

आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा[recaptcha]

काही निवडक प्रतिक्रिया:

रिशिकांत राऊत

पडद्या मागच्या कलावंतांची देखील चांगली माहिती देता याबद्दल अभिनंदन!
संदर्भ:- फेसबुक प्रतिक्रिया