अतिथी कट्टा

दिनांक : ०९-०३-२०१९

‌‌‌‌‌‌‌‌टॉर्चमन बनला सिनेमाचा नायक….




मराठीमध्ये अॅक्शनपट फारसे बनत नाहीत. जे बनतात त्यांचा तांत्रिक दर्जा फारसा चांगला नसतो. मात्र ‘रॉकी’ चित्रपट त्यास अपवाद ठरणार आहे. या चित्रपटाद्वारे संदीप साळवी रुपेरी पडद्यावर पदार्पण करतो आहे. विशेष गोष्ट म्हणजे चित्रपटामध्ये पदार्पण करण्यापूर्वी संदीप हा चेंबूरचा ‘अमर’ चित्रपटगृहामध्ये ‘टॉर्चमन’चं काम करीत होता. त्यानिमित्तानं त्याचं हे मनोगत.

——

अॅक्शनपट प्रेक्षकांना नेहमीच भुरळ घालत आले आहेत. धडाकेबाज अॅक्शनसीन आणि नायक नायिका यांच्यातील फुलणारं प्रेम आणि या प्रेमवीरांच्या कुटुंबामधील नाट्य अशा त्रिसूत्रीवर आधारलेला रोमँटिक आणि अॅक्शनचे परफेक्ट कॉम्बिनेशन असलेला ‘रॉकी’ हा मल्टीस्टारर चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाद्वारे मला पदार्पणाची संधी मिळाली आहे. या चित्रपटामध्ये मी ‘रॉकी’ नावाची व्यक्तिरेखा साकारली आहे. रॉकी आणि संजना यांच्यात प्रेमाचं नातं फुलत असताना अचानक काही अकल्पित घटनांना या दोघांना सामोर जावं लागतं. नैतिकतेचा बुरखा चढवून काही समाजकंटक या चुकीच्या गोष्टी घडवून आणत असतात. त्यांच्या या कृत्याविरोधात लढा देण्याचा प्रयत्न करणाऱ्या रॉकीचा आवाज दडपण्याचा प्रयत्न होत राहतो. त्याविरोधात लढण्याची धमक ‘रॉकी’ कशाप्रकारे आणतो याची चित्तथरारक कहाणी ‘रॉकी’ मध्ये पहायला मिळणार आहे. या चित्रपटामधून माझ्यासोबत अक्षया हिंदळकर ही नायिकाही पदार्पण करीत आहे. आमच्यासोबत अशोक शिंदे, प्रदीप वेलणकर, यतीन कार्येकर, क्रांती रेडकर, गणेश यादव, विनीत शर्मा, स्वप्नील राजशेखर, दीप्ती भागवत या कलाकारांच्या भूमिका आहेत. हिंदीतील अभिनेते राहुल देव ही या सिनेमाच्या माध्यमातून पहिल्यांदाच मराठीत काम करणार आहेत. असत्याविरुद्ध सत्याचा लढा, त्याला नायक-नायिकेच्या प्रेमाची फोडणी अशा मनोरंजनाचं संपूर्ण पॅकेज असलेल्या ‘रॉकी’ चित्रपटाचे अनेक विशेष पैलू आहेत. बागी-२ चित्रपटाचे सहाय्यक दिग्दर्शक ‘अदनान ए. शेख’ यांनी ‘रॉकी’ च्या निमित्ताने पहिल्यांदाच मराठी चित्रपटासाठी दिग्दर्शन केले आहे.

सर्वांत महत्त्वाचा पैलू म्हणजे अर्थातच या चित्रपटातील साहस दृश्यं! ‘रॉकी’ या अॅक्शनपॅक्ड चित्रपटासाठी बॉलिवूडच्या आघाडीच्या शमशेर खान, आनंद शेट्टी या अॅक्शन मास्टरनी चित्तथरारक अॅक्शन चित्रीत केली आहे. या चित्रपटाचे निर्माते प्रशांत त्रिपाठी, मनेश देसाई, नितीन शिलकर, हिमांशू अशर आहेत. सुनिता त्रिपाठी या कार्यकारी निर्मात्या आहेत. चित्रपटाची कथा-पटकथा दिग्दर्शन अदनान ए शेख यांचे आहे. चित्रपटाचे कथालेखन अदनान शेख यांनी केलं असून संवाद आदित्य हळबे यांचे राहुल राऊत, मंदार चोळकर, जय अत्रे, सचिन पथक, संदीप पाटील यांनी चित्रपटाची गीतं लिहिली असून समीर साप्तीस्कर, वासीम सदानी यांचे संगीत गीतांना लाभले आहे. आनंद शिंदे, अवधूत गुप्ते, स्वप्नील बांदोडकर, जावेद अली, पलक मुच्चल, गीत सागर, ज्योतिका टांगरी या हिंदी मराठी सिनेसृष्टीतल्या नामवंत गायकांनी गाण्यांना स्वरसाज चढवला आहे. ‘सळसळतं रक्त आणि अंगात रग, वाटेला गेलात याच्या तर बाजार उठलाच म्हणून समजा’ असा इशारा देणारं या चित्रपटाचं पोस्टरही प्रेक्षकांना खूप आवडलं.

आयुष्यात अनेक योगायोग होतात, अनेक अकल्पित गोष्टी घडत असतात. असाच एक योगायोग माझ्याबाबत घडला. थिएटरमध्ये चित्रपट बघायला येणाऱ्या प्रेक्षकाला अंधारात टॉर्चच्या उजेडात त्याच्या सीटपर्यंत पोहचवण्याचं काम मी अनेक वर्षं केलं आणि त्याच चित्रपटगृहातील रुपेरी पडद्यावर आता माझा चित्रपट लागला आहे. जगात दोन प्रकारची माणसं असतात. एक ते जी स्वतःची स्वप्न पूर्ण करण्यासाठी अखंड परिश्रम करतात आणि दुसरी ती जी स्वतःच्या स्वप्नांना बाजूला सारून आहे ती वाट चोखाळण्यात धन्यता मानतात. मी यातील पहिली वाट चोखाळली. या भूमिकेसाठी फिटनेसपासून ते अगदी लुकपर्यंत मी खूप मेहनत घेतली आहे. बेताच्या असणाऱ्या परिस्थितीचा बाऊ न करता आई-वडिलांनी मोठ्या कष्टाने मला वाढवलं आहे. मी देखील त्यांच्या मेहनतीची जाणीव ठेवत कष्ट करत राहिलो. २००३ मध्ये मी चेंबूरमधील ‘अमर’ थिएटरमध्ये ‘टॉर्चमन’ म्हणून काम करायचो. याच वेळी ‘पृथ्वी’ थिएटरमध्येही माझं काम सुरू होतं. या चित्रपटाचे दिग्दर्शक अदनान ए शेख याची व माझी ओळख होती. या चित्रपटासाठी त्यांनी मला विचारलं. रीतसर ऑडिशन देऊन माझी निवड करण्यात आली. या चित्रपटामधील अॅक्शन दृश्यं ही खूप विशेष आहेत. त्यासाठी मला तब्बल सहा महिने तयारी करावी लागली. माझ्यासाठी हे सारं स्वप्नवत होतं. पण आजवर प्रामाणिकपणे केलेल्या कामाचं फळ असून रुपेरी पडद्यावर आज स्वत:ला पाहताना त्या कष्टाचं चीज झाल्यासारखं वाटतंय. दोन वर्षांपूर्वी या चित्रपटाचा माझा प्रवास सुरू झाला. अॅक्शन फिल्म असल्यामुळे त्याच्या तयारीसाठी खूप वेळ द्यावा लागला.

– संदीप साळवी

ठेवणीतले लेख

    आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा



    [recaptcha]

    काही निवडक प्रतिक्रिया:

    नरेंद्र चौधरी


    आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
    संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया