अतिथी कट्टा

दिनांक : २८-०५-२०१८

‌आज स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची १३५ वी जयंती.

जन्मदिवस :- स्वतंत्रवीर सावरकर

तात्याराव सावरकर ह्यांनी मराठी चित्रपट सृष्टीला अतिशय अनमोल मदत केली आहे.

——

साधारण १९३६ साल असावं सावरकर कोल्हापूरला आले होते, त्या वेळी ‘हंस चित्र’ चे छाया या चित्रपटाचे चित्रीकरण दिग्दर्शक मा. विनायक कोल्हापूरामध्ये स्टुडिओत करत होते.

मा. विनायकांना तात्याराव सावरकरांबद्दल आत्यंतीक आदर, प्रेम होते. साहाजिकच मा. विनायक आणि ‘हंस चित्र’ च्या पालकांनी तात्यारावांना स्टुडिओत येण्याचे आमंत्रण दिले, त्याचा मान राखून तात्याराव स्टुडिओत आले. त्या दिवशी काय घडल याचा संपूर्ण वृत्तांत श्री. भालजी पेंढारकर यांचे सुपुत्र श्री. प्रभाकर पेंढारकरांनी ‘एका स्टुडिओचे आत्मवृत्त’ या आपल्या पुस्तकात दिला आहे.

तो खालील प्रमाणे. कोल्हापूर सिनेटोनमधील ‘हंस’ च्या वास्तव्यात दोन घटना माझ्या कायमच्या लक्षात राहतील अशा घडल्या.

एक दिवस सकाळी इथं एक अत्यंत तेजस्वी व्यक्तिमत्वाची व्यक्ती बाबुराव पेंढारकरांच्या बरोबर आली. विनायक, दादा साळवी, दामुअण्णा, विष्णुपंत जोग आणि हंसचे सर्वच त्यांच्या स्वागतासाठी पुढे आले. सर्वांच्या मुद्रेवर कमालीचा आदर दिसत होता. ही व्यक्ती स्वातंत्रवीर सावरकर. बाबुराव पेंढारकरांनी सर्वांची ओळख करून दिली आणि त्यांना कंपनी दाखविण्यासाठी ते घेऊन निघाले.

सिनेमा निर्मितीचे हे केंद्र. साहजिकच इथं आकर्षक व्यक्तिमत्वाची अनेक माणसं मी पहिली आहेत. पण हे गृहस्थ म्हणजे चैतन्यच ! त्यांचं बोलणं अत्यंत मोजकं. चालता चालता ते आजूबाजूला पाहत. बाबुरावांना इथं काय चालतं म्हणून विचारून घेत. थोड्या वेळात त्यांनी स्टुडिओची सगळी माहिती करून घेतली. त्यांनी ह्यापूर्वी स्टुडिओ पाहिला नसावा. पण त्यांची तीक्ष्ण नजर सगळ्याचा वेध घेत होती. स्टुडिओ पाहून झाल्यावर त्यांच्यासाठी चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला होता. चहा घेता घेता त्यांनी विचारलं. “स्टुडिओ चांगला आहे. पण एक गोष्ट मला खटकली. सगळ्या विभागावर त्यांच्या कामाच्या पाट्या इंग्रजी भाषेत आहेत.”

बाबुराव म्हणाले, “ही कलाच पाश्र्चात्य. येथली सगळी मशिनरी परदेशातून आयात केलेली…. ”

“त्यात काय झालं? आता ती इथं आलेली आहे आणि तुम्ही जी चित्रनिर्मिती करता ती मराठी आणि हिंदीमधेच ना ! इथं येणारे लोकही ह्या देशाचेच ना ! मग ह्या पाट्या आपल्या भाषेत का नसाव्यात ?” प्रश्न निरुत्तर करणारा होता.

विनायकराव म्हणाले, “मराठीत योग्य शब्द शोधावे लागतील?”

“कशाला, मी सांगतो. लिहून घ्या…. !”

आणि सावरकरांनी एकेक शब्द सांगायला सुरुवात केली.

“स्टुडिओ किंवा सिनेटोनला कलामंदिर म्हणता येईल. हंस पिक्चर्स ऐवजी हंस चित्र, शूटिंगला ‘चित्रण’ हा सोपा शब्द मराठीत आहे.”

सगळे ऐकत राहिले.. हे सगळं फार सोपं वाटू लागलं. “पण स्टुडिओच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटना अशी नावे देता येतील का ?”

सावरकरांनी किंचितसं स्मित केलं आणि ते सांगू लागले. डायरेक्टरचा दिग्दर्शक झाला तर डायरेक्शन डिपार्टमेंटचा दिग्दर्शन विभाग होतो. रेकॉर्डिंग डिपार्टमेंट – ध्वनिमुद्रण विभाग, फोटोग्राफी – छायाचित्रण, एडिटिंग – संकलन, मेकअप – रंगपट, लॅबोरेटरी – रसायनशाळा.

स्वातंत्रवीर पटापट सांगत होते. दिग्दर्शन विभागाचे दिनकर पाटील तेथे होते, ते पटापट लिहून घेत होते. बुद्धी किती प्रभावी असते ! सावरकरांना कोठेही क्षणाचाही विचार करण्यासाठी थांबावे लागले नाही. कोठेही त्यांना शब्द अडले नाहीत. स्मरणशक्ती अशी की पाहिलेली सर्व खाती त्यांच्या मनाने नोंद करून घेतलेली. सगळ्या खात्यांची नावे सांगून झाल्यावर ते म्हणाले, “ह्या सर्वामध्ये काही अवघड, न समजण्यायोगे आहे का ? नाही ना, मग आजपासूनच हे शब्द वापरायला सुरुवात करा. हा इंग्रज प्रथम आपल्या मनातून गेला पाहिजे. भाषेतून, विचारातून गेला पाहिजे… मग एक दिवस तो आपल्या देशातूनही जाईल. ”

माझ्या मनात आलं, कधीतरी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळेल, तेंव्हा ह्या माणसाच्या जीवनावर फिल्म तयार झाली पाहिजे. आणि ते देशभक्तीचे, त्यागाचे , धैर्याचे संस्कार ह्या देशातल्या सर्वांवर झाले पाहिजेत. फिल्म निर्मितीचं ते एक अत्यंत महत्वाचं उद्दिष्ट असावं !

ठेवणीतले लेख

आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा[recaptcha]

काही निवडक प्रतिक्रिया:

रिशिकांत राऊत

पडद्या मागच्या कलावंतांची देखील चांगली माहिती देता याबद्दल अभिनंदन!
संदर्भ:- फेसबुक प्रतिक्रिया