अतिथी कट्टा

दिनांक : २२-०५-२०१८

‌मेरी आवाज ही पेहचान है …

चित्रपट, नाटक, नृत्यनाटिका, सांगीतिका, मालिका अशा विविध प्रांतात संगीतकार म्हणून आनंद मोडक यांनी काम केलं. गेल्या चार दशकांमध्ये त्यांनी वेगळ्या धाटणीच्या चाळीसहून अधिक चित्रपटांना संगीत दिलं. ‘कळत नकळत’, ‘चौकट राजा’, ‘एक होता विदूषक’, ‘मुक्ता’, ‘तू तिथं मी’, ‘सरकारनामा’ हे त्यांचे उल्लेखनीय चित्रपट. कलाक्षेत्रामधील वावर, आपल्या वेळचा काळ, त्यादरम्यान भेटलेली माणसं आणि त्यांच्या अनुभवावर आधारलेलं लेखन मोडक यांनी २०१५ मध्ये ‘मनोविकास प्रकाशन’तर्फे प्रकाशित झालेल्या पुस्तकाद्वारे केलं होतं. या पुस्तकामधील हा संपादित भाग.
——

माणसाची ओळख ही त्याच्या सगुण साकार दिसण्यातून जशी होते, तशीच ती त्याच्या देहबोलीतूनही होत असते. याखेरीज आणखी एक विशेष ओळख होते ती त्याच्या बोलणाऱ्या आवाजातून. प्रत्येकाचा आवाजदेखील त्याची एकप्रकारे ओळखच असते. तान्हं बाळसुद्धा आईच्या स्पर्शासारखाच तिचा आवाजही लगेच ओळखतं आणि वाढत्या वयाबरोबर आवाजांच्या जाती आणि पोतांसह आपल्या स्मरणात भोवतालच्या नाना व्यक्तींची ओळख ठसत असते, नोंदली जात असते. मग तो आजीचा वृद्ध, कापरा, पण मायाळू स्वर असो, की चिमुकल्याचे कोवळे, लाघवी आणि लडिवाळ बोल असोत; पोलिसात किंवा लष्करात असलेल्या कुण्या काकांचा हुकमी, करडा आवाज असो, नाही तर शेतावरच्या कुण्या बजाबाचा टिपेतला रांगडा संवाद असो !

मंजुळ, भरदार खर्जातला, तारस्वरातला, किनरा, शुष्क – कोरडा, भावविहीन सानुनासिक, संमोहन घालणारा, कोता, स्नेहमयी, घोगरा, कुजबुजता, कर्कश, भरड, खरखरीत, स्निग्ध… आवाजाच्या अशा किती किती तऱ्हा असतात आणि एखादी व्यक्ती बोलताना शब्दांच्या उच्चारित रुपानुसार तसेच बोलणाऱ्याच्या लकबींसह स्वरांच्या अनुरूप चढ-उतारातून सिद्ध होणाऱ्या शब्दोच्चारांतून त्यामधल्या तिच्या भावना व्यक्त होत असतात आणि समोरच्या श्रोत्याच्या ग्रहणशक्तीनुसार त्या-त्या प्रमाणात पोहोचतही असतात. माणूस सर्वसाधारणपणे बोलत असताना तीन ते चार सुरांच्या रेंजमध्ये बोलत असतो. उत्तेजित झाल्यास अगर आवश्यकता पडल्यास तार सप्तकातल्या स्वरांचाही प्रयोग करतो किंवा चोरट्या आवाजात बोलताना खर्जातल्या कुजबुजत्या स्वरांचा वापर करतो.

माझ्या एका मित्राची आई स्वभावानं अतिशय प्रेमळ, ममताळू, केवळ स्वतःचे कुटुंबीयच नव्हे, तर आम्हा सर्व मित्रमंडळींचं त्यांना फार कौतुक. त्यांच्या प्रेमळ, लाघवी बोलण्या-वागण्यातून ते सर्वांना सतत जाणवे. दुर्दैवाने त्यांना घशाचा कर्करोग झाला आणि त्यांचं स्वरयंत्र काढावं लागलं. त्यांना बोलता यावं म्हणून एक यंत्र बसवलं गेलं. त्याद्वारे त्या सरावानं बोलू लागल्या. फक्त त्या यंत्राच्या मदतीनं होणारं त्यांचं बोलणं हे रोबोसारखं यांत्रिक, एकसुरी होतं. त्यात आवाजाचे आणि त्यातले स्वरांचे चढउतार नव्हते. त्याची उणीव ती माउली आपल्या मायाळू स्पर्शातून, डोळ्यांतून भरून काढत होती.
सुरुवातीचे काही क्षण मला गलबलायला झालं, पण पुढे ते सहजपणे वजा होऊन आमचा संवाद पूर्वीसारखाच स्नेहपूर्ण होत राहिला. पण कधीतरी वाटून गेलं, की देवानं दिलेल्या विविध इंद्रियांचं मोल माणसाला ती कार्यरत असेपर्यंत जाणवत नाही. एखाद निरुपयोगी होता त्याची खरी किंमत कळते.

हे झालं रोजच्या जगण्यातल्या वाचिक व्यवहारांविषयी. कलेच्या क्षेत्रात गद्य अगर पद्य, म्हणजे गद्य संवाद म्हणताना अगर गाणं गाताना ह्या वैविध्यपूर्ण आवाजनामक शक्तीचा करिष्मा हा खरोखरच अद्भुत आहे. आमच्या मराठी रंगभूमीवर नटश्रेष्ठ गणपतराव बोडसांपासून नानासाहेब फाटक, केशवराव दाते, मास्टर दत्ताराम यांच्यापासून ते डॉक्टर श्रीराम लागू, सतीश दुभाषी, नाना पाटेकरपर्यंत अनेकानेक जबरदस्त अभिनेत्यांनी नाटकातली व्यक्तिरेखा साकारताना कायिक अभिनयाला आपल्या विलक्षण आवाजाच्या जोरावर प्रभावी वाचिक अभिनयाची जोड देत प्रेक्षकांना अविस्मरणीय नाट्यानुभव दिला.

हिंदी चित्रपटांमध्ये तर दिलीप कुमार, अमिताभ बच्चन, बलराज सहानी, संजीवकुमार, मोतीलाल, अमरीश पुरी, नसिरुद्दीन शाहसारख्या अभिनेत्यांनी कायिक अभिनयाबरोबरच त्यांच्या आवाजाच्या वैशिष्ट्यांचा प्रभावी प्रयोग करत वाचिक अभिनयाची जोड देऊन साकारलेल्या व्यक्तिरेखा अजरामर केल्यात. अमरीश पुरी या मूळच्या रंगभूमीवरून आलेल्या अभिनेत्याच्या आवाजातला अद्भुत खर्ज किंवा अमिताभ बच्चनच्या आवाजातली जादू गेली चाळीसहून अधिक वर्षं आपण सर्व अनुभवतोय, नव्हे त्यानं मंत्रमुग्ध झालोय. कंठसंगीताच्या क्षेत्रात अभिजन संगीतापासून म्हणजे अभिजात शास्त्रीय संगीतापासून ते जानपद संगीतापर्यंत, आवाजांच्या पोत आणि जातीबरोबरच आवाजाच्या लगावांमध्येही प्रचंड वैविध्य आढळून येतं. भारतातल्या विविध भाषावार, प्रांतवार संस्कृतीतून आलेल्या कलाकारांच्या गायनातील वेगवेगळे रंग, विविध शैली या तर मनभावन आहेतच; पण एरवी शास्त्रीय संगीतसाधकांनाही अवघड वाटणाऱ्या श्रुतीच्या – त्यांच्या लोकसंगीत गायनात सहजभावानं होणारा प्रयोगही विस्मयकारक आहे.

आपल्याकडे महाराष्ट्रात शाहीर अमर शेख, पिराजीराव सरनाईक, तुकडोजी महाराज, शाहीर साबळे, शाहीर विठ्ठल उमप यांच्या ध्वनिमुद्रिका ऐकताना याचा प्रत्यय येतो. ‘गं साजणीss ‘हे ‘‌पिंजरा’ चित्रपटातलं गाणं गाणारा वाघमारे किंवा ‘नदीच्या पल्याड… आईचा डोंगरss’ हे ‘जोगवा’ चित्रपटातलं गाणं गाणारा आजचा लोकप्रिय गायक – संगीतकार अजय, यांच्या आवाजतलं उट्टं हे कुठल्याही प्रशिक्षणातून आलं नसून, मराठी मातीतल्या लोकस्वाराचा तो प्राणातून उमललेला नैसर्गिकच आविष्कार आहे. लावण्यांच्या ध्वनिमुद्रिका ऐकायला गेलात तर सुलोचना चव्हाण आणि रोशन सातारकर यांच्या आवाजातलं तेच उट्टं – त्याच गावरान मराठी मातीचा सुगंध तुम्हाला भूलवेल. आवाजातला खुलेपणा, सुरेलता, उत्कट गायनातून श्रोत्यांच्या हृदयाला भिडणारा भावाविष्कार यामुळे ह्या लोकस्वरांनी रसिकांच्या मनात आपली अशी खास जागा निर्माण केली.

अभिजात शास्त्रीय कंठसंगीतातील आग्रा, ग्वाल्हेर, जयपूर आणि किराणा या प्रमुख घराण्यांच्या गायनशिलीमध्ये स्वरांचा लगाव करण्याच्या आपापल्या पद्धती आहेत ; परंतु काही वेळा गुरूकडून विद्या संपादताना त्यांच्या आंधळ्या अनुकर्णात धन्यता मानणाऱ्या शिष्यांकडून गुरूंचा शास्त्रीय गायनातल्या पेशकारीचा दृष्टिकोन, त्यामागचा त्यांचा सखोल विचार, यांचा अभ्यास करायचा राहून गेला आणि गुरूंच्या भ्रष्ट नकला करण्यात उमेद सरली. पण बडे गुलाम अली खॉं साहेबांचा लोचदार, मधुर आणि पर्यासारखा अनिर्बंधपणे फिरणारा मुलायम स्वर, अमीर खॉं साहेबांचा अद्भुत स्वरयुक्त स्वर, डी. व्ही. पलुस्करांचा गंगाजळासारखा पवित्र स्वर, भारतरत्न भीमसेन जोशी यांचा भरदार, कसदार आणि मंत्रमुग्ध करणारा स्वर, हिराबाई बडोदेकरांचा शालीन स्वर, कुमार गंधर्वांच्या मधुर गळ्यातला काळजाचा ठाव घेणारा भाववाही स्वर, गंगूबाई हनगल यांचा बुलंद स्वर… किती किती श्रेष्ठींची नावं घ्यावीत … उल्लेख करायला सबंध लेखही पुरणार नाही.

मराठी संगीत रंगभूमीवर बालगंधर्व, मास्टर दीनानाथ, छोटा गंधर्व, राम मराठे, मास्टर कृष्णराव, वसंतराव देशपांडे, सुरेश हळदणकर,
प्रसाद सावकार, भालचंद्र पेंढारकर, जितेंद्र अभिषेकी, रामदास कामत यांसारखे एकाहून एक गायक आणि ज्योत्स्ना भोळे, जयमालाबाई शिलेदार, कीर्ती शिलेदार, ज्योत्स्ना मोहिले, फैय्याज, बकुल पंडित, कान्होपात्रा किणीकर, मधुवंती दांडेकर यांसारख्या गायिकांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण आवाजातून जी नाट्यगीत – शिल्पं साकारली, त्यात प्रत्येकाच्या गळ्याची स्वतंत्र जात आणि त्याचा रसपरिपोषक आविष्कार करताना केलेला डोळस वापर, यामुळे त्यांची गाणी रसिकांच्या मर्मबंधातली ठेव होऊन गेली आहेत.

मराठी चित्रपट संगीतात सुरुवातीच्या, प्रभातकाळातल्या विष्णुपंत पागनीस, राम मराठे, गोविंदराव टेंबे, शांता आपटे, शांता हुबळीकर या गायक, गायिका, अभिनेत्यांपासून पंडितराव नगरकर,वसंतराव देशपांडे, भीमसेन जोशी, सुधीर फडके, बाळकराम, छोटा गंधर्व, विठ्ठल शिंदे, गजानन वाटवे, जितेंद्र अभिषेकी, हृदयनाथ मंगेशकर, अरुण दाते, जयवंत कुलकर्णी, मन्ना डे, हेमंतकुमार, तलत मेहमूद महेंद्र कपूर, रवींद्र साठे, सुरेश वाडकर, स्वप्नील बांदोडकर, अजय गोगावले, आनंद शिंदे, अवधूत गुप्ते यांसारखे अनेकानेक गायक ; तर ललिता देऊळकर, माणिक वर्मा, मधुबाला जव्हेरी, लता मंगेशकर, आशा भोसले, सुमन कल्याणपूर, सुलोचना चव्हाण, उषा मंगेशकर, मीना मंगेशकर, कृष्णा कल्ले, शोभा गुर्टू, अनुराधा पौडवाल, उत्तर केळकर, अनुपमा देशपांडे, ज्योत्स्ना हर्डीकर, देवकी पंडित, कविता कृष्णमूर्ती, जयश्री शिवराम, रंजना जोगळेकर, साधना सरगम, बेला शेंडे, उर्मिला धनगर, विभावरी आपटे या गायिकांपर्यंत प्रत्येकानं आपल्या स्वरसामर्थ्यानं रुपेरी पडद्यावर साकारलेल्या गाण्यात प्राण फुंकले.
आवाजांच्या पोतांच्या आणि जातीच्या संदर्भात मला प्रकर्षानं जाणवलेली एक गोष्ट म्हणजे आवाजातली सानुनासिकता, ज्याला गाण्यातले जाणकार ‘नक्की ‘ (म्हणजे इंग्रजीत ज्याला ‘नेझल’ असा प्रतिशब्द आहे. ) असं म्हणतात ती, आवाजच खास वैशिष्ट्य मानलं जातं. आपण जरा विचार केलात तर नक्की ज्या ज्या गायक, गायिकांना लाभली त्याचं गाणं सदैव रसिकप्रिय झालं. यादीच पाहा ना – स्वर्गीय कुंदनलाल सैगल, मुकेश, हेमंतकुमार, शमशाद बेगम, नूरजहान,सुरैया, बेगम अख्तर, माणिक वर्मा, कविता कृष्णमूर्ती, पाकिस्तानी गायिका – अभिनेत्री सलमा आगा किंवा बांगलादेशी गायिका रुना लैला. त्यांच्या इतर गायनवैशिष्ट्यांबरोबरही नक्की त्यांच्या गायनाला चार चॉंद लावून गेली. जास्तीची गुणवत्ता ठरली.

शास्त्रीय संगीतात डी. व्ही. पलुस्कर, मल्लिकार्जुन मन्सूर, वसंतराव देशपांडे ; तर मराठी भावसंगीतात गजाननराव वाटवे, माणिक वर्मा, कुंदा बोकील. एवढंच काय, पण मुंबई आकाशवाणी केंद्राच्या निवेदिका करुणा देव (नीलम प्रभू ), बिनाका गीतमालाचे विख्यात श्री. अमीन सयानी आणि दूरदर्शनवर गाजलेल्या तबस्सुम या गेल्या जमान्यातल्या लोकप्रिय निवेदकांसह अगदी आता कुठल्याशा रेडिओ चॅनलची अत्यंत लोकप्रिय असलेली रेडिओ जॉकी शोनाली – ह्या साऱ्यांच्या आवाजातली खासियत म्हणजे ‘नक्की ‘. या सानुनासिकतेनं आवाजाला एकप्रकारची स्निग्धता येते, ओलावा येतो आणि रसिक श्रोत्याच्या हृदयाला तो आपला वाटतो. माझा एक मित्र गमतीनं म्हणतोच, की मुकेशजींचं गाणं सर्वांना का आवडतं ? तर, थोडं नाकात गायलं, की त्याला आपण हुबेहूब मुकेशजींसारखं गातोय असं वाटू लागतं. आणि तो खुश होतो. अर्थात, गमतीचा भाग सोडा ; पण मुकेशजींच्या स्वरातलं भिजलेपण, सच्चेपण आणि सादगी हे ‘ह्या हृदयीचं त्या हृदयी’ पोहोचवणार आहे.

भारतीय चित्रपटगीतांचा चाहता माझा एक विदेशी मित्र त्याच्या देशातील माझ्या वास्तव्यात माझ्याशी चर्चा करताना म्हणाला, “तुम्ही भारतीय तेच तेच गायक – गायिका वर्षानुवर्ष कसे काय ऐकू शकता ? आणि त्यांचा तुम्हाला कंटाळा कसा येत नाही ? आमच्याकडे फार तर चार-पाच वर्ष आम्हाला एखादा गायक-गायिका आवडू शकते. त्यानंतर आम्ही नव्याकडे वळतो.” त्यावर मी त्याला म्हणालो, ” आम्हा भारतीयांच्या थोर भाग्यानं आम्हाला कुंदनलाल सैगल, लता मंगेशकर, आशा भोसले, गीता दत्त, शमशाद बेगम, सुमन कल्याणपूर, मोहम्मद रफी, किशोर कुमार, मन्ना डे, मुकेश, तलत मेहमूद यांसारखी स्वररत्नं लाभली आणि त्यांच्या अमृतस्वरांचे नवनवे उन्मेष प्रतिभावंत संगीतकारांच्या पिढ्यांमागून पिढ्यांनी दशकांमागून दशके सादर करून रसिकांच्या मनांवर अनभिषिक्त राज्य केलं.

खरोखरच अर्ध्या शतकाच्या काळात एवढ्या प्रतिभावंत कलाकारांची मांदियाळी जमणं आणि त्यांचा उत्तुंग कलाविष्कार आपल्या सर्वांच्या वाट्याला येणं, ही मला परम भाग्याची गोष्ट वाटते. खरं तर भोवतालच्या सर्वस्वी भ्रष्टतेनं, विकृतीनं, सर्व तऱ्हेच्या प्रदूषणानं, पिळवणुकीनं, महागाईनं गांजलेल्या तुम्हा-आम्हा सर्वांना जगण्याचं प्रयोजन आणि बळ देतात ते या भूगंधर्व – किन्नरींचे अमृतस्वरच !


संदर्भ :- पुस्तक ‘स्मरणस्वर’
लेखक :- आनंद मोडक

ठेवणीतले लेख

    आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा



    [recaptcha]

    काही निवडक प्रतिक्रिया:

    नरेंद्र चौधरी


    आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
    संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया