अतिथी कट्टा

दिनांक : ११-१२-२०१८

‌‌‌‌‌‌‌‌‘माऊली’चा अॅटिट्यूड वेगळाच
‘लय भारी’च्या दणदणीत यशानंतर तब्बल चार वर्षांनी रितेश देशमुख ‘माऊली’ चित्रपट घेऊन प्रेक्षकांसमोर येतोय. या चित्रपटाच्या प्रदर्शनानिमित्तानं रितेश आणि या चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांचं हे मनोगत.

——

रितेश देशमुख : ‘लय भारी’ केल्यानंतर लगेचच आम्हाला ‘माऊली’ चित्रपट करायचा होता. त्यासाठी आम्ही एक ‘स्क्रीप्ट’ही तयार केली होती. परंतु, ती वाचल्यानंतर मला फारशी आवडली नाही आणि त्यानंतर मग मी इतर कामांमध्ये व्यग्र झालो. अखेर गेल्या वर्षी पुन्हा एकदा ‘माऊली’ची नवीन स्क्रीप्ट माझ्याकडे आली. ती मला आवडली नि अवघ्या आठ महिन्यांमध्ये आम्ही शूटिंग आणि त्यानंतरचे सोपस्कार पूर्ण करून प्रेक्षकांच्या भेटीस आलो आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं मी पहिल्यांदाच एखाद्या चित्रपटामध्ये पोलिस व्यक्तिरेखा साकारीत आहेत. काहींना या चित्रपटाचा प्रोमो किंवा ट्रेलर पाहिल्यानंतर रोहित शेट्टींच्या ‘सिंघम’ची आठवण आली असेल. काहींना ‘दबंग’ही आठवला असेल. परंतु, खरं सांगायचं तर या चित्रपटामधील माझा पोलिसाचा रोल हा इतरांपेक्षा खूप वेगळा आहे. तो आपल्या मातीमधील आहे. त्याचा एक वेगळाच अॅटिट्यूड आहे. तो भरपूर ‘डायलॉगबाजी’ करतो. तो कोणालाही घाबरत नाही. त्यानं स्वत:चं असं एक दहशतीचं वातावरण तयार केलेलं आहे. चित्रपटामध्ये तो गावाच्या मदतीला धावून जाताना पाहायला मिळतो. मी नेहमीच भूमिकेचा पोत पाहून तिच्याकडे अॅप्रोच होतो. त्यानंतर दिग्दर्शकाला माझ्याकडून नेमकं काय अपेक्षित आहे, हे जाणून घेऊन मी काम करतो.

मला नेहमीच मराठी चित्रपटाशी आपलं नाव जोडून घ्यायला आवडतं. ‘श्वास’, ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ चित्रपटापासून आपला चित्रपट बदलला. त्यानंतर ‘बालक पालक’ चित्रपटानं प्रेक्षकांना चित्रपटगृहात येण्याची सवय लावली. या चित्रपटानं तेव्हा १२ कोटींचा व्यवसाय केला. मग आला ‘दुनियादारी’. त्यानंही २५ कोटींचा गल्ला जमवला. रवी जाधवच्या ‘टाइमपास’नं त्यापुढे जाऊन ३० कोटींपर्यंत मजल मारली. आमचा ‘लय भारी’ चित्रपट ४० कोटींच्या जवळपास गेला. ‘नटसम्राट’नं ५० कोटी तर ‘सैराट’नं ९० कोटींचा व्यवसाय केला. थोडक्यात आताच्या काळात मराठी चित्रपट नुसताच आशयप्रधान नसून तो प्रेक्षकांच्या पसंतीसही उतरत आहे. मूळ नियोजनानुसार हा चित्रपट आम्ही २१ डिसेंबरला प्रदर्शित करणार होतो

त्यामागचं कारण म्हणजे माझा ‘टोटल धमाल’ हा चित्रपट ७ डिसेंबरला प्रदर्शित होणार होता. परंतु, त्याचं प्रदर्शन फेब्रुवारी २०१९पर्यंत पुढं गेलं. तसेच शाहरुख खानचा ‘झिरो’ चित्रपटही २१ डिसेंबरलाच प्रदर्शित होणार आहे. ‘माऊली’ आणि ‘झिरो’ हे दोन्ही चित्रपट खूप महत्त्वाचे असल्यामुळे त्यांच्यात आपापसात मारामारी होऊन एकमेकांचं नुकसान होऊ नये असं मला वाटलं. म्हणूनच मी आमच्या चित्रपटाचं प्रदर्शन एक आठवड्यानं पुढं आणलं. ‘माऊली’च्या निमित्तानं मला खूप काम करावं लागलं. हिंदी चित्रपटांमध्ये काम करीत असताना केवळ अभिनेता म्हणूनच माझा फोकस असतो. परंतु, मराठी चित्रपटाची निर्मिती करीत असल्यामुळे पोस्टर डिझाइनपासून इतर सर्व गोष्टींमध्ये लक्ष घालावे लागते. परंतु ‘माऊली’ करताना विलक्षण आनंद मिळाला. पाहूया आता प्रेक्षकांना तो कसा वाटतो ते.

आदित्य सरपोतदार : ‘फास्टर फेणे’च्या निमित्तानं रितेशसरांबरोबर मला दोन वर्षं घालवता आली. त्यावेळी आमच्यादरम्यान भरपूर गप्पा व्हायच्या. चित्रपटाच्या गोष्टीपासून ते ‘मेकिंग’पर्यंत आम्ही बोलायचो. त्याचवेळी मला जाणवलं होतं की आमच्या विचारांमध्ये खूप साम्य आहे. ‘माऊली’ चित्रपट त्यांच्या मनात खूप आधीपासून होता. ते या चित्रपटासाठी एका चांगल्या ‘स्कीप्ट’च्या शोधात होते. या चित्रपटासाठी जेव्हा त्यांनी मला विचारलं तेव्हा मी सेकंदाचाही वेळ वाया न घालवता त्यांना होकार देऊन टाकला. कारण माझ्यासाठी रितेश देशमुख यांच्याबरोबर ‘माऊली’च्या स्केलचा चित्रपट करणं ही खूप मोठी संधी होती. एक तर आपल्याकडे ‘हिरो ओरिएंटेड’ चित्रपट बनत नाहीत. त्यामुळे ‘माऊली’ हा ‘हिरो ओरिएंटेड’ सिनेमा असल्यामुळे माझ्यासाठी तर ती पर्वणीच होती. अशा प्रकारच्या चित्रपटांसाठी ‘मास’ बेस असलेला कलाकार आणि मोठं बजेट लागतं. रितेशसरांमुळे या दोन्ही गोष्टी मला आपसूक मिळाल्या. आपल्या मातीमधील ही अॅक्शन फिल्म आहे.

सर्वसाधारणपणे मराठी चित्रपट हा ३० ते ३२ दिवसांमध्ये शूटिंग होऊन पूर्ण होतो. मात्र ‘माऊली’साठी आम्हांला तब्बल ६५ दिवस लागले. त्यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे त्यामधील अॅक्शन प्रसंग आणि व्हीएफएक्सचं काम. या दोन्ही गोष्टींसाठी आम्हांला भरपूर वेळ होता. तो आम्ही घेतला. त्यामुळेच हा चित्रपट इतर चित्रपटांपेक्षा खूप वेगळा ठरणार आहे. सगळी भट्टी आता जमून आली आहे.

– रितेश देशमुख

ठेवणीतले लेख

  आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा  [recaptcha]

  काही निवडक प्रतिक्रिया:

  सचिन पारेकर


  शाहू मोडक हे मराठी चित्रपटातील असामान्य कलाकार होते. 'माणूस' मधील त्यांची भूमिका अविस्मरणीय होती.विनम्र अभिवादन!💐💐

  संजय रत्नपारखी
  संदर्भ:- फेसबुक प्रतिक्रिया