अतिथी कट्टा

दिनांक : २७-०७-२०१८

‌मराठी चित्रपटांचा मी मोठा चाहता : अक्षयकुमार


एक अभिनेता आणि निर्माता म्हणून अक्षय कुमार याने आत्तापर्यंत हटके आणि अर्थगर्भ चित्रपटांची निवड केली आहे आणि ते त्यांच्यामागे खंबीरपणे उभे राहिले आहेत. आता तो ‘चुंबक’ या मराठी चित्रपटाच्या माध्यमातून प्रस्तुतकर्ता म्हणून समोर आला आहे. या चित्रपटाबद्दल त्यांचं हे मनोगत.

——

मी ‘चुंबक’ पाहिला नि प्रचंड प्रभावीत झालो आणि ताबडतोब या चित्रपटाची प्रस्तुती करण्याचा निर्णय घेतला. आपण काहीतरी अत्यंत प्रामाणिक आणि शुद्ध पाहिलंय असं मला वाटलं. या चित्रपटाची गोष्ट माझ्या डोक्यात एखाद्या ‘चुम्बका’सारखी पक्की बसली आहे. एका रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या मुंबईतील १५ वर्षांच्या बाळू नामक युवकाची ही कथा आहे. आपल्या स्वप्नांचा पाठलाग करताना महत्वाकांक्षा की नैतिक मूल्ये या कचाट्यात तो सापडतो. बाळूला स्वतःचा छोटासा व्यवसाय थाटून या गुलामीतून बाहेर पडायचे आहे. आपल्या गावाच्या बसस्टँडवर एक छोटेसे उसाच्या रसाचे दुकान टाकायचे त्याचे स्वप्न आहे. पण वेळ अशी येते की, त्याच्याकडचे पैसे संपतात. अशा परिस्थितीत तो धनंजय उर्फ डिस्को नावाच्या मित्राच्या संपर्कात येतो. ‘नायजेरीयन एसएमएस स्कॅम’च्या माध्यमातून पैसा कमावण्याची एक शक्कल डिस्को लढवतो. शेकडो लोकांनी या संदेश योजनेला प्रतिसाद देणे अपेक्षित असताना केवळ एकच माणूस हा संदेश पाठवतो. प्रसन्ना नावाचा एका खेड्यातील गरीब आणि गतिमंद व्यक्ती त्यांना प्रतिसाद देतो. प्रसन्नासारख्या माणसाला फसवताना बाळू त्याची सद्सदविवेक बुद्धी आणि अपराधी भावना व त्यामागील स्वप्न पूर्ण करण्याची लालसा यांच्या कचाट्यात सापडतो. त्यातून बाळूला आता एक निवड करायची आहे. ‘चुंबक’ ही या निवडीची आणि त्यातून घडणाऱ्या बाळूच्या जीवनाची कथा आहे.

मराठी चित्रपटांचा मी खूप मोठा चाहता आहे. हल्ली हिंदी चित्रपटांमध्ये कथेचा अभाव असतो हे मान्य करायला मला काहीच हयगय वाटत नाही. दिग्दर्शक संदीप मोदी, प्रख्यात गीतकार, गायक, कलाकार व या चित्रपटाचे मुख्य नायक स्वानंद किरकिरे, दोन नवोदित कलाकार संग्राम देसाई आणि साहिल जाधव अशा चांगल्या टीममुळे हा चित्रपट उत्कृष्ट जमला आहे.

मराठी चित्रपटांची माझ्यावर प्रचंड भुरळ आहे. त्यामुळे मला केवळ ‘प्रेझेंटर’ म्हणूनच स्वत:ला मर्यादित ठेवायचं नाही. जर मला वेगळ्या कथांवरील चांगल्या पटकथा मिळाल्या तर त्या मराठी चित्रपटांची मी केवळ निर्मितीच करणार नाही तर त्यांमध्ये मी अभिनयसुद्धा करेन. मला रितेश देशमुखचा ‘बालक पालक’ आणि ‘लई भारी’ हे चित्रपट आवडले. दिवंगत दादा कोंडके या मराठीतील आघाडीच्या कलाकारावरील चरित्रपटाची निर्मिती करण्याचा प्रयत्नसुद्धा आम्ही केला होता. पण पटकथा मनासारखी जुळून आली नाही आणि तो प्रयत्न सोडून देण्याचा मी निर्णय घेतला.

निर्माते नरेन कुमार यांनी माझ्यासाठी ‘चुंबक’चा विशेष शो आयोजित केला. त्यावेळी मी तो पहिला. हा चित्रपट म्हणजे नरेन आणि दिग्दर्शक संदीप मोदी यांनी एकत्र पाहिलेले स्वप्न होते आणि त्याच्याशी मी जोडला गेलो हे माझे भाग्य आहे. या चित्रपटाशी जोडला जाताना पैशाचा विषय माझ्या मनात कधी आला नाही. या चित्रपटाशी जोडले जाऊन त्यातून फायदा कमवावा असेही मला वाटले नाही. “चुंबक’चा प्रस्तुतकर्ता म्हणून मला यातून नफा कमवायचा नाही. मराठी चित्रपटांची बाजारपेठ दिवसेंदिवस वाढते आहे आणि मराठी चित्रपट आपल्या कक्षा अधिक रुंदावतो आहे. ज्या प्रकारच्या मराठी चित्रपटांची निर्मिती अलीकडे होते आहे आणि ज्याप्रकारे अस्सल व्यक्तिरेखा त्यात साकारल्या जात आहेत, त्या विश्वासार्ह अशाच आहेत. जर मी ठरवले असते तर मी ‘रावडी राठोड २’ सारख्या चित्रपटांची निर्मिती केली असती. पण मी ‘पॅडमॅन’सारखे चित्रपट निवडले. कारण मला महिलांना दैनंदिन जीवनात ज्या समस्या भेडसावतात त्या लोकांसमोर आणायच्या होत्या. असाच काहीतरी प्रामाणिक प्रयत्न मी मराठी चित्रपटसृष्टीतही करीन.

‘चुंबक’मध्ये खराखुरा अभिनय आहे आणि खरेखुरे कलाकार आहेत. हा असा चित्रपट आहे की जो तुम्हाला सांगेल की तुमच्या आयुष्यात दोन मार्ग आहेत, एक चांगला आणि दुसरा वाईट. तुम्हाला त्यांपैकी कोणता निवडायचा हे ठरवायचे आहे. मी माझ्या २८ वर्षांच्या बॉलीवूडमधील कारकिर्दीत आत्तापर्यंत १३० चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि याआधी दोन मराठी चित्रपटांची निर्मितीही केली आहे. महाराष्ट्रातील तब्बल ३०० चित्रपटगृहांमध्ये तो प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाची कथा महत्वाची असून त्याची प्रस्तुती कोण करतो आहे, याला फार किंमत नाही. संगीतातील मोठे नाव असलेल्या स्वानंदने अभिनयात जी कामगिरी केली आहे, तशी करायला मलाही आवडेल. मला जे इतकी वर्षे करायचे आहे ते स्वानंदने त्याच्या पहिल्याच चित्रपटात एक कलाकार म्हणून साध्य केले आहे. त्यासाठी त्याला खूप कष्ट उपसावे लागले आणि वाट पहावी लागली, हेसुद्धा तितकेच खरे. आज जे मी अस्खलित मराठी बोलतो त्याचे सारे श्रेय हे माझ्या शाळेतील मराठी शिक्षिकेला आहे.

– अक्षयकुमार

ठेवणीतले लेख

  आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा  [recaptcha]

  काही निवडक प्रतिक्रिया:

  प्राध्यापक डॉक्टर सुजय पाटील कोल्हापूर

  लेखिका जयश्री दानवे यांनी आपले वडील नटश्रेष्ठ जयशंकर दानवे यांच्या सांगितलेल्या आठवणी या मराठी चित्रपटसृष्टीचा एक महत्त्वपूर्ण दस्तऐवज आहेत.

  संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया