अतिथी कट्टा

दिनांक : ११-०४-२०१८

‌’मंत्र’चं कथानक ऐकून मी ‘फ्लॅट’ झालो

पहिल्यांदा अभिनयाची राष्ट्रीय पुरस्कार आणि त्यानंतर मिळालेल्या ‘पद्मश्री’ पुरस्कारामुळे अभिनेता मनोज जोशी सध्या विशेष फॉर्मात आहे. त्याची आणखी एक लक्षणीय भूमिका असलेला ‘मंत्र’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. त्यानिमित्तानं या चित्रपटाबद्दल त्याचं मनोगत.
——–

‘मंत्र’ या चित्रपटाचे मेकर्स हे नवीन आहेत. ते काही सुप्रसिद्ध, सुपरिचित दिग्दर्शक नाहीत. परंतु, त्यांच्यामध्ये जागतिक पातळीवरचा चित्रपट करण्याची ताकद आहे. मला एक अत्यंत वेगळी भूमिका साकारण्याची संधी दिल्याबद्दल मी ‘मंत्र’च्या पाच निर्मात्यांचा आभारी आहे. त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. मी त्यांच्या चित्रपटात काम केलंय म्हणून मी हे कौतुक करीत नाहीय. त्यांनी निवडलेल्या विषयासाठी ते मला अधिक कौतुकास्पद वाटतात. तसेच अशाप्रकारचा विषय फक्त मराठी चित्रपटांमध्येच हाताळला जाऊ शकतो, हेदेखील मी अत्यंत अभिमानानं सांगू शकतो. हा चित्रपट करताना मला आधी वाटलं होतं की तो हिंदी भाषेमध्ये व्हायला हवा. ही गोष्ट मी आमचं चित्रीकरण सुरू झाल्यानंतर तिसऱ्या-चौथ्या दिवशीच निर्मात्यांना सांगितली होती. परंतु, असा विषय निवडण्याचं धाडस फक्त मराठी माणूसच करू शकतो.

या चित्रपटाचे निर्माते मला मुंबईत एका शूटिंगच्या ठिकाणी भेटायला आले. त्या दिवशी मला कुणाबरोबर तरी जायचं होतं. ती व्यक्ती मला न्यायलादेखील आली होती. परंतु, ‘मंत्र’चा दिग्दर्शक देवेन मला जसजशी या चित्रपटाची गोष्ट ऐकवत गेला, तसतसा मी त्यात गुंतत गेलो. सुरुवातीच्या काही मिनिटांमध्येच कथानकाशी मी ‌‘हुक’ झालो आणि देवेनला मी आता मला संपूर्ण कथानकच ऐकव… असं सांगितलं. देवेनचं कथाकथन पूर्ण व्हायला साधारण दोन तास लागले. तोपर्यंत माझ्यासाठी बाहेर थांबलेली व्यक्ती तशीच तिष्ठत बसली होती. कथा ऐकल्यानंतर मी अक्षरश: ‘फ्लॅट’ झालो होतो. गोष्ट ऐकल्यानंतर माझ्या तोंडून बाहेर पडलेले पहिले शब्द म्हणजे, ‘अहो, ही तर कथा माझीच आहे…’ ते ऐकून निर्मातेमंडळीही चाट पडली.

माझा जन्म वेदशास्त्रसंपन्न अशा कुटुंबात झालेला आहे. माझ्या माहितीप्रमाणे जन्मत:च संस्कृत भाषेचं बाळकडू मिळालेली माझी ही आठवी पिढी आहे. या चित्रपटात मी ‘श्रीधरपंत’ नावाची व्यक्तिरेखा साकारली आहे. विशेष म्हणजे ही व्यक्तिरेखा माझ्या आजोबांशी अगदी मिळतीजुळती आहे. किंबहुना चित्रपटातील ‘श्रीधरपंत’ म्हणजेच खऱ्या आयुष्यातील माझे आजोबा आहेत. आतापर्यंतच्या कारकिर्दीमध्ये माझे १२२ चित्रपट झाले आहेत. त्यापैकी काही मोजक्याच चित्रपटांमधील माझ्या भूमिका मला भावल्या. त्यापैकी एक ‘मंत्र’मधील भूमिका आहे. ही भूमिका माझ्या हृदयाला स्पर्श करून गेली. माझ्या मनोमस्तिष्काला चालना देऊन गेली. अशाप्रकारची भूमिका मी यापूर्वी कधीच केलेली नव्हती.
पौरोहित्य करणाऱ्या वेदशास्त्रसंपन्न गुरुजींचा मुलगा आजच्या काळात कशा द्विधा मन:स्थितीत आहे याचं दर्शन हा चित्रपट घडवतो. त्याची प्रेमकहाणीदेखील यात पाहायला मिळते. राजकारणातील तसेच धर्माची पाखंडी माणसं सर्वसामान्यांचा कसा उपयोग करून घेतात हेदेखील या चित्रपटाला पाहायला मिळेल. धर्माचं मर्म काय आहे, हे प्रत्येक पंथातल्या माणसाला कळणं आजच्या काळात गरजेचं आहे. अंतरिक्षाला गवसणी घालणारा माणूस, मोठमोठी यानं सोडतोय, ग्रह-उपग्रह सोडतोय, नवनवीन संशोधन करतोय, कधीतरी आपल्या कल्पनेत होतं, ते आपण आता प्रत्यक्षात आणतोय. मात्र आपल्या मनाला तो नियंत्रित नाही करू शकला. मनाला नियंत्रणात ठेवण्यासाठी देवाची नि धर्माची उत्पत्ती झाली. मी या चित्रपटातील साकारलेली व्यक्तिरेखा म्हणजे चित्रपटाचं सार आहे. मी छातीठोकपणे सांगू शकतो की, अशा पार्श्वभूमीवर आजपर्यंत एकही चित्रपट झालेला नाही. हा चित्रपट प्रेक्षकांना खिळवून ठेवेल अशी मला आशा आहे. श्री श्री रविशंकर यांच्यासारख्या दिग्गज व्यक्तिमत्त्वानं हा चित्रपट पाहिला आहे. त्यांनी याअगोदर फक्त दोनच चित्रपट पाहिलेले होते. त्यापैकी एक चित्रपट पाहायला त्यांना तीन दिवस लागले होते. हा चित्रपट त्यांनी अगदी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत म्हणजे सलग सव्वा दोन तास पाहिला. ‘आजच्या पिढीला हा चित्रपट दाखविण्याची आत्यंतिक गरज आहे. हा चित्रपट नुसती कलाकृती नाही तर, ती तुमच्या मनाला ‘एनलाइट’ करील. अंतर्मुख करील. आजच्या तसेच मागच्या पिढीतील लोकांच्या मनात, बुद्धीत मंत्राचं उच्चारण, आवर्तन करील.’ असे उद्गार त्यांनी हा चित्रपट पाहिल्यानंतर काढले होते. चित्रपटाचं संगीत अतिशय छान आहे. अभिनयाच्या आघाडीवरही सर्वांचीच कामगिरी लक्षणीय आहे. दीप्ती देवीनं खूप छान काम केलं आहे. सौरभचा हा पहिला चित्रपट वाटत नाही. छोट्या छोट्या भूमिकाही छान साकारल्या गेल्या आहेत. पुष्कराज चिरपुरकरची व्यक्तिरेखेचं वर्णन मी ‘अंडरडॉग’ असं करीन. ‘ऑथरबॅक्ड’ भूमिका नसतानाही पुष्कराजनं आपली व्यक्तिरेखा खूपच छान साकारली आहे. हॅट्स ऑफ टू ‘मंत्र’ टीम…
– मनोज जोशी

ठेवणीतले लेख

आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा[recaptcha]

काही निवडक प्रतिक्रिया:

वसंत पी.

मी तान्हाजी चित्रपट पाहिला तो सुद्धा मराठीत. संवाद हिंदी मधले जास्त प्रभावी वाटत होते. का कोण जाणे (हे फक्त ट्रेलर बघून). मराठीतले संवाद आणखीन प्रभावी होतील असे काही तरी करायला हवे.
संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया