अतिथी कट्टा

दिनांक : १६-१२-२०१७

‌’क्षीतिज ‘ महोत्सवातील सहभाग व प्रेक्षकांची पसंती यांचा समतोल साधणार- — दिग्दर्शक मनोज कदम



‌सध्या जगभरातील विविध चित्रपट महोत्सवात ‘क्षीतिज – द होयायझन ‘ हा मराठी चित्रपट मानाचे पुरस्कार पटकावत सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. त्यामुळेच तो कधी बरे प्रदर्शित होणार याकडेही लक्ष लागले आहे. याबाबत या चित्रपटाचे दिग्दर्शक मनोज कदम यांच्याशी संवाद साधला.
———-

प्रश्न-भारताच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात एकूण नऊ मराठी चित्रपट असताना ‘क्षीतिज ‘ हा तुमचा चित्रपट ICFT– UNESCO Gandhi award ने पटकावून सर्वांनाच आश्चर्याचा धक्काच दिला. असा हा चित्रपट पाहण्यास सगळेच उत्सुक आहेत…

उत्तर-नवीन वर्षांत एप्रिल महिन्यात ‘क्षीतिज ‘ प्रदर्शित होईल. खरं तर तो प्रदर्शित करून मग विविध चित्रपट महोत्सवात तो दाखल केला असता तर कदाचित त्याचा विषय व मांडणी दोन्ही दुर्लक्षित राहिले असते. म्हणूनच तो सेन्सॉर होताच अगोदर अनेक चित्रपट महोत्सवात तो पाठवायचा आणि त्यामुळेच या चित्रपटाचे महत्व अधोरेखित झाल्यावर तो प्रदर्शित करावा अशीच स्ट्रॅटेजि आखली. त्यात यश मिळत गेलेय. आता हा कोणता बरे चित्रपट? असा प्रश्न कोणालाच पडत नाही. हे या चित्रपटाचे यश आहे. इफ्फीत तर तो संपताच रसिकांनी उभे राहून अभिवादन केले. तर पुरस्कारासाठीच्या परीक्षकात सर्वच विदेशी होते. ऑस्कर, कान्स, बर्लिन अशा चित्रपट महोत्सवाचा त्याना अनुभव होता. सर्वोत्तम पुरस्कारासाठी सहा विशेष नियम होते. तीन चित्रपट तंत्राबाबत तर तीन सांस्कृतिक होते. हा चित्रपट जगाला काय देतोय हादेखील त्यात महत्त्वपूर्ण प्रश्न होता आणि त्या सहाही गोष्टीत ‘क्षीतिज ‘ने बाजी मारली.

प्रश्न-प्रत्येक चित्रपट महोत्सवानंतर तुमचे नियोजन योग्य दिशेने वाटचाल करतेय अशीच तुमची भावना वाढली असेल….

उत्तर- होय . अगदीच बरोबर ओळखले. आता थर्ड आय एशियन चित्रपट महोत्सवात देखिल ‘क्षीतिज ‘चा समावेश झाला आहे. आतापर्यंत हाॅस्टन चित्रपट महोत्सवात उत्कृष्ट चित्रपट, केपटाउन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्तम नवीन दिग्दर्शक, हैदराबाद व कोलकत्ता चित्रपट महोत्सवात निवड, स्वित्झर्लंडच्या ग्लोबल मायग्रेशन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखल, BRICS च्या इको चित्रपट महोत्सव असा हा चित्रपट लक्ष वेधून घेतोय.


प्रश्न-हे यश चित्रपटाच्या विषयाचेही….. तो सुचला कसा? त्यात काय सांगितलयं?

उत्तर-काही वर्षांपूर्वी मी प्रा. रायभान दबांगे यांची एक लघुकथा वाचून मी प्रभावित झालो. त्यात मला चित्रपट दिसला. पण ते सोपे नव्हते. कारण मूळ आशय कायम ठेवूनच पटकथा रचणे गरजेचे होते. त्यावर मी तीन वर्षे भरपूर मेहनत घेतली. आणि दबांगे याना भेटताच ते म्हणाले, हे सगळेच श्रेय तुम्हालाच जाते. तुम्ही नवे रुप दिलेय.

प्रश्न-थीम काय? उपेंद्र लिमयेच्या मुलीच्या भूमिकेतील मुलगी कशी निवडली?

उत्तर-ही ग्रामीण भागातील कथा आहे. तेथील परिस्थितीनुसार ती आहे. पिता व त्याची मुलगी यांच्या नात्यावर व मनोभूमिकेवर ही गोष्ट आहे. पित्याला जगण्यासाठी मिळेल ते काम करून पैसे मिळवणे गरजेचे वाटतयं. तो त्या दृष्टीकोनातून आयुष्याकडे पाहतोय. तर मुलीसाठी शिक्षण खूप महत्त्वाचे वाटतेय. त्यात तिची फरफट होतेय. चित्रपटाचा शेवट सकारात्मक केलाय हेच अनेक चित्रपट महोत्सवात महत्त्वाचे ठरलयं. समोर ठाकलेल्या परिस्थितीतून स्वतःला बाहेर काढण्याचा प्रयत्न करावा, त्यात यश मिळेल असा चित्रपटाचा आशय आहे. उपेंद्र लिमयेच्या मुलीच्या भूमिकेसाठी अनेक मुलींमधून जालनाच्या वैष्णवी तांगडे हिची निवड केली. तर थीमनुसार नगर जिल्ह्य़ातील जामखेड, बीड, इस्लामपूर, कासेगाव, वाटेगाव, पुणे शहर येथे चित्रीकरण केले.

प्रश्न- तुम्ही चित्रपट दिग्दर्शनातच मोठे यश मिळवून अपेक्षा वाढवल्यात असे वाटत नाही का?

उत्तर-तसे दिग्दर्शन पहिलेच. पण चित्रपट माध्यम व व्यवसाय असा दोन्ही स्तरावर भरपूर अनुभव व मेहनत घेतलीय. अगदी काही हिंदी मालिकांच्या लेखनापासून काही मराठी चित्रपटांच्या वितरणापर्यंत सर्वच मी अनुभवलय . मी ‘श्वास ‘ चित्रपटाला असिस्टंट दिग्दर्शक होतो तर किमान सहा- सात चित्रपटांसाठी मी क्रियेटिव दिग्दर्शक होतो. अमोल पालेकर यांच्या चित्रपट प्राॅडक्शन्समधून खूपच शिकता आले. चित्रपट कसा बनवावा यापासून तो प्रदर्शित कसा करावा हे सगळेच शिकल्यावर स्वतंत्रपणे दिग्दर्शक म्हणून उभा राहिलोय. निर्माता जगला पाहिजे हीच माझी भूमिका आहे.

प्रश्न-आपल्या नाव- आडनावाच्या स्पेलिंगमध्ये तुम्ही फरक केल्याने ‘क्षीतिज ‘ने यश मिळवून दिले असेही सांगण्यात येतेय…

उत्तर-हां हां हां…. हा बदल आताच केलाय. पण मी येथे आठ वर्षे मेहनत घेऊन येथपर्यंत आलोय. एकदा ज्योतिषी श्वेता जुमाणी यानी हा बदल सुचवला. त्यानंतर यश मिळाले हा केवळ योगायोगच. ———

ठेवणीतले लेख

    आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा



    [recaptcha]

    काही निवडक प्रतिक्रिया:

    नरेंद्र चौधरी


    आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
    संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया