अतिथी कट्टा

दिनांक : २५-०४-२०१८

‌जाऊ मी सिनेमात’ …

नुकताच जागतिक पुस्तक दिन होऊन गेला आणि आता महाराष्ट्रदिन नजिक आहे. त्या पार्श्वभूमीवर विख्यात अभिनेत्री शांता आपटे यांनी काही दशकांपूर्वी लिहिलेलं ‘जाऊ मी सिनेमात’ हे पुस्तक खूप महत्त्वाचं ठरतं. चित्रपटसृष्टीचा कारभाराविषयी शांता आपटे यांनी या पुस्तकाद्वारे केलेले विवेचन जिज्ञासू वाचकांना आवडेल असं आहे. म्हणूनच या पुस्तकातील काही भाग आम्ही संपादित स्वरूपात प्रसिद्ध करीत आहोत.
——–

श्री कृष्णाने आपली अफाट बुद्धिमत्ता खर्च करून त्या वेळच्या भारतीय समाजाचे चार वर्ण पाडले. पण या चित्रपटसृष्टीशी संबंध येणाऱ्या लोकांचे सात वर्ण पडतील. त्यांतून काळेगोरे काय निवडावेत ? श्रीकृष्णाने संस्कृत्यनुरूप वर्ण पाडले तर या सृष्टीत सत्तेनुरूप पडले, जशी ज्याची सत्ता तास तो उच्चवर्णीय ! यांत पहिले भांडवलवाले. त्याच्या पाठोपाठ कंपन्या स्थापन करणारे अपूर्व कर्तबगारीचे लोक. यांना आपण कंपन्याच म्हणू. पहिल्यात व यांच्यात बेटीव्यवहार होतो. यानंतर तिसरे ‘ डिस्ट्रिब्युटर्स’, चवथे ‘एक्झीबिटर्स’, पाचवे ‘अँडव्हरटायझर्स’, सहावे ‘वर्कर्स’ व शेवटी प्रेक्षक – जनताजनार्दन. आधी पोटोबा आणि मग विठोबा हे या सृष्टिरचनेतील धोरण ! यापैकी पहिले पाच वर्णीचे लोक एकत्र होऊन कारण यांच्या रोटीव्यवहार करावयाला पूर्ण मुभा आहे. त्यांनी आपला एक अभेद्य संघ स्थापन केला आहे. दुसरा गट ‘वर्कर्स ‘ व जनता. या वर्णीना बाह्यसृष्टीप्रमाणेच चित्रपटसृष्टीतल्या समाजव्यवस्थेत जरी महत्वाचे स्थान असले, तरी भांडवलशाही तत्वज्ञानाच्या दृष्टीने हे वर्ण पददलित असे समजले जातात. कामगारांच्या श्रमावर जनतेच्या खिशांतून पैसा ओढण्याचा हा या पंचवर्णीयांचा धर्म. कामगार हा या पंचवर्णीयाचा दास. या कामगाराने देतील तो पैसे घेऊन सांगतील ते काम करावयाचे. चित्रपटसृष्टीतून जनता हा वर्ण अलग पडल्यासारखा दिसत असला, तरी हेच पूर्वीच्या सहा वर्णीयांचे कार्यक्षेत्र असल्यामुळे हा वर्ण चित्रपटसृष्टीचाच एक भाग ठरवावयाला हरकत नाही. या जनतेला झुलवावयाचे कसे याबद्दलची कारस्थाने ब्र उल्लेखलेले पंचवर्णीय महाभाग आपल्या प्रसादतुल्य राजवाड्यांत बसून करीत असतात.
या वर्णांचे वर्णन थॊडक्यांत पुढील प्रमाणे होईल :

१. भांडवलवाले

लक्ष्मीच्या कुळांत यांचा जन्म झाल्यामुळे उच्चवर्णीयांत पहिले स्थान यांना आपोआपच लाभते. यांची दृष्टी निव्वळ मारवाडी. धंद्यांत जेवढे भांडवल गुंतले त्यावर अपेक्षेप्रमाणे व्याज सुटते की नाही एवढेच हे पाहातात. थोडक्यात म्हणजे, उत्तम माल स्वस्त भावात पदरी कसा पडेल याबद्दल हे भयंकर चिकाटी दाखवितात. व्यापारी दृष्टीने तयार मालाला यांच्या अपेक्षेप्रमाणे किंमत येत नसेल, तर तो माल ते आपल्या वखारीत डांबून ठेवतील व भाव येताच बाहेर काढतील. अशी रोखठोक व्यापारी व व्यवहारी दृष्टी यांची असल्यामुळे या चित्रपटसृष्टीतील ते लोकशिक्षण, ती लोकसेवा आणि ती ध्येये यांच्या गावीही नसतात. या ध्येयांच्या आरडाओरडीने, गुंतलेल्या भांडवलावर जास्त व्याज मिळत असेल, तर मात्र ते त्याचा उपयोग करून घेतील. या ध्येयाकडे हे जाहिरातीच्या दृष्टीने पहातात. धंदा म्हणजे धंदा !

२. कंपन्या

चित्रपट धंद्यातील हा गट अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण चित्रपटाच्या कारखान्यांत जे अनंत विभाग असतात, तंत्रे असतात व यंत्रे असतात. त्यात प्रावीण्य मिळविलेल्या तज्ज्ञ लोकांचा यांत भरणा असतो. काम करणे व काम करवून घेणे या दृष्टीने चित्रपटाचे यशापयश यांच्या कर्तबगारीवर अवलंबून असते. यांच्या कर्तबगारीला भांडवलवाल्यांचा पायबंद असतो. भांडवलवाल्याला यांनी माल तयार करून द्यावयाचा असतो, सबब भांडवलवाल्याची यांच्या प्रत्येक हालचालीवर सक्त देखरेख असते. कोठे व कसा खर्च करावयाचा याबद्दल कंपनीला भांडवलवल्याची समजून पटवून द्यावी लागते. त्यांची समजूत पटली तर ठीकच. नाहीतर चित्रपटांत दोष राहून जातात. असे दोष राहून भांडवलवाल्याच्या भांडवलावर अपेक्षित व्याज सुटले नाही, तर कंपनीला नाकदुऱ्या काढाव्या लागतात. भांडवलवाल्यांचा हा सासुरवास अनेक कंपन्यांना भोवल्यामुळे यांतील काही सासुरवासिनींनी आपले स्वतंत्र संसार थाटले आहेत !अशा स्वतंत्र कंपन्या भांडवलशाही पावलावर पाऊल टाकून चित्रपट तयार करणे, अगर तयार असलेले चित्रपट खरेदी करणे, अशांसारखे उपद् व्याप करीत आहेत. भांडवलवल्यांवर मात करणे या कंपन्यांना अशा रीतीने जुळले नाही, तर आपल्या स्वतंत्र संसाराचा व्याप त्या आखडून घेतात म्हणजेच कंपनी लिमिटेड करतात. शेअरहोल्डर्स यांचे धनी. पण त्यांचा जाच कमी, आणि तशीच पाळी आली तर त्यांच्या नावाचे कुंकू पुसायला या कंपन्यांना काही वाटत नाही.
बहुतेक कंपन्या आपला योगक्षेम अशा रीतीने कसाबसा चालवीत आहेत. हाताच्या बोटांवर मोजण्याइतक्याच काही कंपन्या आज आपल्या पायांवर उभ्या आहेत. यापैकी एखाददुसरी कंपनीचं ध्येयानुरूप चालविली जात असून बाकीच्या अर्थसंचयाच्या मागे आहेत. या वर्णाच्या स्वभाववैशिष्ट्याचे असे वर्णन करता येईल की, यांच्या एका हातात भांड्वलवाल्यांची शेंडी असते, तर दुसऱ्या हाताने हे आपल्या हाताखालच्या लाखोंच्या मन मुरगाळून त्यांच्याकडून कामे करवून घेतात. कंपनी हे चित्रपटकलेचं हृदयच म्हणता येईल. पण या हृदयाचा नमुना हा असा आहे. काळीज उलटे आहे !

३. डिस्ट्रिब्युटर्स

यांची जात बनियाची, माल जेथे विकला जातो ती सिनेमाथिएटरे, आणि माल जेथे पिकला जातो त्या कंपन्या यांच्यामधील हा महत्वाचा दुवा आहे. चित्रपटाच्या धंद्यातील हे दलाल. यांनी मालाचा उठाव करावयाचा. अर्थात यांचे हे काम अत्यंत गुंतागुंतीचे. त्यासाठी निरनिराळ्या ठिकाणची सिनेमाकेंद्रे यांनी आपल्या हुकमतीखाली ठेवलेली असतात. कोठे कोठे तर प्रांतचे प्रांत यांच्या ताब्यात. त्या प्रांतात जवळजवळ यांनी नाकेबंदी केलेली असते, व म्हणून चित्रपट कंपन्यांना आपले नाक मुठीत धरून याना शरण जावे लागते. यांची दृष्टी निव्वळ व्यापारी. त्यामुळे यांची ध्येये, तत्त्वे व कायदे सर्व काही निराळे. थोडक्यांत हे दलाल म्हणजे, चित्रपट कंपन्यांनी तयार केलेला माल नुसत्या मालगाड्या नव्हेत, अगर ओझ्याची गाढवेही नव्हेत. मालाचा नफ्याच्या दृष्टीने प्रसार करण्याची हातोटी यांच्यात असते व तिच्या जोरावर ते आपला धंदा शिताफीने व वरचष्मा ठेवून करीत आहेत. कोणत्याही धंद्याच्या उत्कर्षाला या दलालांची अत्यंत जरुरी असली, तरी ही संस्था काही मर्यादेनंतर त्या धंद्याला मारकच ठरणार ! तशीच स्थिती चित्रपट धंद्याची झाली आहे. ‘डिस्ट्रिब्युटर्स’ ची ही संस्था आज चित्रपट कंपन्यांच्या मार्गातील एक धोंड होऊन बसली आहे. मार्गातील हे दगड उखडून टाकण्याचा विचार काही कंपन्या हल्ली करू लागल्या आहेत, आणि हे दगड उखडले जातील अशी आशा करण्यासही जागा आहे.

४. एक्झिबिटर्स

म्हणजे सिनेमाथिएटरांचे चालक व मालक. यांनी या देशांतील लहानमोठ्या शहरांतून हजारो सुंदर मंदिरे उभारली आहेत. त्यांत अनंत चित्रपटशौकिनांना पैसा घेऊन देवाचे दर्शन घडविले जाते. मंदिराकडे प्रेक्षकांना खेचून कसे आणावे याकरिता या पुजाऱ्यांच्या डोक्यांतून दरदिवशी अनंत अजब कल्पना निघतात. ते भव्य आरास करतील. दिव्यांचा झगझगाट करतील, मंदिर लतापटकांनी शृंगारतील, वजन तरी लावतील, बॅंडच्या धुमधडाक्यांत गावांतील हमरस्त्यावरून मिरवणूक काढतील आणि सत्यनारायण करतील ! देव त्यांच्या नवसाला पावावा म्हणून नव्हे, तर भक्त नवसाला पावावा म्हणून ! आणि इतके करूनही भक्त वळला नाही, तर त्याला ‘प्रसाद’ देतील, लोणी वाटतील, कुंकवाचे करंडे देतील, सुवासिनीच्या खणा नारळांनी ओट्या भरतील, चित्रपटावर वादविवाद घडवून आणतील, व्याख्याने देतील व देववितील, निबंध मागवितील व बक्षिसे देतील.

भक्तांची इतकी आराधना केल्यानंतर भक्त प्रसन्न झाला नाही तरच आश्चर्य ! आश्चर्य नव्हेच ते ! कारण, भक्तांची मनोभूमिका अशी विचित्र असते की, कधीकधी ते या मंदिरातील विठोबाला अजीर्ण होईपर्यंत खाऊ घालतील तर कधी कधी अगदी उपाशी ठेवतील ! भक्तांच्या मनोभूमिकेचे हे वैशिष्ट्य हे पुजारी जाणून आहेत. म्हणूनच भक्तांची आराधना सुचेल त्या मार्गाने ते करीत असतात. आणि इतकेही करून चित्रपटदर्शनाला लोक आले नाहीत, तर आपले मंदिर हे लोक तसेच काही दिवस उघडे ठेवतात. या काळात आपल्याओळखीच्या मोठमोठ्या संस्थांच्या मालकांना हे खुशाल पैसे देतात व त्या पैशांची तिकिटे काढून त्यांच्या संस्थांतील लोकांना मंदिरात पाठवावयाला या मालकांना सांगतात. याबरोबर कधी कधी दर्शनाचे भाव उतरवतात आणि ‘जणांना शो ‘ सुरु करतात ! इतकी आटापिटा करून हा देव भक्तांना आवडत नाही असे दिसून आले, की देवाची उचलबांगडी करून त्याला दुसरीकडे घडतात ! या हिंदुस्थानात देवांना अद्याप तोटा नाही, भक्तही आहेत, आणि त्यांच्यात श्रध्दा हा गुण आहे, याची या पुजाऱ्यांना खात्री असल्यामुळे ते दुष्ट देव भक्तांपुढे मांडतात.

५. अॅडव्हर्टायजर्स

ही चित्रपटसृष्टीतील अजब वल्ली आहे. जो पैसे देईल त्याची टिमकी हे दोन्ही हातांनी वाजवतील. म्हणजेच यांचा धंदा वाजंत्र्यांचा ! बारशाला बोलवा व बाराव्याला बोलवा. एव्ही नेहमी एका पायावर तयारी ! पैसे दिला की हे आपली सद्विवेकबुद्धी खुंटीला टांगून एखाद्या खुंटावर उभे राहतील. ते आरडतील, भडक वर्णने करतील, कोणतेही वृत्तपत्र काखेत मारतील, त्याने नाहीच ऐकले तर ते निदान विकत घेतील, चित्रपटावर परीक्षणे लिहून घेतील, स्वतः लिहून पाठविलेली परीक्षणे वृत्तपत्रांना जाहिरातीचा मलिदा चारून वृत्तपत्रांची म्हणून प्रसिद्ध करवतील. ‘ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी ‘ या न्यायाने दात्यांची तळी हे प्रामाणिकपणाने उचलतील. चित्रपटांचे बेफाट व बेफाम वर्णन करून पूर्वेचे प्रेक्षक पश्चिमेकडे खेचतील. याची घमेंड अशी की, आम्ही जे छापू त्यावर जनतेचा विश्वास बसत नाही म्हणजे काय ? दुनिया झुकती आहे आणि आम्ही तिला झुकवितो आहो. तिला झुकविण्याचे दुसरी शस्त्र आमच्या हातात आहेत. भोळी बिचारी जनता यांच्या मायावी बोलीने फसते आहे. तिच्या भोळेपणावर या तुतारीवाजंत्रीवाल्यांच्या कर्तबगारीला चित्रपटसृष्टीत महत्त्व आले आहे. या भोळ्या जनतेला फसविण्याकरिता एकेक चित्रपटाच्या जाहिरातीपायी खर्च करण्यात येणाऱ्या या रकमेत एक नवीन चित्रपट निघेल ! पण त्याचे या जाहिरातदारांना व चित्रपट निर्मात्यांना काय ? भोळ्या जनतेला या अशा बेफाट जाहिरातीवर फसविल्यानंतर त्यांच्याकडून आपले खिसे नक्की भरणार याची यांना खात्री असते.
थोडक्यात म्हणजे चित्रपटाचे खरे मार्गदर्शक दिग्दर्शक हेच ! हेच संगीत ते चित्रपट भोळे प्रेक्षक पहातात. अशी बहुतेक परिस्थिती असल्यामुळे चित्रपटसृष्टीतील उच्चवर्णीय लोक यांच्या मुठीत आहेत. मालकांनी अगर चालकांनी उन्मत्त होऊन जर चुकून कधी यांची अवहेलना केली, अगर अपमान केला, अगर रोटीव्यवहार करण्याचे नाकारले, तर मालकाविरुद्ध जनतेला उठवून हे त्यांना शरण आणतील अशी अजब शक्ती यांच्या जिभेत आहे. चित्रपटांच्या या जाहिरातींचाही योग्य उपयोग करणे वाचकांच्या हातात आहे.

६. वर्कर्स

यामध्ये नटवर्ग आणि इतर नोकरवर्ग असे दोन भाग पडत येतील. नोकरवर्गात मोठ्या पगाराची माणसे म्हणजे दिग्दर्शक, संगीत दिग्दर्शक, छायालेखक, ध्वनिलेखक, इत्यादि. चित्रपटाचे यशापयश यांच्या कर्तबगारीवर अवलंबून असते. काही कंपन्यांतून यांना मानाचे स्थान व अधिकार आहेत. यांची मालकशाहीत उत्क्रांति होण्याचाच संभव फार. यांच्या बरोबर चित्रपटकथा लिहीणाऱ्या लेखकाचा समावेश होणे जरूर आहे ही गोष्ट खरी, पण या लेखकाची चित्रपटसृष्टीत अद्यापहि मोठी केविलवाणी स्थिती आहे. लेखकाच्या बुद्धिमत्तेला आणि कर्तबगारीला या चित्रपटसृष्टीत मोल नाही. हा प्राणी चित्रपटसृष्टीत कोणाच्या खिजगणतीतही नसतो वाड्मयसाहित्यांत नाव मिळविलेल्या लेखकांना या चित्रात सृष्टीत स्थान नसते. अर्थात त्यांची करणेही उघड आहेत !!
चित्रपटनिर्मात्यांची अशी एक समजून आहे की, चित्रपटसृष्टीची नदी त्यांच्याइतकी कोणी ओळखलेली नाही. चित्रपटकथा कशा काय असाव्यात हे या चित्रपटनिर्मात्यांखेरीज कोणाला कळत नाही ! जणू साहित्यांत नाव मिळविलेल्या इतर लेखकांनी कधी चित्रपट पहिलेच नाहीत, त्यांचा विचारच केला नाही, आणि सर्वसाधारण प्रेक्षकांची रुची आजमावण्याचा ताकद त्यांच्या मेंदूत नाहीच !! या सर्व शक्तीचा साठा फक्त एकाच व्यक्तीत आहे आणि तो म्हणजे चित्रपट निर्माता !! चित्रपटकथालेखनाचे तंत्र विशिष्ट आहे हे खरे असले, तरी ते तंत्र अद्याप या बुद्धिमान लेखकांना समजले नाही, उमजले नाही, असा त्यांच्यावर आरोप आहे. अर्थात हे तंत्र फक्त आपल्याला माहित आहे अशा समजुतीने हे लोक चित्रपटकथेची वाटेल तशी चिरफाड करू इच्छितात. चित्रसृष्टीत वरच्या दर्जाचे लोक म्हणजे नट व नटी. चित्रपटसृष्टीचा हा प्राण. पण हा वर्ग मालकशाहीची जवळ जवळ बटिकच. पैसे मोजतात हे. सांगितलेले काम यांनी करावे, आम्हीच यांना पुढे आणतो, नावलौकिकाला चढवितो, अशी मालकांची मुद्दाम घमेंड !
या वर्गात आणखी काही लोकांचा समावेश होतो. त्यांना ‘एक्स्ट्रा’ म्हणतात. ते कामापुरते येतात व काम संपले कि निघून जातात. वाजंत्रीवाले, बॅंडवाले, पैलवान, कार्टवाले व गर्दी करणारे इत्यादी एक्स्ट्रा मध्ये येतात.या वंशवृक्षाकडे दृष्टी फेकली म्हणजे जनतेच्या आधारावर, श्रद्धेवर, पैशावर, सहानुभूतीवर सिनेमासृत्यूशीच हा वरचा फुलोरा जगतो, पोस्ट, प्रफुल्लित होतो व माजतोही !

७. जनता

ही वसिष्ठागरची गरीब कामधेनू ! जनता मेंढरासारखी आहे. धनगराने जशी हाकाटी करावी त्याप्रमाणे हि धावते. त्याने तिला जा दिशेला हकवा तिकडे ती मुकाट्याने मन खाली घालून जाते. जनता ज्या जादूने अशा प्रकारे भारावून जाते, ती त्या जाहिरातीची व त्या जाहिराती लिहिणाऱ्याची जादू ! प्रेक्षकांचा मूळ हेतू चार पैसे टाकून चित्रपट पाहावयाचा व आपली करमणूक करून घ्यावयाची हा असतो. हिंदुस्थानातील बहुसंख्य लोकांचे जीवन सांपत्तिकदृष्ट्या असे झाले आहे. रोजचा जीवनाचा लढा लढता लढता ते अगदी मेटाकुटीला आले आहेत. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत घाम गळतो काम करायचे, काम करता करता वरिष्ठांच्या शिव्या खायच्या, उपमर्द व अपमान सहन करायचा आणि आला दिवस कसातरी घालवायचा ! ती माणसे असतात म्हणूनच त्यांना ते असह्यच होते, संताप येतो, चीड येते. पण परिस्थितीत बदल होणे जवळ जवळ अशक्य असल्यामुळे त्यांचा पदरी निराशा येते. त्या निराशेने त्यांच्या धडधडत्या हृदयाचा जिवंतपणा व मनाचा उत्साह पार नाहीसा होतो. अशा या दुःखीकष्टी जीवाला करमणूक व्हावी, त्याला थोडा विरंगुळा पडावा, म्हणूनच ते चित्रपट पहातात. अशा प्रेक्षकांच्या मनाची हि स्थिती लक्षात घेता त्यांच्या मनाच्या शक्ती व भावना खेचून चित्रपटकथेवर केंद्रित करावयाच्या तर कथानकाची निवड उद्दिष्ट पाहिजे, त्यातील प्रसांग उठावदार व परिणामकारक व्हावयास पाहिजेत, ते प्रसंग चित्रित करणाऱ्या नटनटींचा अभिनय पहिल्या दर्जाचा पाहिजे, आणि चित्रपट अत्यंत आक्रशक होण्याकरता जे इतर गन लागतात तेही पाहिजेत. चित्रपटांत कोठे दोष राहून गेले, कोठे कमतरता असली, तर ती जाहिरातदार भरून काढतात व प्रेक्षकांचा मानत एकाद्या चित्रपटाविषयी औत्सुक्य उत्पन्न करून चित्रपट पहाण्याचा मोह त्यांच्या मनात उत्पन्न करतात.
– शांता आपटे

ठेवणीतले लेख

    आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा



    [recaptcha]

    काही निवडक प्रतिक्रिया:

    नरेंद्र चौधरी


    आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
    संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया