अतिथी कट्टा

दिनांक : ०६-०७-२०१८

‌‘गोट्या’ चित्रपट इतर भाषांमध्येही ‘डब’ व्हावा : राजेश श्रृंगारपुरे

मराठी चित्रपटांमध्ये खेळ हा विषय अपवादानेच घेतला जातो. अशा वेळी गोट्यासारखा दुर्लक्षिलेला गोट्यांचा खेळ जेव्हा मोठ्या पडद्यावर येतो तेव्हा साहजिकच सर्वांचं कुतूहल उंचावणं स्वाभाविक आहे. सहा जुलैपासून चित्रपटगृहात दाखल झालेल्या ‘गोट्या’ या चित्रपटात प्रशिक्षकाची भूमिका निभावणाऱ्या राजेश श्रृंगारपुरे यांचं हे मनोगत.

——

‘गोट्या’चे लेखक-दिग्दर्शक भगवान पाचोरे यांनी जेव्हा मला चित्रपटाचं कथानक ऐकवलं तेव्हा मी अक्षरश: भारावून गेलो. माझ्या मनात पहिला प्रश्न आला की, हा खेळ घेऊन पूर्ण लांबीचा चित्रपट खरंच होऊ शकतो ? पाचोरे यांचं या विषयावरील प्रेम पाहून मी आश्चर्यचकित झालो. ते दिग्दर्शन क्षेत्रामध्ये नवीन असले तरी त्यांचं विषयावरील प्रेम थक्क करणारं आहे. या चित्रपटाबद्दलचं त्यांची भावना इतकी घट्ट, गडद होती की प्रत्यक्ष रुपेरी पडद्यावरही अतिशय छान पद्धतीनं उतरलीय. हा खेळ फक्त लहान मुलांसाठी मर्यादित नाही. हा चित्रपट बघितल्यानंतर प्रेक्षकांना खरंच वाटू लागेल की हा खेळ आपण आपलं घरच नव्हे तर कार्यालयांमध्येही खेळू शकतो. गरज नाही की या खेळासाठी मातीचं मैदान हवंय. ज्या नोकऱ्यांमध्ये ताणतणाव आहे, अशा ठिकाणी काम करणाऱ्यांना तर हा खेळ म्हणजे एक पर्वणीच आहे. या खेळाला कसलंही भांडवल किंवा गुंतवणूक लागत नाही. आशियाई खंडामधील सर्व देशांमध्ये हा खेळ खेळ‌ला जातो. या खेळाची स्पर्धादेखील भरवली जाते. ही गोष्ट या चित्रपटाची ‘स्क्रीप्ट’ ऐकेपर्यंत मलाही माहीत नव्हती. पण या चित्रपटामुळे ही गोष्ट कळली नि मला अभिमान वाटला की लहानपणी मीदेखील हा खेळ खेळला आहे. नुसताच खेळला नाही तर बऱ्याच गोट्या मी जिंकल्या होत्या. माझ्या घरात अजूनही दोन गोट्यांचे भरलेले डबे आहेत. बरेच चित्रपट आम्ही कलाकार करतो. प्रेक्षक नव्हे तर आमच्या स्मृतीमधूनही ते निघून जातात.

मात्र हा चित्रपट असा आहे की, जो माझ्या तर स्मरणात राहणारच आहे. परंतु, तो प्रेक्षकांच्याही स्मरणात राहील याची मला खात्री वाटते. या चित्रपटात मी सुरुवातीला शिक्षक म्हणून काम करीत असताना दाखवलो गेलो आहे. कालांतरानं माझ्याकडे गोट्या खेळाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी येते. गोट्या या व्यक्तिरेखेनं खेळात दाखविलेली कमाल पाहून मी त्याचा गुरु होतो. म्हणजेच गुरु-शिष्य परंपरेचंही दर्शन प्रेक्षकांना या चित्रपटामधून पाहायला मिळेल. कोणतीही गोष्ट साध्य करायची असेल तर कष्ट करावेच लागतात. असेच कष्ट या चित्रपटामधील गुरु आणि शिष्यालाही करावे लागतात.

खरं तर हा खेळ सर्वांच्याच विस्मृतीत गेला आहे. त्यामुळे चित्रपटाचं शूटिंग करताना माझ्या जुन्या आठ‌वणींना उजाळा मिळाला. या चित्रपटामध्ये मी गोट्या खेळ शिकवणाऱ्या प्रशिक्षकाची भूमिका साकारली आहे. कर्मधर्मसंयोगाने घडलेली एक गोष्ट मला निश्चितच सांगायला आवडेल. शूटिंग सुरू असताना एक गोटी माझ्यापासून खूप दूर ठेवण्यात आली होती. त्या गोटीवर मी नेम धरला आणि पहिल्या फटक्यातच तो अचूक लागला. त्यामुळे साहजिकच माझं आत्मबळ वाढलं. सेटवरच्या सर्वांनीच माझी वाहव्वा केली. तेव्हा माझं मलाच वाटलं की अरे अजूनही आपण हा खेळ खेळू शकतो. त्यामुळे नंतर शूटिंगच्या वेळी ब्रेकदरम्यान मी या मुलांमधलाच एक होऊन गोट्या खेळायचो. कधी कधी आमच्यातच मग स्पर्धा व्हायची की कोण जास्त गोट्या जिंकतोय याची. विशेष बाब म्हणजे मी बऱ्याच वेळा जास्त गोट्या मारल्या आहेत. अशा पद्धतीचा खूप छान माहोल सेटवर होता. हा चित्रपट फक्त मराठीपुरताच मर्यादित राहू नये, अशी माझी इच्छा आहे. तो विविध भाषांमध्ये ‘डब’ होऊन इतर राज्यांमध्येही प्रदर्शित व्हायला हवा असं मला वाटतं.

अलीकडच्या काळात हिंदी भाषेत खेळांवर आधारलेले बरेच चित्रपट बनलेत. परंतु, मराठी चित्रपटांमध्ये खेळाच्या आघाडीवर शांतताच आढळते. वास्तविक महाराष्ट्र हे राज्य खेळांना पूरक असलेले राज्य आहे. नेहमी खेळल्या जाणाऱ्या खेळांव्यतिरिक्त भोवरा, पतंग, विटी दांडू हे खेळ आपल्याकडे मोठ्या आवडीनं खेळले जातात. या खेळांशी प्रत्येकाचं बालपण जोडलं गेलेलं आहे. त्यामुळे हा खेळ खेळताना किंवा पाहताना प्रत्येकाला आपलं बालपण नक्कीच आठवेल असं मला वाटतं. ग्रामीण तसेच शहरी भागातील प्रेक्षकांनाही हा खेळ आपलासा वाटत असल्यामुळे चित्रपटही स्वीकारला जाईल अशी मी आशा करतो.

– राजेश श्रृंगारपुरे

ठेवणीतले लेख

    आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा



    [recaptcha]

    काही निवडक प्रतिक्रिया:

    नरेंद्र चौधरी


    आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
    संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया