अतिथी कट्टा

दिनांक : २-११-२०१८

‌‌‌‌‌‌‌‌‘डॉ. घाणेकर साकारताना मी सर्वाधिक घाबरलो!…


चरित्र व्यक्तिरेखांच्या रुपेरी पडद्यावरील सादरीकरणामध्ये आता प्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे यांचा हातखंडा झाला आहे. बालगंधर्व, लोकमान्य टिळक यांच्यानंतर आता तो डॉ. काशीनाथ घाणेकर यांच्या व्यक्तिरेखेचं शिवधनुष्य पेलण्यासाठी सज्ज झाला आहे. त्यानिमित्तानं या चित्रपटाबद्दल त्याचं हे मनोगत.

——

डॉ. काशीनाथ घाणेकर यांची भूमिका मी केलीय यावर अजूनही माझा विश्वास बसत नाही. रंगदेवतेची कृपा आहे म्हणून बालगंधर्वांसारख्या एक काळ गाजविणार्‍या नटश्रेष्ठाची भूमिका माझ्या वाट्याला आली. पुन्हा एका गॅपनंतर सुवर्णकाळ गाजविणार्‍या डॉ. घाणेकर यांच्यासारख्या आणखी एका अवलियाची भूमिका माझ्या वाट्याला आलीय. मी आजवर बर्‍याच वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. बालगंधर्व आणि लोकमान्य टिळक साकारतानाही मला इतकी भीती वाटली नव्हती की मला काशीनाथ घाणेकर या चित्रपटाचं शूटिंग संपल्यानंतरही वाटते आहे. कारण मला खरंच वाटत नाही की ही भूमिका मी साकारू शकलोय. कुठल्याही अर्थानं मी स्वत:ला काशीनाथ घाणेकर यांच्याशी जोडू शकत नव्हतो. एक तर आमचे स्वभाव भिन्न आहेत. आम्ही केलेली नाटकं, चित्रपट नि आम्ही केलेलं प्रत्येक काम अगदी भिन्न आहे. प्रेक्षकांसमोर जातानाच त्यांचा नि माझा ‘पॉइंट ऑङ्ग व्ह्यू’ अगदी वेगळा आहे.
गंमत म्हणजे अशा एका नटाची भूमिका माझ्या आयुष्यात आलीय की ज्याचं नाव बोर्डावर लागल्यानंतर नाटकं हाऊसङ्गुल होत असत. माझ्यासारखा एक नट असा आहे की ज्याचं नाव दहा वेळा एका बोर्डवर लिहिलं तरी पाच लोकंही तिकीट काढून ते नाटक पाहायला येणार नाहीत. त्यामुळे इतका विरोधाभास ज्यांच्या स्वभावात आहे, अशी दोन वेगळी माणसं या चित्रपटाद्वारे एकत्र आली आहेत. एक ते स्वत: आणि त्यांची भूमिका करणारा दुसरा मी. हा विरोधाभास इतका विलक्षण आहे की मला अजूनही ‘कनेक्ट’ होत नाहीय की मी त्यांची भूमिका पडद्यावर साकारलीय.

थँक्स टू अभिजीत. त्याच्यामुळे ही भूमिका माझ्याकडून पार पाडली गेली. परंतु अजूनही मला वाटतं की पडद्यावर कोणीतरी वेगळाच माणूस घाणेकर साकारतोय. मी अजूनही स्वत:ला घाणेकरांशी ‘रीलेट’ करू शकत नाही. अभिजीतनं चार-पाच वर्षं या चित्रपटावर मेहनत घेतली होती. त्याच्या डोक्यात पहिल्या ङ्ग्रेमपासून ते शेवटच्या ङ्ग्रेमपर्यंत हा सिनेमा कसा दिसला पाहिजे, असला पाहिजे, प्रत्येक व्यक्तिरेखेकडून नेमकं काय हवंय याची स्पष्टता होती. त्यामुळे या चित्रपटात काम करणार्‍या प्रत्येक कलाकाराला आपापल्या वाट्याला आलेल्या भूमिका साकारणं सोपं गेलं असलं पाहिजे. कलाकाराला कोणतीही भूमिका साकारताना एक दिशा, एक मार्गदर्शक हवा असतो. दुर्दैवानं मी घाणेकरांना कधी प्रत्यक्ष पाहू शकलो नाही. त्यांच्याबद्दलचं काही वाचायचा मी प्रयत्न केला.

परंतु अभिजीतचा अभ्यास बघून त्यांच्यावरची पुस्तकं बाजूला ठेवली. त्यांचे चित्रपटही मी बघितले नाहीत. कारण मला त्यांची नक्कल करायची नव्हती. मला त्यांच्या आत्म्यापर्यंत पोचायचं होतं. त्यांचा आत्मा जर मला सापडला तर मला ती व्यक्तिरेखा खर्‍या अर्थानं कळली असं आपण म्हणू शकतो. घाणेकरांच्या प्रत्येक ऍक्शन या अभिजीतच्या मनात होत्या. घाणेकर हे पार्‍यासारखे आहेत. ते हातात सापडतच नाहीत. ते हातामधून निसटले की वेगळा आकार घेतात नि त्यांना पुन्हा धरायला गेलं की पुन्हा ते हातामधून निसटतात.

घाणेकरांनी रंगभूमीवर साकारलेली लाल्याची भूमिका असेल, संभाजीमहाराजांची असेल किंवा इतर काही भूमिका असतील, हे माझ्यासाठी मोठं आव्हान होतं. हे आव्हान सोपं केलं ते अभिजीतनेच. त्यामुळे या चित्रपटासाठी माझा गाईड, गुरू, मार्गदर्शक होता अभिजीत देशपांडे. त्यामुळे मी गमतीनं अभिजीतला ‘ओरिजनल घाणेकर’ मि मला स्वत:ला ‘डुप्लिकेट घाणेकर’ म्हणतो. तो स्क्रीप्टमध्ये अक्षरश: घुसला होता. खूप ‘पॅशनेटली’ त्यानं या चित्रपटाचं लेखन-दिग्दर्शन केलं आहे. त्यानं ही व्यक्तिरेखा जीवापाड जपल्यामुळे हा चित्रपट एवढ्या चांगल्या पद्धतीनं आता प्रेक्षकांसमोर येतोय. त्यामुळे या ‘कॅप्टन ऑङ्ग द शीप’चं मी मनापासून कौतुक करतो.

इतक्या मोठ्या काळाचं, इतक्या मोठ्या माणसांचं काम करतानाचं दडपण विलक्षण होतं. ते शब्दांमध्ये मी सांगू शकत नाही. इतकी भीती मला या आधी कोणतीच व्यक्तिरेखा साकारताना वाटली नव्हती. पण काही काही गोष्टी ज्या नटाच्या आयुष्यात येत नाहीत, त्या पूर्ण करण्यासाठी काही नटच मग त्याच्या मदतीला धावून येतात आणि त्या उणीवा पूर्ण होतात. काही वर्षांपूर्वी बालगंधर्व माझ्या आयुष्यात आले नि संगीत रंगभूमीशी माझा न आलेला संपर्क त्यांनी जोडून दिला. त्यांच्यामुळे एक वेगळं संगीतविश्व माझ्या आयुष्यात आणून दिलं. घाणेकरांसारखे असे नट माझ्या आयुष्यात आले की, आयुष्यात एकदाही हाऊसङ्गुलची पाटी न पाहिलेल्या माझ्यासारख्या नटाला चित्रपटात का होईना त्यांनी हाऊसङ्गुलचे बोर्ड दाखवले. मराठी रंगभूमीचे नि या सगळ्याच दिग्गजांचे- ज्यांची नावं या चित्रपटात दिसताहेत, त्यांचे मी शतश: वंदन करतो. इतकं अलौकिक काम या सगळ्यांनी करून ठेवलं आहे की त्यांनी लावलेल्या वृक्षाची ङ्गळं आज आम्ही चाखतोय. आम्हाला असं कायम वाटत राहतं की मराठी रंगभूमीवर आत्ता जी नाटकं हाऊसङ्गुल होताहेत त्याचं कारण आम्ही आहोत. पण मला असं वाटतं की त्याची सुरुवात १९व्या शतकात अण्णासाहेब किर्लोस्करांनी केली. मग बालगंधर्व, दीनानाथ मंगेशकर, केशवराव भोसले आले. मग त्यानंतरच्या पिढीत डॉ. श्रीराम लागू, डॉ. काशीनाथ घाणेकर या सगळ्यांमुळे ही रंगभूमी बहरली. मराठी नाटक आपल्या घरात सण-समारंभासारखं साजरं केलं जातं. या मंडळींमुळे आम्ही आजचं वैभव पाहतो आहोत. त्यांच्याबद्दलची हीच कृतांजली किंवा आदरांजली म्हणजेच हा चित्रपट आहे. लोकांच्या कायम लक्षात राहील असा १९६० ते १९८५पर्यंतचा हा मराठी रंगभूमीचा हा सुवर्णकाळ आहे. त्या सुवर्णकाळातील जन्मलेली दिग्गज मंडळी या चित्रपटाच्या माध्यमातून आम्ही प्रेक्षकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे.

– सुबोध भावे

ठेवणीतले लेख

  आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा  [recaptcha]

  काही निवडक प्रतिक्रिया:

  शांताराम कांबळे

  मला वाटतं होते, मराठी मुलगी फक्त माधुरी दीक्षित ने हिंदी चित्रपट सृष्टीत खूप खूप कामे केली, पण, संध्या, रत्नमाला, नंदा, अशा कितीतरी, मराठी अभिनेत्री होत्या, होऊन गेल्या, याचा मला खूप🎉🎊 खूप अभिमान वाटतो, मी चित्रपट रसिक आहे.

  संदर्भ:- फेसबुक प्रतिक्रिया