अतिथी कट्टा

दिनांक : १८-०९-२०१८

‌‌‌‌‌‌‌‌चांगल्या मराठी चित्रपटांसाठी ‘सोनी’तर्फे गुंतवणूक

वाहिन्यांच्या महाजालात ‘सोनी मराठी’ नावाची एक नवीन वाहिनी नुकतीच दाखल झाली आहे. मराठी मनोरंजन वाहिनी विश्वात सध्या जे काही पाहायला मिळतंय, त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं दाखविण्याचा ध्यास घेऊन ही वाहिनी प्रेक्षकांसमोर दाखल झाली आहे. या वाहिनीचे सर्वेसर्वा श्री. अजय भाळवणकर यांचे या वाहिनीवर मराठी चित्रपटांना मिळणाऱ्या स्थानाबाबतचे मनोगत.

——

‘सोनी मराठी’ नवीन वाहिनीसाठी आम्ही गेल्या दीड वर्षापासून काम करतोय. सर्वात आधी आम्ही समाजात सध्या काय घडतंय याचा अभ्यास केला. प्रेक्षकांच्या मनामध्ये कोणत्या गोष्टी खदखदाताहेत याची पाहणी केली. ही पाहणी आम्ही वेगवेगळे वयोगट आणि शहरांमध्ये केली. त्यानंतर मग लोक टीव्हीवर सध्या काय पाहताहेत आणि त्यांना काय हवंय हे जाणून घेतलं. त्यानंतर वेगवेगळ्या कल्पनांचा अभ्यास केला आणि त्यानंतर मग आम्ही आपल्या वाहिनीवर काय असायला हवं, याची आखणी करू लागलो. मराठी चित्रपट हा मराठी रसिकांच्या नेहमीच जिव्हाळ्याचा विषय राहिलेला आहे. मराठी चित्रपट निर्मितीची संख्या अलीकडच्या काळात वाढलीय. परंतु, त्यापैकी बरेच चांगले चित्रपट अजूनही प्रदर्शित झालेले नाहीत. त्यामागे बरीच कारणे असतील. परंतु, चित्रपट प्रदर्शित न होण्याचा फटका निर्मात्यांबरोबरच प्रेक्षकांनाही बसतो. काही चांगले चित्रपट प्रदर्शित झाले असले तरी योग्य वितरणाअभावी ते चित्रपटगृहांमधून लगेचच काढले जातात. चित्रपटांना चांगला व्यावसायिक प्रतिसाद नसल्यामुळे अनेक चित्रपटांना ‘सॅटेलाईट राईट्स’चीही मागणी नाही. या सगळ्या विपरीत परिस्थितीबद्दल आम्ही खूप गांभीर्यानं विचार केला.

विशेषत: या क्षेत्रात काम करणाऱ्या लहान मुलांचा विषय तर खूपच गांभीर्यानं पाहायला हवा. या क्षेत्रात आपल्या मुला-मुलीनं पुढं जावं असा आंधळेपणानं विचार करणारे अनेक वडील सध्या आपल्या आजूबाजूला पाहायला मिळतात. अशाच एका मुलीची म्हणजे परीची कथा या चित्रपटाला पाहायला मिळते.

या चित्रपटात मी त्या मुलीच्या वडिलांची भूमिका साकारली आहे. परंतु, केवळ आपली इच्छा मुलांवर लादणाऱ्या या आई-वडिलांची आणि पर्यायानं मुला-मुलींची कशी ससेहोलपट होते, या चित्रपटात दाखविण्यात आलं आहे. हा विषय दिग्दर्शकानं अतिशय संवेदनशीलरीत्या मांडला आहे. या चित्रपटाचा दिग्दर्शक रोहित शिलवंत यांच्या कॉलेजच्या ग्रुपनं काही वर्षांपूर्वी एक एकांकिका केली होती. त्यावर हा चित्रपट आधारलेला आहे. ही एकांकिका काही माझ्या पाहण्यात आली नाही. ती कधी सादर झाली, याबाबत मला फारशी माहिती नाही. परंतु, ती एकांकिका उत्तम होती, एवढंच माझ्यापर्यंत आलं होतं. या चित्रपटाच्या लेखनावर रोहितनं खूप मेहनत घेतली. या पटकथेचे त्यानं तब्बल १५-१६ ड्राफ्ट्स लिहिले. मला वाटतं, ही मेहनत आवश्यक होती. त्यामागचं कारण म्हणजे एकांकिकेचा जीव हा छोटासा असतो. सुमारे पाऊण तासात एकांकिकेमध्ये तुम्हाला गोष्ट आटोपावी लागते. सिनेमा माध्यमात तुम्हाला गोष्ट खुलवायची अधिक संधी असते. त्यामुळे एकांकिकेचे चित्रपटातलं रुपांतर चांगलं झालंय असं मला वाटतं. हा चित्रपट आजच्या पालक, पाल्यांचं मनोरंजनही करेल आणि त्यांना काय करावं नि काय करू नये, याची जाणीवही करून देईल.

ही परिस्थिती लवकरात लवकर बदलायला हवी, असे आमच्या ‘टीम’चे मत पडले. त्यामुळे चांगल्या चित्रपटांच्या आमच्या वाहिनीवरील प्रदर्शनासाठी आम्ही ऑलरेडी पुढाकार घेतला आहे. जवळपास शंभर चित्रपटांचे सॅटेलाईट राईट्स आम्ही विकत घेतले आहेत. हल्ली प्रत्येक मराठी चित्रपट काही ना काही तरी वेगळे सांगत असतो. त्यामध्ये वेगळा विषय हाताळलेला असतो. कलाकारांकडून काहीतरी वेगळी कामगिरी सादर केली गेली असते. त्यामुळे वाहिन्यांवर न आलेल्या चित्रपटांची संख्याही मोठी होती. त्यातून चांगल्या चित्रपटांची निवड करणे ही खूप कठीण काम होते. तशा चित्रपटांची निवड करण्यासाठी आमची एक टीम काही महिने राबत होती. ्‘मुरांबा’, ‘शेण्टिमेण्टल’ हे खूप उत्कृष्ट चित्रपट आहेत. परंतु, ते यापूर्वी कोणत्याही वाहिनीवर आले नव्हते. ते आम्ही लवकरच दाखवू. तसेच दर रविवारी प्रेक्षकांना चांगले मराठी चित्रपट पाहायला मिळतील. मराठी चित्रपटांचे सॅटेलाईट राईट्स हक्क घेण्यासाठी आम्ही मोठी आर्थिक गुंतवणूक केली आहे. पण आम्ही चित्रपटांच्या निवडीबाबत खूप चोखंदळ राहणार आहोत. गेली सहा-सात वर्षं साधारणपणे सातत्याने दरवर्षी शंभर चित्रपट प्रदर्शित होत आहेत. मग हे सहाशे चित्रपट गेले कुठे ? त्यापैकी बहुतेकांना कोणत्याही वाहिनीनं हात लावलेला नाही. त्यामुळे आम्हांला चित्रपटांच्या निवडीसाठी चॉईस खूप होता. त्यातून आम्ही चांगल्या चित्रपटांची निवड केली.

– अजय भाळवणकर

ठेवणीतले लेख

आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा[recaptcha]

काही निवडक प्रतिक्रिया:

प्राध्यापक डॉक्टर सुजय पाटील कोल्हापूर

जयश्री दानवे यांचा स्मिता पाटील यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वाचा वेध घेणारा "तेजस्विनी" हा लेख अत्यंत उत्तम असा आहे .स्मिता पाटील यांच्या व्यक्तिमत्त्वातील विविध पैलूंचे अत्यंत समर्पक शब्दात लेखिका जयश्री दानवे यांनी मुल्यमापन केलेले आहे .

संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया