अतिथी कट्टा

दिनांक : २५-०९-२०१८

‌‌‌‌‌‌‌‌‘बॉईज २’चं संगीत म्हणजे नुसती धमाल…


‘बॉईज’ हा गेल्या वर्षींचा सर्वाधिक यशस्वी चित्रपट. या चित्रपटाचा पुढील भाग असलेला ‘बॉईज २’ येत्या ५ ऑक्टोबरला प्रदर्शित आहे. या चित्रपटाची टीम ही जवळपास पहिल्या भागात असलेलीच आहे. चित्रपटाला संगीत अवधूत गुप्ते यांनी दिलं आहे. त्यानिमित्तानं त्यांचं हे मनोगत.

——

५२ आठवड्यांमध्ये साधारण ४०० चित्रपटांची घोषणा होते नि त्यापैकी २०० चित्रपट प्रदर्शित होतात. यापैकी मोजकेच चित्रपट मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांनी घेतले तर ते चालतात. अन्यथा ते चालत नाही, अशी भावना गेली अनेक वर्षं प्रत्येक निर्मात्यामध्ये होती. किंबहुना असा गैरसमज, न्यूनगंड प्रत्येक निर्मात्याच्या मनात होता. परंतु तो पूर्णत: दूर करण्याचं काम गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘बॉईज’ या चित्रपटानं केलं. विशाल देवरुखकरनं ‘बॉईज’ ज्या ताकदीनं बनवला होता, त्याच ताकदीनं त्यानं ‘बॉईज २’देखील बनवला आहे. त्यामुळे तो नक्कीच यशस्वी होईल याची मला खात्री आहे. आमचा ‘सूर नवा ध्यास नवा’ हा कार्यक्रम जर तुम्ही बघत असाल नि ‘बॉईज २’ला तुम्ही ‘जिनिअस’ दर्जा द्याल असं मला वाटतं.

‘बॉईज’च्या यशाचं माझ्यावर अजिबात दडपण आलेलं नाही. कारण आतापर्यंतच्या आयुष्यात मी अनेक चढ-उतार पाहिलेले आहेत. ‘बॉईज’च्या आधी नक्कीच दडपण आलं होतं. कारण दिग्दर्शकासह आमची सगळी टीम नवीन होती. ‘प्रेझेंटर’ म्हणून माझं नाव लावून मी विशालची जबाबदारी घेतलेली होती. मात्र जबाबदारी घेतलेल्या माझ्यासारख्या माणसाचेही यापूर्वीचे काही चित्रपट चालले नव्हते. त्यामुळे त्यावेळी माझ्यावर दडपण होतं. ज्यांनी ‘बॉईज’ बघितलाय आणि ज्यांना तो आवडलाय अशा सगळ्या महाराष्ट्रीयन प्रेक्षकांची ‘बॉईज २’ फिल्म झाली आहे. प्रेक्षकांच्या अपेक्षांना उतरण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. शंभर मार्कांच्या प्रेक्षकांच्या अपेक्षा असतील आणि आम्ही त्यापैकी ७० मार्क्स जरी मिळवू शकलो तरी ते ३० टक्क्यांसाठी आम्हांला माफ करतील.

कारण प्रेक्षकवर्ग हा आमचा आहे नि आम्ही त्यांचे आहोत. या चित्रपटाचं संगीत पहिल्या भागापेक्षा आणखी धमाल आहे. ‘गोटी सोडा बाटली फोडा’ हे गाणं आजच्या तरुणाईसाठी लिहिलं आहे. कोणत्याही पद्धतीचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी कसलंही टेन्शन घ्यायचं नाही, हे सांगणारं ते गाणं आहे. पहिल्या भागातील मुलं आता मोठी झाली आहेत. त्यामुळे ‘बॉईज २’च्या गाण्यांसाठी आम्ही मोठे गायक घेतले आहेत. रोहित राऊत आणि आदर्श शिंदे या दोघांनी ‘गोटी सोडा’ हे गाणं गायलं आहे. या चित्रपटामधील एक प्रेमगीतही रोहितनंच गायलं आहे. ‘गोटी सोडा’च्या ‘म्युझिक अरेंजमेंट’मध्ये यावेळी आम्ही खूप बदल केले आहेत. अनुप साटम, आदिनाथ पाटकर, प्रतिक कावळे या नवीन मुलांनी या गाण्याचं म्युझिक अरेंजमेंट केली आहे. या गाण्यासाठी त्यांनी खूप वेगवेगळी वाद्यं वाजवून मजा वाढवली आहे. हल्ली प्रत्येक चित्रपटामध्ये ‘आयटेम सॉंग’ असते. परंतु, तेच ते ‘आयटेम’ करून आम्हीदेखील कंटाळलो होतो. त्यामुळे काहीतरी वेगळं करायचं या उद्देशानं आम्ही यावेळी काम केलं. या गाण्यासाठी मी गणेश चंदनशिवे यांचा आवाज वापरला आहे. खरं तर ते गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्राला परिचित आहेत. मात्र मी त्यांचा याआधीच गाण्यासाठी उपयोग करायला हवा होता. याच गाण्यात प्रसन्नजीत कोसंबी याचाही आवाज आहे. आमच्या मागच्या ‘सूर नवा ध्यास नवा’ या मागच्या पर्वातही प्रसन्नजीतनं स्टेज गाजवलं होतं. त्याला मी ‘शाहीर’ अशी पदवी दिली आहे. माझ्या यापूर्वीच्या ‘वाघेऱ्या’ या चित्रपटातही प्रसन्नजीत खूप छान गायला होता. आपण नवीन गाडी काढली की कायम त्यातूनच ड्राइव्ह करावंसं वाटतं. तसंच काहीसं प्रसन्नजीतबाबत माझं झालं आहे. त्याचा मला कंटाळाच आलेला नाही. त्यामुळे मी संगीत दिलेली बरीच गाणं अलीकडच्या काळात प्रसन्नजीत गायला आहे. ‘बॉईज’साठी मी अनेक गाण्यांच्या केलेल्या चाली विशालनं रिजेक्ट केल्या होत्या. त्यामुळे माझ्याकडे तेव्हा खूप साठा होता. परंतु, ‘बॉईज २’च्या वेळी विशालनं मला फार त्रास दिला नाही. मी जे काही त्याला ऐकवत होतो, त्याला तो लगेचच मंजुरी देत होता. ‘आयटेम सॉंग’मधील मुलीचा आवाज मुग्धा कर्हाडे हिचा आहे. ती अनेक वर्षं माझ्याकडे काम करतेय. १०वी-१२वीला मेरीटच्या जवळपास मार्क मिळाल्यानंतर तिनं इंजिनिअरिंगची पदवी घेतली. ‘एल अॅंड टी’सारख्या कंपनीत काही वर्षं तिनं नोकरीही केली. तिथली नोकरी सोडून ती आता पार्श्वगायनात करिअर करण्यासाठी दाखल झाली आहे. थोडक्यात, आम्ही सर्वांनी दुसऱ्या भागासाठीही भरपूर मेहनत घेतली आहे.

– अवधूत गुप्ते

ठेवणीतले लेख

    आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा



    [recaptcha]

    काही निवडक प्रतिक्रिया:

    नरेंद्र चौधरी


    आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
    संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया