अतिथी कट्टा

दिनांक : १६-०३-२०१८

‌‘अजय देवगणबरोबर मला हिंदी चित्रपट करायचाय…’


‘ख्वाडा’ या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटानंतर दिग्दर्शक भाऊराव कर्‍हाडे आपली ‘बबन’ नावाची दुसरी कलाकृती घेऊन येत्या २३ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. त्यानिमित्त त्यांच्याशी झालेल्या या गप्पा.
———-

‘ख्वाडा’च्या यशानंतर ‘बबन’ची तयारी कशी तुम्ही सुरू केलीत?

– खरं तर ‘ख्वाडा’ आम्ही बनवला तेव्हाच ‘बबन’ची पटकथा तयार होती. किंबहुना ‘ख्वाडा’ आणि ‘बबन’च्या पूर्ण ‘स्क्रीप्ट’ एकाच वेळी तयार होतं. मात्र यापैकी कोणता चित्रपट आधी करायचा एवढाच आमच्यात विचार सुरू होता. ‘बबन’चं बजेट थोडं जास्त होतं. म्हणून आम्ही आधी ‘ख्वाडा’ करायला घेतला. ऑक्टोबर २०१५ला ‘ख्वाडा’ प्रदर्शित झाला आणि जानेवारी २०१६ मध्येच आम्ही ‘बबन’ची घोषणा केली होती. या चित्रपटातला ‘हिरोइझम’ वेगळा आहे. म्हणून त्याचा त्याच वेळी मी ‘लुक’ डिझाइन केला. आपल्याकडे दाढी असलेला हीरो चालत नाही. पण यावेळी मुद्दाम आम्ही हीरोच्या लुकमध्ये त्याला दाढी ठेवलीय.

‘ख्वाडा’प्रमाणेच ‘बबन’ हादेखील ग्रामीण बाजाचा चित्रपट आहे का? या चित्रपटामधून तुम्ही नेमकं काय मांडणार आहात?

– तसं नाही म्हणता येणार. सगळा महाराष्ट्रच आता निमशहरी होतोय. गावचं गावपण आता संपत चाललंय. गावातल्या लोकांचं राहणीमान बदललंय. गावात जशी मोटारसायकल आली, तशी चारचाकीदेखील आली. औद्योगिकीकरणामुळं गावातल्या लोकांच्या सर्वच गोष्टींमध्ये आता बदल झालाय. तिकडे जशी हरीतक्रांती झालीय, धवल क्रांती झालीय. तरीदेखील लोकांचं शेतीकडे हळूहळू दुर्लक्ष व्हायला लागलं. जिथं शेतीयोग्य जमीन होती, तिथं हरित क्रांती झाली. तिथंच धवल आणि औद्योगिक क्रांतीही झाली. अशा सगळ्या पार्श्‍वभूमीवर सगळीकडे ‘बबन’ उदयाला येतोय. या सगळ्या क्रांतीचा सर्वसामान्यांना फायदा झाला की नाही, याबाबत चित्रपटामधून भाष्य करण्यात आलं आहे. हा ऍक्शन, कमर्शियलच सिनेमा आहे. हा चित्रपट पुण्याजवळच्या निमशहरी भागात घडतो. ‘बबन’ हे अगदी कॉमन नाव आहे. त्याला उकार, वेलांटी, काना, मात्रा, अनुस्वार नाही. हा ‘बबन’ एकतर शामळू असतो, वेडसर किंवा बावळट, नेभळट असतो. मात्र याच बबनचा कधी बबन्या होतो. पण जेव्हा बबनला वाटतं की आपण ‘बबनराव’ व्हावं, तेव्हा काय घडतं याची गोष्ट म्हणजे हा सिनेमा आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक तरुणाचं प्रतिनिधीत्व करील असा हा बबन आहे. प्रत्येकाच्या मनात काही ना काही तरी सुप्त इच्छा असतात. त्या बबनच्या रुपानं पुर्‍या होतील.

‘बबन’मधील कलाकारांची टीम कशी निवडलीत?

– ‘ख्वाडा’तील नायकच ‘बबन’चा नायक आहे. या चित्रपटात एकूण १४० व्यक्तिरेखा आहेत. मोठा कॅनव्हास आहे. हा जरी व्यावसायिक चित्रपट असला तरी मला त्यामधील पात्रं वास्तवदर्शी हवी होती. त्यामुळे मी अनेकांच्या ‘ऑडिशन्स’ घेतल्या. त्यातून मला खूप चांगले कलाकार भेटले. हा चित्रपट नगर जिल्ह्यातील शिरूर येथे ४१ दिवसांमध्ये आम्ही चित्रीत केला. या भागातल्या मातीचे, पिकांचे रंग प्रेक्षकांना विविध प्रसंग तसेच गाण्यांमधून पाहायला मिळतील.

तुमच्या पहिल्या चित्रपटात फक्त एकच गाणं होतं. मात्र ‘बबन’साठी तब्बल पाच गाणी तुम्ही निवडली आहेत. यामागचं कारण काय?

– मी स्वतः दिग्दर्शक असलो तरी प्रथम प्रेक्षक आहे. प्रेक्षकांना पडद्यावर काय पाहायला आवडतं, याला मी अधिक महत्त्व देतो. मनोरंजन हाच माझा मुख्य उद्देश आहे. संगीत हे आपणा भारतीयांच्या रक्तात आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात एक गाणं आहे. या चित्रपटाच्या नायक-नायिकेच्या आयुष्यातही काही गाणी आहेत. म्हणून ती चित्रपटात दाखविण्यात आली आहेत. या चित्रपटामधील पहिली तीन गाणी ‘ख्वाडा’चे गीतकार विनायक पवार यांनी लिहिलेली होती. मला या चित्रपटासाठी नवीन टीम अपेक्षित असल्यामुळे संगीतकारही नवीनच हवा होता. जवळपास पाचशे-सहाशे जणांनी मला संगीतबद्ध केलेली नवीन गाणी पाठवली. खूप गाणी चांगली होती. यापैकी ओंकार स्वरूप या संगीतकाराचं काम मला खूपच आवडलं. पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्रामध्ये तो संगीतामध्ये एम.ए. करीत होता. ओंकारला मी भेटलो तेव्हा त्यानं मला एक चाल ऐकवली. पण तेव्हा मला त्याच्या चालीपेक्षा त्याचा आवाज अधिक भावला. पहिल्याच भेटीत मी त्याला आश्‍वासन दिलं की, माझ्या चित्रपटाला संगीत कोण देईल हे मला माहीत नाही. मात्र माझ्या चित्रपटासाठी तुझ्याकडून मी एक तरी गाणं शंभर टक्के गावून घेणार. सुहास मुंडे त्याचे गीतकार होते. फेब्रुवारी २०१६ मध्ये पहिल्यांदा ओंकारबरोबर माझी भेट झाली. त्यानंतर या चित्रपटाच्या संगीतासाठी आम्ही तब्बल दहा महिने एकत्र काम करीत होतो. प्रेमात पडावीत अशी सगळी गाणी झालीत.

‘ख्वाडा’च्या वेळी तुम्हाला निर्मितीसाठी पैसा उभा करताना खूप संघर्ष करावा लागला. त्या तुलनेत ‘बबन’चा संघर्ष थोडा सोपा होता का?

– तशी सोपी होती. ‘ख्वाडा’मुळे एक वलय तयार झालं. नाव मिळालं. पैसे काहीच मिळाले नाहीत. ‘ख्वाडा’नंतर करायचं काय, हा एक मोठा प्रश्‍नच होता. गावाकडं जे होतं-नव्हतं ते सगळं विकलं होतं. ‘ख्वाडा’तला माझा ऍक्टर मित्र मला म्हणाला की, आपण एवढं हरून चालणार नाही. आपल्याला पुढचा सिनेमा करावाच लागणार. याच वेळी गावाकडचे चार मित्र एकत्र आले नि आम्ही चित्रपट करायचं ठरवलं. त्यामुळे निर्माता शोधण्यात माझा वेळ गेला नाही. ‘ख्वाडा’च्या तुलनेत या चित्रपटाचं बजेट दुप्पट होतं. पटकथेमधील सगळ्या गोष्टी या चित्रपटात उतरवण्याचा प्रयत्न केलाय. ३००-३५० थिएटर्स आणि दीड-दोन हजार स्क्रीन्सवर हा चित्रपट प्रदर्शित होईल.

‘ख्वाडा’ प्रदर्शित झाल्यानंतर तुमच्यावर समाजाच्या चोहो बाजूंकडून कौतुकाचा वर्षाव झाला. विविध पुरस्कारही मिळाले. परंतु, यापैकी सर्वात लक्षात राहणारी प्रतिक्रिया कोणाकडून मिळाली होती?

– ‘ख्वाडा’ पाहिल्यानंतर सर्वसामान्य प्रेक्षकांपैकी मनोहर मुंगी आणि जोशी काका या दोघांकडून मला अविस्मरणीय अशी दाद मिळाली. या दोघांचं वय सत्तरीच्या आसपास असेल. या दोघांनी माझ्या कलाकृतीचं भरभरून प्रेम केलं आणि माझा निरोप घेताना एक शंभराची नोट खिशामधून काढून माझ्या हातामध्ये ठेवली. तेव्हा मी त्यांना ‘पैसे नको, तुमचा आशीर्वाद पुरेसा आहे,’ असं सांगितलं. त्यावर हे दोघेही म्हणाले की, ‘आम्ही दिलेले शंभर रुपये हे खाऊसाठी नाहीत. हे पैसे तू तुझ्या पुढील चित्रपटासाठी वापर आणि आम्हा प्रेक्षकांना आणखी एक चांगला सिनेमा दे.’ हे वाक्य ऐकल्यानंतर माझ्या डोळ्यात अश्रू उभे राहिले आणि तेव्हा मला पहिल्यांदा जाणवलं की ‘बबन’साठी आपल्याकडे निर्माता आहे. त्या शंभर रुपयांच्या जोरावर मी ‘बबन’ सुरू केला आणि त्या दोघाही जणांनाही मी निर्माता म्हणून श्रेयनामावलीमध्ये स्थान देणार आहे. ‘शंभर’ची नोट मी जपून ठेवली होती आणि ‘बबन’चं काम सुरू झालं तेव्हाच मी ती खर्च केली.

तुझ्या थोडा चित्रपट क्षेत्रात आलेला नागराज मंजुळे सध्या सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यासमवेत एक हिंदी चित्रपट करतोय. तुझाही भविष्यात हिंदीत जाण्याचा विचार आहे का?

– नक्कीच मला हिंदी चित्रपट करायचा आहे. आणखी एका मराठी चित्रपटाची माझी गोष्ट तयार आहे. त्याची चारही गाणी तयार आहेत. तो झाल्यानंतर मग मी हिंदी चित्रपट करीन. मला अजय देवगणबरोबर काम करायचंय. तो ताकदीचा अभिनेता आहे. त्याच्या डोळ्यांमधील ताकद मला इतर कलाकारांमध्ये दिसत नाही. त्याच्याबरोबर एक तरी सिनेमा मला करायचाच आहे.

– मंदार जोशी

ठेवणीतले लेख

    आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा



    [recaptcha]

    काही निवडक प्रतिक्रिया:

    नरेंद्र चौधरी


    आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
    संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया