अतिथी कट्टा

दिनांक : २०-०१-२०१८

‌ कला दिग्दर्शनातील आव्हाने स्वीकारायला आवडते- -देवदास भंडारे


चित्रपट माध्यमात अनेक प्रकारच्या कलांचा समावेश आहे . त्यातीलच एक महत्त्वपूर्ण आहे कला दिग्दर्शन. पण नुसते सेट लावले अथवा देखावे निर्माण केले म्हणजेच कला दिग्दर्शन नाही असे पंचवीस वर्षाहून अधिक काळ असलेले कला दिग्दर्शक देवदास भंडारे सांगत आहेत.
———-

प्रश्न- एकाद्या चित्रपटाचे कला दिग्दर्शन करताना तुम्ही जास्त प्राधान्य कशाला देता?
उत्तर- सर्वप्रथम त्या चित्रपटाचा विषय मी जाणून घेतो. तो जर आवडला की चित्रपट हे माध्यम व व्यवसाय अशा दोन्हीतील समन्वय साधणारे पाऊल मी टाकतो. म्हणजेच मी त्या चित्रपटाचा निर्माता-दिग्दर्शक, पटकथाकार व कॅमेरामन यांच्याशी सखोल चर्चा करतो. ती करणे प्रत्येक टेक्निशियनसाठी खूपच महत्त्वपूर्ण असते. त्या बैठकीत त्या विषयावर नेमके काय काय करायला हवे याचा ग्राफ तयार होतो. तसेच त्या इतरांचा चित्रपट माध्यमाकडे पाहण्याचा दृष्टिकोन स्पष्ट होतो. कोणाला आपल्या चित्रपटातून काही विशेष गोष्ट मांडायची असते. कोणी पिरियड फिल्म बनवण्यास इच्छुक असतो. तर कोणाला मसाला चित्रपट निर्माण करायचा असतो. यापैकी कोणतेही काम सोपे नसते हे दीर्घकालीन अनुभवावरून सांगतो.

प्रश्न- याच्या पुढची पायरी कोणती? बजेट कसे ठरते?
उत्तर-चित्रपटाच्या थीमनुसार बजेट ठरते. ऐतिहासिक चित्रपटासाठी अभ्यास करून मग सेटसाठीच्या गोष्टी नेमक्या कुठे व कशा मिळतील हे सगळेच पहावेच लागते. यात खूपच पेपरवर्क असते. कोणत्याही चित्रपटाचा विषय ऐकताच डोक्यात विचारचक्र सुरु होते. मी कोणत्याही प्रकारच्या वादविवादापासून कायमच दूर राहिलोय. म्हणूनच मी माझ्या कामाला जास्तीत जास्त न्याय देण्याचा प्रयत्न करतो. विषयानुसार कुठे कसा सेट लावायचा याची रेकी करतो. बाह्यचित्रीकरण स्थळी कशा परवानग्या घ्याव्या लागतील हे पाहतो. अशाच अनेक गोष्टींतून चित्रपट आकार घेत असतो.

प्रश्न-तुमचे काही उल्लेखनीय सेट सांगा.
उत्तर-तसे खूपच आहेत. काही सांगावेसे वाटतात. ‘तप्तपदी ‘ चित्रपटासाठी १९४२ चा म्हणजेच पंचाहत्तर वर्षापूर्वीचा काळ उभा करायचा होता. तेव्हाचा वाडा, डिस्पेंसरी वगैरे उभे केले. त्या काळातील वाहनही तयार केले. ‘कोती ‘ चित्रपटाच्या मध्यवर्ती सूत्रानुसार लहान मुलगा मुलीसारखा वागतो असे आहे. त्यासाठी मला छक्क्यांच्या घरातील आतला भाग उभा करायचा होता. अनिल सुर्वे दिग्दर्शित ‘आजचा दिवस ‘ या चित्रपटात सत्तरच्या दशकातील गिरगाव उभे केलेय. तेव्हाची चाळ संस्कृती, दहा बाय दहाची घरे, शेजारधर्म वगैरे उभे केलेय . फार पूर्वी मी दक्षिण मुंबईत राह्यचो याचा मला यासाठी काही फायदा नक्कीच झाला. नरेश बिडकर दिग्दर्शित ‘वन्स मोअर ‘ या चित्रपटासाठीही कला दिग्दर्शन करणे आव्हानात्मक होते. एक म्हणजे त्यात चार हजार वर्षापूर्वीचा काळ उभा केलाय. त्याच चित्रपटात आजचे कार्पोरेट विश्व देखील उभे केलेय. ते गोव्यात केले. आता शौनत शिरोळे दिग्दर्शित भाई कोतवाल यांच्या आयुष्यावरील चित्रपटासाठी मला १९१३ ते ४२ हा काळ उभारण्याचा आनंद घ्यायचाय . आपण फक्त एक सेट लावला की दुसरा असे करीत नाही. त्या कामाचा शक्य तेथे आनंदही घेतोय. या वाटचालीत मला कला दिग्दर्शक एम. एस. शिंदे यांचीही आठवण येते. ऐंशीच्या दशकात मी त्यांच्याकडून कला दिग्दर्शनाचे धडे गिरवले.

प्रश्न-किती भाषांच्या चित्रपटासाठी कला दिग्दर्शन केले? या वाटचालीत पुरस्कार वगैरे..
उत्तर-मराठी, हिंदी, राजस्थानी या भाषेच्या चित्रपटांसाठी कला दिग्दर्शक म्हणून भरपूर काम केलेय. अनेक जाहिरातपटासाठीही विविध विषयांवर सेट लावलेत. या प्रवासातील महत्त्वाचा पुरस्कार म्हणजे, तप्तपदी चित्रपटासाठीचा सह्याद्री वाहिनीकडून मिळाला व मी खूप खूप सुखावलो.

ठेवणीतले लेख

    आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा



    [recaptcha]

    काही निवडक प्रतिक्रिया:

    नरेंद्र चौधरी


    आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
    संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया