अतिथी कट्टा

दिनांक : १६-०२-२०१९

‌‌‌‌‌‌‌‌आनंदी-गोपाळचा प्रवास माणूस या नजरेतून…
आनंदीबाई आणि गोपाळराव जोशी यांच्या आयुष्यावर आधारलेला ‘आनंदी गोपाळ’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. त्यानिमित्तानं या चित्रपटाचे दिग्दर्शक समीर विद्वांस यांचं हे मनोगत.

——

लहानपणी मी शाळेत असताना आनंदीबाईंबद्दल ऐकलं, वाचलं होतं. या बाई तिकडे जाऊन डॉक्टर झाल्या आणि त्या मराठी होत्या, एवढ्यापुरतीच तेव्हा माझी माहिती मर्यादित होती. नंतर जेव्हा मी मोठा झाल्यानंतर त्यांच्याबद्दल वाचायला लागलो, तेव्हा कळलं की त्यांच्यासोबत त्यांचे पती गोपाळराव होते. आनंदीबाईंनी शिकलं पाहिजे असा त्यांनी हट्ट धरला. म्हणून त्या शिकल्या. आनंदीबाईंनीच आपल्याला डॉक्टर बनायचंय असा निर्णय घेतला. मग या विषयाची ‘ग्रॅव्हिटी’ मला अजून कळली. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीशी एक स्त्री असते हे विधान काही आपल्यासाठी नवीन नाही. पण प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या सोबतीने असतो तिला प्रोत्साहन देणारा ‘तो’! अशाच एका ध्येयवेड्या जोडप्याची गोष्ट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. काही जोडपी अशी असतात, जी आपल्या ध्येयपूर्तीसाठी वेगळी वाट निवडतात आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी नवीन पाऊलवाट मोकळी करून देतात. ‘आनंदी’ आणि ‘गोपाळ’ असंच एक जोडपं. त्यांच्या प्रेरणादायी जीवनसंघर्षावर आधारलेला हा चित्रपट आहे. १८८२ साली जेव्हा स्त्रीने उंबरठा ओलांडून जाणे समाजमान्य नव्हते तेव्हा वयाच्या केवळ अठराव्या वर्षी सातासमुद्रापार बोटीनं परदेशी जाणारी पहिली स्त्री. फक्त भारतातच नव्हे तर परदेशातही कुचेष्टा, अवहेलना, अपमान सहन करीत हाती घेतलेले वैद्यकीय शिक्षण जिद्दीने पूर्ण करणारी स्त्री म्हणजेच आनंदीबाई आणि अशा यशस्वी स्त्रीच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून तिला साथ देणारे गोपाळराव. वयाच्या नवव्या वर्षी आनंदीबाईचं लग्न गोपाळराव जोशी यांच्याशी झालं. ज्या काळात स्त्री शिक्षण म्हणजे व्यभिचाराला आमंत्रण मानले जायचे अशा कठीण काळी “मी आनंदीबाईंना मनाप्रमाणे शिकवेन” अशी अट गोपाळरावांनी लग्नाआधी आनंदीबाईच्या वडिलांना घातली होती. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून वेळप्रसंगी समाजाचा रोष पत्कारून गोपाळरावांच्या सोबतीने आनंदीबाई फक्त शिकल्याच नाहीत तर आणि भारतातील पहिल्या महिला डॉक्टर होण्याचा मान त्यांनी मिळवला. त्यांचा हाच ध्येयवेडा प्रवास ‘आनंदी गोपाळ’ मध्ये पाहायला मिळणार आहे.

मला हा विषय साकारण्यासाठी निर्मात्यांकडून बोलावणं आलं तेव्हा मला पहिल्यांदा असं वाटलं की हे आपल्याला का नाही सुचलं? तसेच हा विषय या मंडळींना कसा काय सुचला असेल असा विचारही माझ्या मनात तेव्हा आला होता. या दुसऱ्या प्रश्नामध्ये उत्तर आहे. हा चित्रपट म्हणजे आनंदीबाई अमेरिकेला निघाल्या, तिथं पोचल्या आणि डॉक्टर बनून आल्या एवढ्यापुरताच मर्यादित नाहीए. हा चित्रपट म्हणजे आनंदी आणि गोपाळची कथा आहे. या दोघांचा प्रवास आहे. म्हणून हा प्रवास निर्माते अमराठी असले तरी त्यांना तो अधिक ‘अपील’ झाला. ‘बायोपीक’ म्हणजे अभिमान, प्रेरणेची कथा असते. तशी ती या चित्रपटामध्ये आहेच. परंतु, या कथेमध्ये आनंदी आणि गोपाळ या नवरा-बायकोकडे खूप वेगळ्या पद्धतीनं पाहण्यात आलं आहे. त्यांच्याकडे सवंगडी, मित्र, माणूस म्हणून पाहिलंय. मला हा ‘टेक’ खूप आ‌वडला. आपण या मंडळींना कायमस्वरूपी मोठंच म्हणून पाहत आलोय. या दोघांना माणूस म्हणून ते कसे होते हे आपल्याला चित्रपटाद्वारे सांगता येईल याचा मला अधिक आनंद झाला.

या चित्रपटाचा काळ जुना होता. या चित्रपटासाठी काम करणं अवघड होतं. त्यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे आमच्याकडे आनंदीबाई आणि गोपाळराव यांच्या काळाची फारशी माहिती नव्हती. १९०० पर्यंतच्या काळाबद्दल आपल्याला इतिहासात तपशीलवार वाचायला मिळतं. मात्र आपल्या चित्रपटाची कथा १८८६-८७ला संपते आणि कलकत्त्यामध्ये वीज आली ती १८९० मध्ये. म्हणजे वीज भारतात येण्या आधीचा काळ आम्हाला चित्रपटातून दाखवायचा होता. त्यामुळे आम्हाला खूप मागं जायचं होतं. तेव्हा तसं करीत आम्ही सहा-सात महिने संशोधन केलं. करण शर्मा आणि इरावती कर्णिक यांनी चित्रपटाची ‘स्क्रीप्ट’ खूप छान लिहिली आहे. हल्लीच्या काळात चार-पाच वर्षांमध्ये फॅशन बदलायची. पूर्वीच्या काळात तशी ती झटकन बदलायची नाही. बऱ्याच गोष्टी आपल्याला माहिती नसलेल्या तेव्हा होत्या. आनंदी-गोपाळरावांवरच्या काही कादंबऱ्या वाचल्या. त्यातून आम्हाला बरीचशी माहिती मिळाली. त्यातून आम्ही त्या काळाकडे बघितलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक आणि भारताला १९४७ला मिळालेलं स्वातंत्र्य या दरम्यानच्या कालावधीदरम्यानचा आपल्याकडचा इतिहास खूप कमी प्रमाणात वाचायला मिळतो. त्यामुळे चित्रपटाचा हा काळ उभा करणं कठीण होतं. या चित्रपटासाठी आम्हाला खूप ‘लोकेशन्स’ हवी होती. तसेच मराठी चित्रपटांचं बजेट लक्षात घेऊन आम्हाला सगळं चित्रीकरण पूर्ण करायचं होतं. बरीच लोकेशन्स शोधलं. पुणे, वाई, सातारा, कुरुंदवाड, मुंबईपासून अगदी विदेशी जाऊन जॉर्जियातही शूट केलं. तब्बल एक वर्षं आमचं शूटिंग चाललं. वैभव, हृषिकेश, सौरभ जसराज या चौघांनी संगीतामध्ये बहार आणलीय. या चित्रपटाच्या गीत-संगीताच्या आघाडीवर त्यांनी खूप मेहनत घेतल्यामुळे चित्रपटाचा मोठा प्रभाव पडतो. आनंदी गोपाळ चित्रपटामध्ये ऋषिकेश-सौरभ-जसराज ह्या त्रयीच्या संगीताने सजलेली पाच गाणी आहेत आणि सध्या सोशल नेटवर्कवर रंग माळियेला हे गाणं तुफान लोकप्रिय झालं आहे. काही दिवसांतच लाखाच्यावर हिट्स मिळवलेल्या या गाण्यांबद्दल प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. यातही विशेष उल्लेख करावा लागेल तो ‘आनंद घना’ आणि ‘तू आहेस ना’ या गाण्यांचा. यातील सर्व गाणी वैभव जोशी यांनी शब्दबद्ध केली आहेत तर केतकी माटेगावकर, शरयू दाते, आनंदी जोशी, प्रियांका बर्वे, जसराज जोशी, ऋषिकेश रानडे, राहुल देशपांडे, अवधूत गुप्ते, आदर्श शिंदे, रोहित राऊत यांच्या सोबतीने पं. संजीव अभ्यंकर यांनी ती स्वरबद्ध केली आहेत. सचिन लव्हलेकर यांनी वेशभूषेत कमाल केलीय. सचिन माझ्यासोबत नसता तर आत्ता जशी फिल्म दिसतीय तशी ती दिसली नसती. मेहनत, संशोधनाच्या आघाडीवर त्यानं खूप छान काम केलंय. आम्ही खरं तर पहिल्यांदाच एकमेकांसोबत काम केलंय. या चित्रपटात गोपाळ आणि आनंदी यांच्या भूमिकेत अभिनेता ललित प्रभाकर आणि भाग्यश्री मिलिंद ही जोडी बघायला मिळणार आहे. याशिवाय चित्रपटात गीतांजली कुलकर्णी, क्षिती जोग, योगेश सोमण, बाल कलाकार अंकिता गोस्वामी आणि अथर्व फडणीस यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटाची पटकथा करण शर्मा यांची असून, संवाद इरावती कर्णिक यांचे आहेत. चित्रपटाचे संकलन चारू श्री रॉय यांनी केलंय. सुनील निगवेकर आणि निलेश वाघ यांचे कला दिग्दर्शन या चित्रपटाला लाभले असून सौरभ भालेराव यांचे पार्श्वसंगीत आहे. आकाश अग्रवाल यांनी छायाचित्रणातून आनंदी गोपाळचे भावविश्व चितारले आहे.

– समीर विद्वांस

ठेवणीतले लेख

  आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा  [recaptcha]

  काही निवडक प्रतिक्रिया:

  सचिन पारेकर


  शाहू मोडक हे मराठी चित्रपटातील असामान्य कलाकार होते. 'माणूस' मधील त्यांची भूमिका अविस्मरणीय होती.विनम्र अभिवादन!💐💐

  संजय रत्नपारखी
  संदर्भ:- फेसबुक प्रतिक्रिया