अतिथी कट्टा

दिनांक :

वसंत देसाईंच्या संगीताची मोहिनी…


विख्यात संगीत दिग्दर्शक वसंत देसाई यांचा ९ जून हा जन्मदिन. त्या निमित्तानं त्यांच्या मराठी चित्रपटसृष्टीतील वाटचालीला उजाळा देणार्‍या मधु पोतदारलिखित आणि मंजुल प्रकाशनच्या ‘वसंतवीणा’ या पुस्तकामधील हा संपादित भाग.
——-

१९४७ ते १९७५ या तीस वर्षांच्या कालावधीत वसंतरावांच्या वाट्याला अवघे २० मराठी चित्रपट आले. तरीसुद्धा गंमत अशी, की ज्या महाराष्ट्रीय (मराठी) संगीतकारांनी हिंदी चित्रपटसृष्टीत आपला स्वतंत्र ठसा उमटवला अशा संगीतकारांत म्हणजे मुख्यत: सी रामचंद्र, एन दत्ता, स्नेहल भाटकर इत्यादी. सर्वांत अधिक मराठी चित्रपट वसंतरावांच्याच वाट्याला आले, असे म्हणावे लागेल. या वीस चित्रपटांत ‘राजकमल’चे तीन चित्रपट होेते. (‘लोकशाहीर रामजोशी’, ‘अमर भूपाळी’ व ‘इये ये मराठीचिये नगरी’) ‘राजकमल’चा ‘लोकशाहीर रामजोशी’ हा जरी वसंतरावांनी संगीत दिलेला पहिला मराठी चित्रपट असला तरी, त्यापूर्वी म्हणजे सुमारे त्याच्या अकरा वर्षे आधीच वसंतरावांनी ‘हंस पिक्चर्स’च्या मा. विनायकनिर्मित ‘छाया’ या चित्रपटातील दोन गाण्यांना संगीत दिले होते.
‘छाया’ला सुरुवातीला अण्णासाहेब माईणकरांनी संगीत द्यायला सुरुवात केली ‘चल लगबग’ व ‘कंपित का तव काया’ या दोन गाण्यांना चाली देऊन ते चित्रपट सोडून निघून गेले. मग मा. विनायकांनी त्यांचे जिवलग मित्र म्हणजेच वसंतराव यांना बोलावून घेतले. पण वसंतराव त्या वेळी ‘प्रभात फिल्म कंपनी’त संगीत विभाात काम करत होते. ‘प्रभात’ची शिस्त व नियम त्या काळी फारच कडक होते. तरीसुद्धा वसंतरावांनी आपल्या मित्रासाठी म्हणजेच मा. विनायकांसाठी काम करायचे ठरवले. त्यांनी ‘छाया’मधील ‘शाम माझा पहिला’ व ‘धनहीना ललनांना’ या दोन गाण्यांना अतिशय सुरेख चाली लावल्या. ही दोन्ही गाणी सुप्रसिद्ध लेखक वि. स. खांडेकरांनी लिहिली होते. त्यांच्याच कथेवर ‘छाया’ काढला होता. या चित्रपटामधील बाकीच्या गाण्यांना धम्मन खॉंनी संगीत दिले होते. तीन संगीत दिग्दर्शक लाभलेला हा पहिलाच चित्रपट. वसंतरावांनी हे संगीत केले ते केवळ विनायकांवरील प्रेमापायी! पण हा ‘गुपचुप व्यवहार’ असल्यामुळे चित्रपटाच्या श्रेयनामावलीत अर्थातच वसंतरावांचे नाव नव्हते.
१९४९चा ‘साखरपुडा’ हा वसंतराव जोगळेकरांचा चित्रपट होता. यातील गाणी विनोदिनी दीक्षित (पूर्वाश्रमीची विनोदिनी देसाई) यांनी गायली होती. साखरपुड्याची कथा, संवाद मालतीबाई बेडेकरांची (विभावरी शिरूरकर) होती तर गाणी सुप्रसिद्ध कवयित्री संजीवनी मराठी यांनी लिहिली होती. ‘साखरपुडा’मध्ये ही भट्टी इतकी चांगली जमली होती, की वसंतराव जोगळेकरांनी मालतीबाईंचीच कथा व संजीवनी मराठ्यांची गाणी घेऊन ‘हळदी कुंकू’ नावाच्या चित्रपटाची घोषणा करून त्याचेही संगीत वसंतराव देसाई यांनाच द्यायचे ठरवले. याबरोबरच वसंतराव जोगळेकरांनी स.अ. शुक्लांची कथा व गाणी घेऊन ‘भस्मासूर मोहिनी’ या हिंदी, मराठी पौराणिक चित्रपटाचीही सुरुवात केली. याही चित्रपटाचे संगीत वसंतराव देसाई यांचेच होते. पण दुर्दैवाने ‘हळदी कुंकू’ व ‘भस्मासूर मोहिनी’ हे दोन्ही चित्रपट पुरे होऊ शकले नाहीत.
१९५० सालचा ‘क्रांतिवीर वासुदेव बळवंत’ हा आद्य क्रांतिकारकावरचा अतिशय सर्वांगसुंदर चित्रपट! कविवर्य शंकर बा. शास्त्रींनी यातली गाणी लिहिली होती. शास्त्रींची गाणी त्या काळाच्या अनुरूप अशी होती. त्यातल्या भोंडल्याच्या गाण्यात ‘ऐका टोपीवाल्याची शर्थ काढा आगिनगाडीचं तिकीट वाजतंय कडकट कडकट…कडकट’ असा वासुदेव बळवंतांच्या काळातील ब्रिटिशांनी केलेल्या सुधारणांचा उल्लेख आहे तसेच-
काशीबाई, काशीबाई नवरा कसा?
टोपीवाल्याचा कारकून खासा
शेंडीला मिळाला काट, मिशीला चाट, जानव्याला खुंटी
करितो साहेबाशी येसफेस गोष्टी येसफेस गोष्टी
फिरंगी शिरला घरोघरी बघा या नवलाच्या परी
अशी घरोघरी होत असलेल्या बदलाची दखल घेतली आहे.
पेशवाई संपली तरी तिचा प्रभाव असणारा तो काळ. त्यामुळे काही लावण्या तसेच राष्ट्रप्रेमाची गाणीही त्यात होती. वासुदेव बळवंतांच्या काळाचे भान ठेवूनच वसंतरावांनी त्या काळची वाद्ये वापरून तसे संगीत दिले होते.
तीच गोष्ट चित्रपटातल्या वातावरण निर्मितीची! या चित्रपटातल्या प्रसंगांना खरा उठाव मिळाला, तो त्या काळच्या अस्सल मराठी सजावटीमुळे!
मुंबईच्या एका गुजराती स्टुडिओत ‘वासुदेव बळवंत’चे चित्रीकरण झाले. तिथे ‘त्या काळ’चे मराठी वातावरण दाखवणे खरोखर अवघड होते. पण पुण्याच्या ‘राजा केळकर म्युझियम’चे दि. गं. केळकर यांनी त्यांच्या संग्रहातील अनेक मौल्यवान ऐतिहासिक वस्तू पुरवून ‘वासुदेव बळवंत’चे वातावरण जिवंत केले. या चित्रपटाच्या यशाचे निम्मे श्रेय त्यातील वातावरण निर्मितीला आहे.
याच सुमारास आचार्य अत्र्यांची वसंतरावांशी ओळख झाली. आचार्य अत्रे रोज संध्याकाळी त्यांचे परममित्र कृ.पां. कुलकर्णी (नाना) व वनमाला यांच्यासह शिवाजी पार्कवरून चौपाटीवर फिरायला जात.
एके दिवशी समुद्रावरून फिरून परत येत असताना आचार्य अत्रे वनमाला व नानांसह वसंतरावांच्या ‘परिमल’मध्ये आले. अत्र्यांनी नेहमीप्रमाणे त्यांच्या मोठ्या आवाजात, ‘‘काय वसंतराव, काय चाललंय?’’ अशी चौकशी केली. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर अत्रे म्हणाले, ‘‘वसंतराव, काही नवीन ऐकवा की.’’
वसंतरावांनी मग त्यांना हार्मोनिमवर नुकत्याच झालेल्या ‘अमर भूपाळी’मधील ‘लटपट लटपट तुझं चालणं’ हे गाणं ऐकवलं. अत्रे ती चाल ऐकून इतके खूष व प्रभावित झाले, की वसंतरावांना पाठीवर थाप मारीत म्हणाले, ‘‘वसंतराव, माझ्या पुढच्या चित्रपटाचं संगीत तुम्ही करायचं!’’
आणि अत्र्यांनी त्यांचा शब्द पाळला, लवकरच म्हणजे १९५२ सालीच त्यांनी ‘ही माझी लक्ष्मी’ या चित्रपटाचे संगीत वसंतरावांवर सोपवले. कष्ट न करता पैसा मिळवून श्रीमंत होण्याचा बेत अखेर कसा अंगावर येतो, याचे सुंदर चित्रण त्या चित्रपटात होते. त्या काळात पुण्यात ‘टिळक पोल्ट्री’ नावाचे एक जुगारी योजनेचे प्रकरण फार गाजले होते. शंभर रुपये देणार्‍या सभासदाला या योजनेनुसार रोज अर्धा शेर दूध व दोन अंडी मिळत. पुढे या योजनेचे दिवाळे वाजले. अत्र्यांनी त्यावरून आपल्या कथेत ‘कामधेनू डेअरी’ निर्माण करून अनेक विनोद त्यातून निर्माण केले होते.
‘ही माझी लक्ष्मी’त बारा गाणी होती. या चित्रपटाच्या वेळी वनमाला एकदा अत्र्यांना गंमतीने म्हणाली, ‘‘तुमच्या त्या ‘बी.ए.बी.टी.टी डी.(लंडन)’ वर गाणे लिहा की!’’
आणि गंमत म्हणजे अत्र्यांनी त्यावर बसल्याजागी एकटाकी अशी लावणी लिहिली ती म्हणजे-
‘‘मुंबईच्या कॉलेजात गेले पती, माझे गेले पती |
शिकून आले बी.ए.बी,टी.,बाई, बी.ए.बी.टी॥
याबरोबरच ‘लई दिवसांनी आला तुम्ही रावजी’ अशी ही दुसरी एक लावणी अत्र्यांनी लिहिली.
या दोन्ही फर्मास लावण्यांना तितक्याच ठसकेबाज चाली लावून वसंतरावांनी त्या सुलोचना चव्हाणकडून म्हणून घेतल्या. याशिवाय ‘उठी गोपाळजी, जाई धेनूकडे’ ही पारंपारिक भूपाळी, तर ‘चांदीच्या वाटीत खाई दहीभात’ व ‘जीवाचा जिवलग, प्रेमाचा सागर’ ही साने गुरुजींच्या पत्रीचा प्रभाव असलेली गाणी, त्याचप्रमाणे ‘झरझर झर जा मेघांनो गर्जत गर्जत दाही दिशा’ हे वसंत सबनीसांनी लिहिलेले त्या वेळी ‘नवाकाळ’मध्ये गाजलेले गीतही ‘ही माझी लक्ष्मी’मध्ये होते. मृत मुलाला उद्देशून गायलेले अंगाई गीत ‘शेवटची बाळा माझ्या करी रे अंगाई’ हा तर चित्रपटातला परमोच्च बिंदू होता. अंगाईगीतातील कल्पना, भावना व स्वर एकमेकांना पूरक ठरली. थोडक्यात वसंतरावांचे संगीत अत्यंत हृदयस्पर्शी व भावपूर्ण असे होते. ‘ही माझी लक्ष्मी’त वृंदावन-शुभं करोती हे आत्मीयतेने आणून अत्रे प्रेक्षकांच्या भावनेला पुलकित करतात. कौटुंबिक जीवनातले सौंदर्य आणि मांगल्य त्यांनी या कथेत चितारले होते. दिग्दर्शनातही कौशल्य दाखवले होते. पण इतके करूनही हा चित्रपट म्हणावा तितका यशस्वी झाला नाही. ही गोष्ट अत्र्यांना फार लागली. त्यात भरीसभर म्हणून सार्वत्रिक निवडणुकीत समाजवादी पार्टीतर्फे उभे असलेले अत्रे पराभूत झाले. त्या निराश अवस्थेत त्यांना आठवण झाली ती साने गुरुजींच्या चितेसमोर ‘श्यामची आई’ रुपेरी पडद्यावर आणावयाची प्रतिज्ञा केल्याची!
मग त्यांनी वसंत बापटांच्या मदतीने खंडाळ्याला जाऊन ‘श्यामची आई’ची पटकथा लिहिली. १९५२च्या एप्रिलमध्ये ‘चंपावती’ बोटीने ते हर्णे बंदरात गेले व तिथून गुरुजींच्या पालघर, दापोली इ. भागांत जाऊन ‘श्यामची आई’च्या बाह्य चित्रीकरणाची जागा नक्की केली.
१९५२च्या मे महिन्यात मुंबईच्या בज्योती स्टुडिओ’त ‘श्यामची आई’चा मुहूर्त होऊन चित्रीकरणास सुरुवात झाली. ‘श्यामची आई’तील ‘घनदाट रानी वाहे झुळझुळ पाणी’ हे गाणे कविवर्य वसंत बापटांनी लिहिले.
बाकीची गाणी अत्र्यांनी लिहिली. त्यातील चिंधीचे गाणे आचार्य अत्र्यांनी पूर्ण केले असे म्हणायचे कारण म्हणजे त्याच्या सुरुवातीच्या पहिल्या दोन ओळी साने गुरुजींच्या आहेत. याशिवाय राजकवी यशवंतांची ‘आई’ ही कविताही घेतली होती.
‘श्यामची आई’ या अलौकिक चित्रपटाच्या यशाचा वाटा साने गुरुजींच्या अमर कथेत आहे तसाच तो वसंतरावांनी दिलेल्या अमर संगीतामध्येही आहे.
आचार्य अत्रे यांनी आपल्या ‘कर्‍हेचे पाणी’ या आत्मचरित्रात वसंतराव देसाईच्या संगीताचे अगदी पोटभरून आणि योग्य तेच कौतुक केले आहे. आचार्य अत्रे म्हणतात, ‘‘ ‘श्यामची आई’ ही मूळ गोष्ट अतिशय भावनाप्रधान असल्याने ती परिणामकारक होण्यास, तिला अनुकूल आणि प्रभावी संगीताची जोड हवी होती आणि हे संगीत भारतीय संस्कृतीचा आणि महाराष्ट्रीय जीवनाचा परिपोष करणारे असे असायला पाहिजे होते. असे संगीत देण्याचे पावित्र्य व सामर्थ्य ज्याच्या अंगी आहे असा एकच संगीत दिग्दर्शक या भारतात आणि तो म्हणजे वसंतराव देसाई! म्हणून मी वसंतराव देसाई यांचे नाव पहिल्यापासूनच माझ्या मनाशी योजून ठेवले होते. पण त्यांच्या पात्रतेइतका पैसा त्यांना द्यावयाला माझ्याजवळ कुठे होता? दोन हस्तक आणि तिसरे मस्तक एवढेच माझ्याजवळ भांडवल. आणि त्या भांडवलाच्या जोरावरच मी वसंतरावांसारखा मोठा कलावंत ह्या चित्रपटासाठी मिळवू शकलो.
‘‘वसंतरावांचे’ दुसरे वैशिष्ठ्य हे, की ते माझ्याइतकेच गुरुजींचे प्रेमी होते. त्यामुळे गुरुजींच्या त्या प्रेमाने त्यांनी ह्या कामाला आत्मीयतेने वाहून घेतले अन् आपले सर्वस्व या चित्रपटात ओतले. त्यांच्या गुणांचे काय वर्णन करावे?
‘श्यामची आई’त अवघी सहाच गाणी आहेत. पण प्रत्येक गाण्याला त्यांनी लावलेली चाल आणि तिची केलेली स्वररचना अविस्मरणीय आहे!
‘चिंधी’च्या गाण्याला वसंतरावांनी जी चाल लावली आहे तिने महाराष्ट्रीय स्त्री गीतांची परंपरा इतकी उज्ज्वल केलेली आहे, की त्या गाण्यातल्या काव्याच्या पोटात संगीत लुप्त होते. हाच संगीत दिग्दर्शकाचा खरा विजय आहे.
‘राजकवी यशवंतांच्या ‘आई’ या महान कवितेला विलक्षण भावनाविव्हल चाल लावून, होनाजी बाळाच्या ‘अमर भूपाळी’ प्रमाणे वसंतरावांनी तिला अमर करून टाकली आहे. त्यामुळे ते गाणे म्हणजे त्या चित्रपटातल्या करुण रसाचा परमोच्च बिंदू ठरतो, तो केवळ वसंतराव संगीत दिग्दर्शक होते म्हणूनच. ह्या चित्रपटातले पार्श्‍वसंगीत हा तर वसंतरावांच्या प्रतिभेचा दुसरा चमत्कार होय. आपल्या स्वरांच्या जादूने त्यांनी न बोलका भाग बोलायला लावला आणि शब्दाशब्दातून रसाचे फवारे उचंबळायला लावले.
‘चित्रपटाच्या सुरुवातीला श्रेयनामावली दाखवताना जेव्हा साने गुरुजींची मूर्ती पडद्यावर येते. त्या वेळी गाईच्या हंबरण्याचे पार्श्‍वसंगीत टाकून वसंतरावांनी साने गुरुजींच्या महन्मंगल जीवनाचा सारांशच स्वररूपाने प्रेक्षकांना ऐकवला आहे. म्हणूनच मी म्हणतो, की या चित्रपटाच्या यशाचे अर्धे भागीदार वसंतराव देसाई हेच होत!’’
त्याच वर्षी भालजी पेंढारकरांचा ‘माझी जमीन’ हा चित्रपट संगीतासाठी वसंतरावांकडे आला. नुकताच नवीन कुळकायदा आल्यामुळे सगळीकडे त्याची चर्चा होत होती. जमीन कुणाची? वाडवडिलांनी मिळवून ठेवलेल्या धनिक जमीनदाराची, की जो स्वत: खपतो त्या शेतकर्‍याची? हा प्रश्‍न कुळकायद्यामुळे सगळीकडे चर्चिला जात होता. या चित्रपटात भालजींनी याच विषयाला हात घालून ‘केवळ आर्थिक नफा मिळविणे हेच धोरण न ठेवता, जो कसलेल्या जमिनीचा उपयोग सार्‍या गावाला अन्न पुरविण्यासाठी करतो तोच खरा हाडाचा शेतकरी होय’ असा संदेश दिला. या चित्रपटामध्ये सात गाणी होती. ‘हेचि वेळ देवा नका मागे घेऊ! तुम्हाविण जाऊ शरण कोणा’ हा संत तुकारामांचा अभंग व ‘माझे मंदिरी चाल चाल चाल’ ही परशुरामाची रचना. बाकीची गाणी सूर्यकांत खांडेकर व माधव पातकर यांनी लिहिली होती. कविवर्य ग.दि.माडगुळकरांनी यात नायक हरबाची भूमिका केली. पण त्यांचे एकही गीत या चित्रपटात नव्हते.
मराठी जानपदाची परंपरा सांभाळणारे संगीत ह्या चित्रपटाला वसंतरावांनी दिले. ‘हेचि वेळ देवा’ हा अभंग व ‘माझी रानफुले सुकली’ हे भावगीतवजा गीत व ‘झांज ढोलकं साथ तुनतुनं डफ वाजतो कडाकडा ’ हे सवाल जबाबाचे गाणे प्रेक्षकांच्या दीर्घकाळ लक्षात राहिले.
दिग्दर्शक माधव शिंदे व लता मंगेशकर यांची निर्मिती असलेल्या ‘सुरेल चित्र’ या संस्थेचा ‘कांचनगंगा’ हा चित्रपट १९५४ साली प्रदर्शित झाला. याला भालजींची कथा व संवाद, पी. सावळाराम यांची गाणी होती. ‘कांचनगंगा’ची वैशिष्ठ्ये म्हणजे गोपीकृष्ण या सुप्रसिद्ध नर्तकाचे नृत्यदिग्दर्शन या चित्राला लाभले होते. या चित्रपटात सात गाणी होती. या सार्‍याच गीतांना वसंतरावांनी अतिशय गोड चाली लावल्या होत्या. ‘श्याम सुंदर रुप नयन राखीव’ या गाण्यातली शास्त्रीय सरगमची आलाप ऐकायला सुरेल वाटायची. ‘बोल वीणे बोल मंजुळ मंजुळ बोल’ हेही गाणे शास्त्रीय रागदारीवर आधारलेले होते.
‘मी तुझी का? का तुझी रे’, ‘गोरखकल्याण’ हे गाणे एक अंतरा गणिकेच्या तोंडी जलद तर दुसरे नायिकेच्या तोंडी हळू देऊन, वसंतरावांनी कथेच्या दृष्टीने संगीतातही औचित्य साधले आहे.
१९५५ साली भालजी पेंढारकरांनी ‘ये रे माझ्या मागल्या’ नावाचा विनोदी चित्रपट काढला. विलीनीकरणाच्या पार्श्‍वभूमीवर निपुत्रिक संस्थानिक वारस निवडण्याच्या प्रयत्नात असताना अनेक गंमतीदार गफलती घडतात. त्या विनोदी घटनांची व संस्थानातील उचापती मंडळींची कट-कारस्थाने असा सगळा सांगीतिक सावळा गोंधळ म्हणजे,‘येरे माझ्या मागल्या’. यातील सारी म्हणजे पाचही गाणी लता मंगेशकरांनी गायली होती तर ‘जोगिया मेरे घर आये’ हे गाणे उस्ताद अमीर खॉं साहेबांनी गायले होते.
१९५५ ते १९६० पर्यंत वसंतराव हिंदी चित्रपटांचे संगीत करण्यात इतके व्यस्त होते, की या काळात कुणीही मराठी निर्माता त्यांना संगीतासाठी चित्रपट देऊ शकला नाही. या काळातच ‘राजकमल’चे चार मोठे हिंदी चित्रपट जास्त मेहनत घेऊन त्यांना करावे लागले. १९६० साली मात्र वसंतरावांचे जुने मित्र, हिंदी-मराठी चित्रपटातील बुजुर्ग कलाकार गजानन जहागीरदार यांनी ‘उमाजी नाईक’ हा महत्त्वाकांक्षी चित्रपट निर्माण करून वसंतरावांकडे त्यांचे संगीत सुपूूर्द केले. गंमत म्हणजे याच जहागीरदारांनी १९३८ साली ‘उमाजी नाईक’ याच नावाचा चित्रपट काढला होता. जुन्या ‘उमाजी नाईक’ची कथा, संवाद व गाणीही विष्णुपंत औधकरांनी लिहिली होती. तर नव्या ‘उमाजी नाईक’ची पटकथा-संवाद विश्राम बेडेकरांनी लिहिली होती व गाणी ग.दि.माडगूळकरांनी! माडगूळकरांची गाणी सरत्या पेशवाईच्या काळाची आठवण करून देणारी अशी होती व वसंतरावांचे संगीतही त्याच काळाला अनुरूप असेच होते. जुन्या ‘उमाजी नाईक’मध्ये केशवराव दाते होते तर नव्या ‘उमाजी नाईक’त नानासाहेब फाटक होते. मात्र उमाजी नाईकाचे काम जहागीरदारांनीच केले होते.
१९६२चा ‘बाप माझा ब्रह्मचारी’ म्हणजे शास्त्रोक्त संगीताचा अतिरेक करणार्‍यांवरची एक विडंबन कथा होती. खरं म्हणजे वसंतरावांनी हा चित्रपट कसा स्वीकारला? (त्यात शास्त्रीय संगीताचेही विडंबन होते) असा प्रश्‍न त्यांच्या चाहत्यांना पडला होता. पण वसंतरावांनी मनाला अतिशय आल्हाद देणारे असे संगीत दिले आहे. रागदारी संगीताची आवड असणार्‍यांना ते पूर्ण समाधान देते. चालीत विविधता आहे. वसंतरावांनी परिश्रम घेऊन संगीत दिल्याचे जाणवते. यात जुने गायक, नट जोग यांना राम मराठ्यांचा आवाज दिला होता.
‘बाप माझा ब्रह्मचारी’ हा शीर्षक गीताचा अभंग, त्याचे ध्वनिमुद्रण हनुमान जयंतीच्या मुहूर्तावर झाले. कारण वसंतराव कमालीचे धार्मिक होते. या अभंगासाठी त्यांनी नामवंत गायक मंडळी आणली होती. भजन सम्राट फुलाजीबुवा, वासुदेवराव (स्नेहल) भाटकर, एकनाथ हातोसकर, संगीतरत्न केसरीनाथ भाये, मृदुंगमणी साटमबुवा या सार्‍यांनी तो अभंग म्हटला होता. वसंतरावांनी आणखी एक गंमत केली. ती म्हणजो तो अभंग या सार्‍या नामवंत मंडळींवरच चित्रीत करायला दिग्दर्शक दिनकर द. पाटील यांना सांगितले. बापडे फुलाजीबुवा, भाटकर, हातोसकर ही मंडळी केवळ वसंतरावांसाठी तोंडाला रंग लावून भजन करायला बसली. ताडदेवच्या सेंट्रल स्टुडिओत (आताचे एअरकंडिशन मार्केट) हनुमान मंदिराचा छानपैकी सेट लावला होता. याच चित्रपटासाठी महेंद्रकपूर पहिल्यांदा वसंतरावांकडे गायले. याच सुमारास भालजींनी ‘मोहित्यांची मंजुळा’ या ऐतिहासिक चित्रपटाची घोषणा केली व त्याचे संगीत वसंतरावांना द्यायचे ठरवले. तशी बोलणीही झाली. पण पुढे ते संगीत लता मंगेशकरांनी ‘आनंदघन’ या नावाने दिले.
वसंतरावांचे पुतणे सदानंद देसाई हे प्रसिद्ध संकलक व डबिंग तंत्रज्ञ होते. त्यांच्या मनात या सुमारास एखादा चित्रपट काढायचे चालले होते. त्यांनी ग. दि. माडळगूळकरांकडून भूषण कवींवर पटकथा व संवाद लिहून घेतले. ‘शिवराज भूषण’ या नावाने हा चित्रपट हिंदी व मराठी दोन्ही भाषेत काढायचे ठरले. पण महत्त्वाचे म्हणजे या चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनाबरोबरच चित्रपटाचे दिग्दर्शनही वसंतरावच करणार होते. पण दुर्दैवाने हे व्हायचे नव्हते! कारण या सुमारास संपूर्ण भारत देशातली परिस्थितीच इतकी बदलून गेली, की आता एखादा युद्धपट काढणे सदानंद देसाईंना फार गरजेचे वाटू लागू लागले. १९६२ साली चीनने भारतावर आक्रमण केले. परकीय आक्रमणाच्या या संकटामुळे सारा भारतदेश ढवळून निघाला. अवघ्या भारतीयांच्या मनात देशभक्तीची ज्योत प्रज्वलीत झाली. चित्रपटातली मंडळी यात मागे कशाला राहतील?
सदानंद देसाईंनी मग ग. दि. माडगूळकरांकडूनच पुन्हा एक चांगली कथा लिहून घेतली व त्यावर ‘छोटा जवान’ या उत्कृष्ट चित्रपटाची निर्मिती केली. ‘छोटा जवान’ची कथा साधारण अशी होती. शिवकालीन शूर मराठा घराण्यातील वीरश्रीयुक्त परंपरेची ही कथा. या घराण्यातील प्रत्येक पिढीतील एक तरी मर्द तळहाती शिर घेऊन मातृभूमीसाठी धावून गेला आहे. तीच परंपरा चालू ठेवण्यासाठी सध्याचा त्यांचा तरुण वंशज बाजीराव हा भारतीय सैन्यात आहे. बाजीराव रजेवर घरी येतो. त्यामुळे घरी आनंद असतो. पण अचानक चीनने देशावर आक्रमण केल्याची बातमी येते व बाजीरावला कामावर हजर होण्याची तार येते. मायभूमीच्या हाकेला ओ देण्यासाठी तो आपल्या वडिलांचा, बायकोचा, मुलाचा निरोप घेऊन ताबडतोब घर सोडतो.

पुढे बाजीराव युद्धात बेपत्ता होतो. सारे घर दु:खात बुडून जाते पण वृद्ध वडील खचून न जाता सार्‍यांना धीर देतात. तर बाजीरावचा छोटा मुलगा ‘छोटा जवान’ होऊन आपल्या वडिलांना मारणार्‍या चिन्यांचा सूड घेण्याच्या हेतूने घरातून निघून जाऊन आघाडीवर येतो. पुढे अनेक नाट्यमय घटना घडून बाजीराव सापडतो. अशी ही सुखांतिका!
‘छोटा जवान’ची गाणी ही ग. दि. माडगूळकरांनीच लिहिली होती. त्यातील एक गाणे आधीच महाराष्ट्रातल्या घरोघरी गेले होते. या गाण्याचा इतिहास फारच गमतीदार आहे. चीनच्या आक्रमणानंतर भारतीय सैनिकांच्या मदतीसाठी देशभक्तीपर गाण्याचे अनेक कार्यक्रम वसंतरावांनी केले. या कार्यक्रमासाठी त्यांना एका भारतीय सैनिकांचे आपण शांतीप्रेमी असूनही हे लादलेले युद्ध नाईलाजाने करीत आहोत. हे युद्ध सत्यासाठी असून अंतिम विजय आमचाच आहे असा आत्मविश्‍वास व्यक्त करणारे गाणे हवे होते.
नेमकी याच वेळी मुंबईत त्यांची ग. दि.माडगूळकरांशी भेट झाली. त्यांनी अण्णांकडे आपल्याकडे कसे गाणे हवे आहे हे सांगून ते लिहून देण्याची विनंती केली. अण्णांनी त्यावर बोटांनी पैशाची खूण करत ‘‘पण वसंतराव, यांचं काय?’’ अशी विचारणा केली.
त्यावर वसंतराव म्हणाले,‘‘नाही बुवा, हे गाणे सिनेमासाठी नाही. मला स्वत:ला कार्यक्रमासाठी हवे आहे. हे समाजसेवेचे काम आहे. मी तुम्हाला काही देऊ शकणार नाही!’’ यावर माडगूळकर काहीच बोलले नाहीत. पण पुण्याला परत येताना गाडीत त्यांच्या मनात विचार आला, की वसंतरावांना देशभक्तीपर गाणे लिहून हवे आहे. हा माणूस कसलाही स्वार्थ न ठेवता, कुठल्याही मानधनाची अपेक्षा न करता अहोरात्र कष्ट करून देशसेवा म्हणून गाण्यांचे कार्यक्रम करीत आहे. तेव्हा त्यांना गाणे द्यायलाच पाहिजे! झाले. अण्णांनी गाडीतच एका मिळेल त्या चिठोर्‍यावर एक सुंदर असे गाणं लिहून काढले. सुदैवाने त्यांच्याकडे एक पोस्टाचे पाकीट होते. त्यात ते गाणे बंद करून वर वसंतरावांचा पत्ता लिहून अण्णांनी ते पाकीट, लोणावळ्याच्या स्टेशनवर गाडी थांबली तेव्हा स्टेशनच्या पोस्टाच्या पेटीत टाकले. पुढे वसंतरावांनी ते गाणे तेवढीच जोशपूर्ण चाल लावून महेंद्र कपूरकडूनच गाऊन घेतले. अनेक कार्यक्रमात ते गाणे म्हटले गेले. इतकेच नव्हे तर शिवाजी पार्कवर पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरूंच्या उपस्थितीत लाखो प्रेक्षकांच्या साक्षीने, वसंतरावांनी तेच गाणे हजारो मुलांकडून एका सूरात वदवून नेहरूंची शाबासकी मिळवली होती. ते गाणे होते-
माणुसकीच्या शत्रुसंगे युद्ध आमचे सुरु
जिंकू किंवा मरू
हे गाजलेले गाणे ‘छोटा जवान’मध्ये घेण्यात आले. याच चित्रपटात माडगूळकरांनी ‘वाघ्या मुरळी’चे एक गाणे लिहिले होते. त्यातसुद्धा त्यांनी-
देव या देशाचा रक्षिता
कोण या जिंकील रे भारता
अशा देशभक्तीपर ओळी टाकल्या होत्या. या गाण्याच्या वेळी तमाशातील प्रसिद्ध विठा बापूमांग(नारायणगावकर) हिने छोटेसे काम केले होते.
आशा भोसले यांचे ‘याल कधी हो घरी घरधनी’ हे भावपूर्ण गाणे व ‘धाव धाव सावळे विठाई’ हा पारंपारिक अभंग वसंतरावांच्या गोड चालीमुळे खूप गाजला, ‘छोटा जवान’ हा मराठीतला पहिला व एकमेव युद्धपट म्हणावा लागेल.
साने गुरुजींच्या ‘मोलकरीण’ या कथेवर त्याच नावाचा चित्रपट निर्माता गजानन शिर्के यांनी काढला. वसंतरावांचे ‘प्रभात’मधले जुने मित्र यशवंत पेठकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शक केले होते. यातली गाणी ग.दि.माडगूळकर व पी. सावळाराम या दोघांनी लिहिली होती.
‘श्यामची आई’च्या संगीताच्या वेळी ज्या विचाराने व चिंतनाने वसंतरावांनी संगीत दिले होते तसेच संगीत त्यांनी ‘मोलकरीण’साठी तयार केले हे कदाचित साने गुरुजींवरील प्रेमामुळेही असू शकेल. पण ‘मोलकरीण’च्या सार्‍या चालीत मातृवात्सल्य अगदी ओतप्रोत भरले होते. विशेषत: ‘देव जरी मज कधी भेटला’ व ‘दैव जाणिले कुणी’ या गाण्यात! ‘कशी झोकात चालली’ हे कोळीगीत, ‘हे श्रीरामा’ हे गुजरी तोडीतले आर्त गीत तर केवळ अप्रतिम! ‘हसले आधी कुणी’ या द्वंद्व गीतात तलत महमूदचा आवाज घेतला होता. १९६३च्या सर्वश्रेष्ठ संगीतकाराचे ‘रसरंग फाळके’ गौरवचिन्ह प्रेक्षकांनी ‘मोलकरीण’ या चित्रपटालाच बहाल केले होते.
‘मोलकरीण’ चित्रपट महाराष्ट्रात तर खूपच गाजला पण गुजरातमध्येही त्याचा बोलबाला झाला. इतका की एका गुजराती निर्मात्याने ‘मोलकरीण’च्याच कथेवर ‘मोटीबा’ या नावाचा गुजराथी चित्रपट काढला. मराठी ‘मोलकरीण’मध्ये आईचे काम सुलोचनाने केले होते तर गुजराती ‘मोटीबा’मध्ये आई होती दीना पाठक! यातल्या गुजराती गाण्यांना वसंतरावांनीच चाली लावल्या होत्या. ‘मोटीबा’ला गुजरात राज्य सरकारने त्या वर्षीचे उत्कृष्ट चित्रपटाचे पारितोषिक मिळाले होते.
१९६४ साली आलेला होमी वाडिया निर्मित आणि बाबासाहेब (मधुकर) पाठक यांनी दिग्दर्शन केलेला ‘स्वयंवर झाले सीतेचे’ हा खरे म्हणजे एक उत्कृष्ट बालचित्रपट होता. कारण त्यातले नायक राम-लक्ष्मण हे कुमार वयातले होते. या चित्रपटाची सारी गाणी ग. दि. माडगूळकरांनी लिहिली होती. कथा निवेदनात परिणामकारकता व रंजकता आणण्याची कामगिरी या चित्रपटात वसंतरावांनी संगीत दिग्दर्शक या नात्याने अतिशय चांगली बजावली होती. त्यांचे स्वरनियोजन वातावरणात भिनून जाते. प्रसंगांची खुलावट करते. रावण हा दुष्ट राक्षस राजा होता. पण तो कलाशौकिन होता. ही गोष्ट किती जणांना माहीत आहे? म्हणूनच चित्रपटाच्या सुरुवातीला रावण एक शास्त्रोक्त गाणे गात असल्याचे योजून तिथे कल्पकता दाखविण्यात आली आहे. पं. भीमसेन जोशींच्या आवाजातील ‘रम्य ही स्वर्गाहून लंका’ श्रोत्यांना तेव्हाच तल्लीन करते. ‘या लंकेचे दासीपद तरी, कमला घेईल का?’ असा रावणाचा उन्मत्त सवाल ऐकून गर्विष्ठपणाबरोबर संगीताबद्दलची ही त्याची आवड व जाण प्रेक्षकांच्या लक्षात येते. हे गाणे सोहनी रागात होते.
या गाण्याचे रेकॉर्डिंग बॉम्बे लॅबमध्ये झाले. पंडितजी गाणार म्हणून वसंतरावांनी मुद्दाम त्यांच्यासाठी भारतीय बैठकीची व्यवस्था केली होती. गायकांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन त्यांना खुलवून त्यांच्याकडून जास्तीत जास्त चांगले कसे काढून घेता येईल, याचा वसंतराव नेहमीच विचार करीत. पंडितजींच्या सार्‍याच मैफली भारतीय बैठकीवर होत आणि त्या हमखास रंगत. म्हणून तशी खास व्यवस्था रेकॉर्डिंगच्या वेळी करण्यात आली होती. पंडितजी येणार म्हणून रेकॉर्डिंग बघायला वाडिया शेठचे अनेक नातेवाईक गाणे ऐकण्यासाठी उपस्थित होते. वसंतरावांनी वाडिया शेठना पंडितजींची ओळख करून देताना म्हटलं, ‘यह है पंडित भीमसेन जोशी. हिंदुस्थानी क्लासिकल म्युझिक की जानीमानी हस्ती…’
वसंतराव पंडितजींबद्दल आणखी काही सांगणार होते पण पंडितजी मध्येच त्यांना तोडत वाडियाशेठना म्हणाले,
‘‘देखिए शेठसाब, यह वसंतरावजी म्युझिकके एम. ए. है| लेकिन मैं प्रोफेसर हूँ|’’ यावर सगळे खळखळून हसले. वसंतरावांनी मग पंडितजींना एक-दोन रिहर्सल करून, त्यात ताना-मुरक्या-आलापी यांसह अशा काही रंग भरला, की त्या गाण्याचा तो टेक संपल्यावर जमलेल्या मंडळींनी खूष होऊन भरघोस टाळ्या वाजवल्या. त्यावर वसंतराव म्हणाले, ‘यह तो सचमुचके प्रोफेसर निकले!’ यावर पुन्हा एकदा प्रचंड हशा पिकला.
त्यानंतर अर्धा तास विश्रांती झाली. पंडितजीही जरा बाहेर जाऊन आले. विश्रांतीआधीचा पंडितजींना म्हटलेला टेकच फायनल करून टाकावा असे वसंतरावांचे मत होते. पण पंडितजींनी विश्रांतीनंतर वसंतरावांना अजून एक टेक घ्याच असा आग्रह केला व त्या गाण्याला पहिल्यापेक्षाही अधिक रंग भरून खूप गंमत आणली.
वसंतरावांना मग तो नंतरचा टेकच फायनल म्हणून घ्यावा लागला. रेकॉर्डिंग झाले. पंडितजींच्या लक्षात आले, की इथे झालेली गर्दी ही आपल्या चाहत्यांची आहे. मग काय ते अतिशय खूष झाले आणि नंतर तासभर त्यांनी आपल्या रसिक चाहत्यांसाठी झकासपैकी मैफल रंगवली.
‘स्वयंवर झाले सीतेचे’मधील इतर गाण्यात सीतेच्या तोंडचे आशा भोसले ह्यांनी म्हटलेले, ‘हेच ते हेच ते हेच ते’, ‘निघाले असतील राजकुमार’ व सख्यांच्या तोंडचे ‘वैतालिक हो विजयगीत गा इष्ट देवतेचे’ ही सर्व गाणी श्रुतिमधुर स्वरबांधणीमुळे पुन:पुन्हा ऐकाविशी वाटतात.
याच चित्रपटाच्या वेळचा आणखी एक गंमतीदार किस्सा म्हणजे होमी वाडियांची गाडी रोज सकाळी साठेआठ वाजता शिवाजी पार्क दादरला दिग्दर्शक बाबासाहेब पाठक यांना घ्यायला येत असे. ते मग गाडीतून ‘वसंत’ स्टुडिओत जात. हा स्टुडिओ चेंबूरला होता. तिथे त्या वेळीू अजून एका देमार चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होते. त्या चित्रपटात नायक अगदी नवीन होता. पण अभिनयात मात्र एकदम तयार होता.
एके दिवशी तो हिरो बाबासाहेबांना म्हणाला, ‘‘बाबासाब, आप कंपनीकी गाडीसे आते है, इसलिए छोटी सी बिनती है की आप आते समय चेंबूर स्टेशनवर दो-तीन मिनट के लिए रुके और मुझे लिफ्ट दे तो बडी मेहरबानी होगी | मुझे गिरगाव से आना पडता है| और यह लोक मुझे सिर्फ तीन सौ रुपये महिना देते है | फिल्म का हिरो हूँ इसलिए बिनती करता हूँ | प्लीज…’
बाबासाहेबांनी त्याच्या खांद्यावर हात टाकत हसून त्याला सांगितले, ‘कोई बात नहीं| आप हररोज हमारे साथ आ सकते है|’ तो हिरो एकदम खूष झाला. पुढे तो खूप नावाजला, हिंदी चित्रपटसृष्टीतला मोठा कलाकार झाला. तो होता संजीवकुमार!
‘स्वयंवर झाले सीतेचे’ या चित्रपटाचे दिग्दर्शक बाबासाहेब पाठक यांचे खरे म्हणजे आधीच खूप नाव झाले होते. कारण एखाद्या खेळाडूने पहिल्याच चेंडूला षटकार ठोकावा तसे त्यांच्या पहिल्याच चित्रपटाला- ‘प्रपंच’ला महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सवात उत्कृष्ट चित्रपटाचे पारितोषिक मिळाले होते. चोक्सी नावाच्या एका निर्मात्याने गांधी नावाच्या एका फायनान्सबरोबर फिल्म कंपनी काढून एक मराठी चित्रपट काढायचे ठरवले. त्याचे दिग्दर्शन त्याने बाबासाहेबांनाच द्यायचे ठरवले. चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद ग.दि.माडगूळकरांचे होते. माडगूळकरांच्या कामात त्यांना साहाय्यक म्हणून अर्थात बाबासाहेबच होते. चित्रपटाचे नाव होते- ‘तळ्याकाठचा सावळ्या’. याचे संगीत वसंतराव करणार होते. गंमत म्हणजे वसंतरावांचे जन्मगाव कुडाळ जवळचे सोनवडे. या ठिकाणी या चित्रपटाचे चित्रीकरण करायचे ठरले. कारण सोनवडे हे अतिशय निसर्गरम्य गाव. तिथे अनेक तळी होती. शिवाय कर्ली नदीची खाडी, ताडा-माडाची झाडे, हिरवी डोंगर झाडी असा तो रम्य परिसर! यापूर्वी ‘राजकमल’च्या ‘मौसी’या चित्रपटाचे चित्रीकरण सोनवड्यालाच झाले होते. बाबासाहेब पाठक चोक्सींबरोबर सोनवड्यास गेले, तिथे चित्रीकरणास काही जागासुद्धा त्यांनी नक्की केल्या. पण पुढे कुठे माशी शिंकली न कळे! हा चित्रपट होऊ शकला नाही एवढे खरे. एवढी सारी तयारी होऊनही चित्रपट सुरू होऊ शकला नाही याचे बाबासाहेबांना फार वाईट वाटले. कारण त्याची कथा अतिशय वेगळी असल्यामुळे हा चित्रपट जर झाला असता तर तो अतिशय नावीन्यपूर्ण व आगळावेगळा असा होऊन त्याने इतिहास घडवला असता असा आत्मविश्‍वास बाबासाहेबांना होता.
१९६५ साली शांतारामबापूंनी त्यांच्या ‘व्ही. शांताराम प्रॉडक्शन्स’च्या नव्या ‘इये मराठीचिये नगरी’ या चित्रपटासाठी वसंतरावांना बोलावले. एका कीर्तनकाराच्या व त्याच्या बाणेदार व स्वाभिमानी स्वभावाच्या मुलीची ही कथा. या चित्रपटातला बराचसा भाग कथानकातल्याप्रमाणे रंगमंचावरचा होता. गाणीही नेहमीपेक्षा वेगळी असल्यामुळे शांतारामबापूंना वसंतरावांची आठवण झाली. वसंतरावही शांतारामबापूंच्या हाकेला ओ देऊन आले. नेहमीप्रमाणे त्यांनी अतिशय गोड चाली व जुन्या कथानकाच्या काळानुरूप असे संगीत दिले.
हाच चित्रपट शांतारामबूापूंनी हिंदीतही ‘लडकी सह्याद्री की’ या नावाने काढला. १९६२ वर्षासाठी, सूूरसिंगार संसदेने ‘लडकी सह्याद्री की’च्या संगीत नियोजनाबद्दल वसंत देसाईंना ‘डॉ. बृहस्पती’ पारितोषिक तर शांतारामबापूंना सरस्वती पारितोषिक दिले होते.
वसंतराव अतिशय भाविक व श्रद्धाळू गृहस्थ होते. ‘अमर भूपाळी’ चित्रपटाच्या आधी त्यांनी होनाजीच्या समाधीचे दर्शन घेतले होते. ‘रामराज्य’ चित्रपटाच्या आधी ‘रामनवमी’ला ते अयोघ्येला जाऊन आले होते. तर वाडिया बंधूंच्या ‘संपूर्ण रामायण’ या चित्रपटाचा करार त्यांनी रामनवमीच्या दिवशी रामाच्या देवळात केला होता. ‘बाप माझा ब्रह्मचारी’मधला ‘मातेसम अवघ्या नारी’ हा अभंगसुद्धा हनुमान जयंतीच्या मुहूर्तावर ध्वनिमुद्रित केला होता आणि आता दिनकर द. पाटील यांच्या दिग्दर्शनाचा ‘धन्य ते संताजी धनाजी’ हा ऐतिहासिक चित्रपट वसंतरावांकडे आला. वसंतरावांनी मग चौकशी करून त्या दोघांच्या वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या समाधींचे दर्शन घेऊन मगच या चित्रपटाच्या संगीताला सुरुवात केली. या ऐतिहासिक चित्रपटातली गाणी कविवर्य जगदीश खेबूडकरांनी लिहिली होती.
‘जय जय हो महाराष्ट्राचा’ हा मन्ना डे व वसंतराव देशपांडे यांनी गायलेला पोवाडा, ‘पाहुनी प्यार भरी मुस्कान’ हा शोभा गुर्टु यांनी गायिलेला मुजरा, ‘आली गावामंदी फेरी’ हे जयवंत कुलकर्णीचे वासुदेव गीत, याशिवाय ‘गुलजार गुलछडी’, ‘घेऊन मैफलीचा रात्रीतला निवारा’, ‘देश हा देव असे माझा’ व ‘शंकरा करुणाकरा’ ही सारी आशा भोसले यानी गायलेली गाणी. अशी ही सारीच गाणी प्रसंगानुरूप व अतिशय श्रवणीय अशी होती.
‘मथुरेला कृष्ण निघाला’ हे जयवंत कुलकर्णीने वसंतरावांकडे गायलेले पहिले गाणे होते. ‘धन्य ते संताजी धनाजी’ हा मुंबईच्या ‘नाझ’ला लागलेला पहिला मराठी चित्रपट होता.
रामायणात सीतेला लक्ष्मणाने रेषा आखून दिली होती. ती तिने ओलांडली आणि पुढे सगळे रामायण घडले. त्यामुळे भारतीय संस्कृतीत या लक्ष्मणरेषेला मोठे महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे.
‘लक्ष्मण रेषा’ या चित्रपटात हीच लक्ष्मणरेषा ओलांडल्यामुळे आयुष्याची परवड झालेल्या एका दुर्भागी अबलेची करुण कहाणी होती.
ग.दि. माडगूळकरांच्या गाण्यांची कथानुुरूप स्वरयोजना वसंतरावांनी केली होती. ‘शपथ या बोटांची’, ‘पाखरू गाऊ नको’ ही व इतर दोन अशी चारही गाणी आशा भोसले यांनी गायली होती. १९७४ साल हे शिवराज्यभिषेकाचे त्रिशतकसांवत्सरिक वर्ष होते. सुप्रसिद्ध साहित्यिक रणजित देसाई यांनी ‘राजमाता जिजाबाई’ ही पटकथा उत्तम संवादासह लिहून काढली. दिग्दर्शक दत्ता माने व संगीत वसंत देसाई यांच्याकडे, असा चित्रपट सुरू होणार होता. पण दुर्दैवाने तो सुरू झाला नाही.
हिंदीतले प्रतितयश दिग्दर्शक हृषिकेश मुखर्जी ह्यांच्या ‘आशीर्वाद’ व ‘गुड्डी’ या हिंदी चित्रपटांना वसंतरावांचेच संगीत होते. मुखर्जींच्या मनात मराठी चित्रपट निर्माण करावे असे आले. विषय राजकारणाचा होता. महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात निवडणुकीत कसे गैरप्रकार चालतात, याचे दर्शन ह्या चित्रपटात त्यांना घडवायचे होते. संगीताची जबाबदारी अर्थातच वसंतरावांवर होती. पण दुर्दैवाने हाही चित्रपट होऊ शकला नाही.
पुण्याचे प्रसिद्ध वितरक व ‘भानुविलास’चे श्री. वि. वि.बापट यांच्या कथेवरचा ‘बायांनो नवरे सांभाळा’ हा चित्रपट नृत्यप्रधान असल्यामुळे, वसंतरावांना त्यात संगीताला भरपूर वाव होता.
त्यामध्ये डोंबारी नृत्य, पुरुरवा-ऊर्वशी नृत्य, संपूर्ण शास्त्रोक्त नृत्य, नृत्यातली जुगलबंदी व लावणी नृत्य असे नृत्याचे प्रकार होते. ही सारी नृत्ये प्रसिद्ध नर्तक गोपीकृष्ण यांनी तर एक नृत्य त्यांचे शिष्य माधव किशन यांनी बसवले होते.
गोपीकृष्ण हाच या चित्रपटाचा नायक होता. मराठी चित्रपटासाठी यापूर्वी त्यांनी नृत्ये बसवली होती. पण मराठी चित्रपटात अभिनय ते प्रथमच करीत होते. मराठीत त्यांनी इतके चांगले काम कसे केले म्हणून त्यांना विचारले असता त्यांनी सांगितले होते, ‘महाराष्ट्राबद्दल मला अभिमान आहे. कारण मी महाराष्ट्रातच घडलो. माझी मावशी सितारादेवी हिच्याबरोबर केवळ आठ महिन्यांचा असताना आलो आणि या मातीत वाढलो. या चित्रपटाची नायिका जयश्री टी. ही गोपीकृष्णाची आवडती शिष्या. कुठलीही गत अथवा तोडा दाखवला की तो लागलीच तिच्या नुपुरातूनच सजीव होऊन बाहेर पडत असे. गोपीकृष्णला अभिप्रेत असलेला पदन्यास अगदी जसाच्या तसा जयश्री टी. अगदी निमिषार्धात करून दाखवीत असे. म्हणून गोपीकृष्ण कधी कधी
प्रेमाने तिला, ‘अरे यह तो चुडेल है!’ असे म्हणायचा.
‘बायांनो… ’मधील नृत्याबद्दल जयश्री म्हणते, ‘या पाचही नृत्यगीतांत माझ्यातील कलागुणांना पूर्ण वाव मिळाला असून ताल व स्वर यांचा सुरेख संगम या चित्रात साधलेला आहे.
या चित्रपटामधील सारीच गाणी मधुर होती. पण विशेषत: खॉंसाहेब गुलाम ख्वाजा, आशा भोसले व प्रमिला दातार यांनी गायलेलं ‘उभी अशी त्रैलोक्य सुंदरी’ हे व के. जयस्वाल, प्रमिला दातार आणि जयवंत कुलकर्णी यांच्या आवाजातली ‘मी मोहिनी लाडकी प्रियकरा तुझी रे’ ही गाणी उत्स्फूर्त दाद द्यावी अशीच होती.
१९७४च्या तेराव्या महाराष्ट्र चित्रपट महोत्सवात ‘बायांनो नवरे सांभाळा’ला उत्कृष्ट संगीताचे पारितोषिक मिळाले. पण त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे ‘सूरसिंगार संसदे’चे मराठी संगीताचे १९७४ चे पारितोषिक या चित्रपटातील ‘उभी अशी त्रैलोक्य सुंदरी’ या गीताला व संगीत दिग्दर्शक वसंत देसाई यांना हरिदास पारितोषिक मिळाले.
पार्श्‍वगायक खॉंसाहेब, गुलाम ख्वाजा, आशा भोसले व प्रमिला दातार यांना ‘मियॉं तानसेन’ पारितोषिक तर गीतलेखक जगदीश खेबुडकर यांना ‘आचार्य अत्रे पारितोषिक’ व निर्माते ना. गो. दातार यांना प्रशस्तीपत्रक मिळाले.
१९७४ साली शिवराज्याभिषेकाच्या त्रिशतसांवत्सरिक वर्षात ‘राजा शिवछत्रपती’ हा मराठीत चित्रपट निघाला हे योग्यच झाले. या चित्रपटाची गाणी त्या वेळी चित्रपटात नुकतेच गीत लिहिण्यास सुरुवात करणारे कवी सुधीर मोघे यांनी लिहिली होती. या चित्रपटासाठी वसंतरावांनी मराठीत प्रथमच दहा गायकांकडून गाणी म्हणून घेतली होती. उषा मंगेशकर व महेंद्र कपूर यांच्याकडून कोळी गीत, शोभा गुर्टूकडून मुजरा, मन्ना डे-मिनू पुरुषोत्तमकडून कव्वाली, भीमसेन जोशी यांच्याकडून भजन, आशा भोसलेंकडून लावणी व वाघमारे, के. जयस्वाल व बोगम यांच्याकडून गोंधळ अशी ही गाणी होती.
‘राजा शिवछत्रपती’ हा चित्रपट वसंतरावांच्या पार्श्‍वसंगीताचा एक उत्कृष्ट नमुना होता.
‘तूच माझी राणी’ हा दुर्दैवाने वसंतरावांचा शेवटचा मराठी चित्रपट ठरला. त्यांच्या मृत्यूनंतर तो प्रदर्शित झाला. यातील गाणी राजेश मुजुमदार (दादा कोंडके फेम चित्रपटांचे गीतकार) यांनी लिहिली होती. एक गाणे सोडून बाकी सार्‍या गाण्यांचे रेकॉर्डिंग झाले होते. उरलेले ‘ओळखशील का सांग आज’ या गाण्याला वसंतरावांच्या निधनानंतर के. जयस्वाल यांनी चाल लावून ते आशा भोसले, उषा मंगेशकर, मन्ना डे व महेंद्र कपूर या चौघांकडून गाऊन घेतले. असा हा वसंतराव देसाई यांचा मराठी चित्रपटसृष्टीतील प्रवास !
– मधु पोतदार
(सौजन्य: मंजुल प्रकाशन)

————

ठेवणीतले लेख

    आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा



    [recaptcha]

    काही निवडक प्रतिक्रिया:

    नरेंद्र चौधरी


    आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
    संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया