अतिथी कट्टा

दिनांक : २५-०७-२०१७

फूटपाथवरील भटकंती




विख्यात संगीत दिग्दर्शक, पार्श्वगायक सुधीर फडके यांचा आज जन्मदिन. तसेच येत्या २९ जुलैला त्यांचा स्मृतिदिनही आहे. त्यानिमित्तानं ‘जगाच्या पाठीवर’ या त्यांच्या आत्मचरित्रामधील हा काही निवडक भाग.
——-

पोट हा चमत्कारिक प्रकार सार्‍याच प्राणिमात्रांच्या मागं परमेश्‍वराचं लावून दिला नसता तर? अनेक हालअपेष्टांच्यामधून निदान माझी त्या वेळी तरी सुटका झाली असती. सार्‍यांना पोट असावं की नसावं, हा गहन विषय आज जरी माझ्यासमोर नसला, तरी त्या वेळी माझं ‘पोट’ हाच एकमेव प्रश्‍न होता. अजून तो काळ मला स्पष्टपणे आठवतो.
डॉ. पारीखांची खोली सकाळी सोडली. कुठं जायचं. कुठं राहायचं. काहीच डोक्यात नव्हतं. जवळच चर्नी रोडची बाग होती. तिथं दोघं (मी आणि गाडगीळ) जाऊन बसलो. त्या वेळी ती बाग खूप मोठी होती. चर्नी रोड स्टेशनच्या मागची पूर्ण बाजू तर होतीच पण जवळजवळ चौपाटीच्या सुरुवातीपर्यंत पसरली होती. मरीन ड्राइव्हचा रस्ता सध्याइतका रूंद नव्हता. तिथं बागच होती. बाकं होती.
दुपारपर्यंत तिथंच बसून राहिलो. डोक्यावर सूर्य तापू लागला. तरी झाडांची सावली गार होती बागेमध्ये विशेष वर्दळ नव्हती. आमच्यासारखे काही थोडे लोक तुरळक तुरळक बसलेले होते. काही जण बाकांवर झोपले होते. मी त्यांच्याकडे पाहात होतो. नानातर्‍हेचे विचार मनात येत होते. हे लोक इथं का आले असतील? ही काही फिरायची वेळ नाही. त्यांना काही उद्योग नसतील का? मी त्यांच्याकडे पाहात होतो. नानातर्‍हेचे विचार मनात येत होते. यापैकी काहीजण कदाचित काम करून, थकून विश्रांतीसाठी आलेले असतील, काहीजण उगाच वेळ घालवण्यासाठी आले असतील. कदाचित काही आपल्यासारखेही असतील, कुठं काही आसरा नसलेले, एकेकाचे चेहेरे निरखून पाहात होतो आणि नाना तर्‍हेच्या कल्पना करीत होतो. उद्योग काहीच नव्हता. वेळ जाता जात नव्हता. दुपारी भुकेची जाणीव व्हायला लागली, तरी दोघे तसेच बसून राहिलो.
भूक… एक प्रचंड गहन समस्या… महाभयंकर आग… या आगीनंच पुढचे कितीतरी दिवस माझं शरीर आणि मन जाळून काढलं. माझ्याकडे आणि गाडगीळकडे मिळून तीनचार आणे निघाले. दोघे उठलो. मुकाटपणे एका हॉटेलात गेलो. दोघांनी दोन परोठा-उसळची ऑर्डर दिली. त्या वेळी तीन पैशाला परोठा-उसळ मिळे. तेवढं खाऊन वर दोन-तीन ग्लास पाणी प्यायलं की, पोट भरे. आता दुसर्‍या दिवशी दुपारपर्यंत चिंता नव्हती. चिंता करून चालणारच नव्हतं. त्या चिंतेचं आणि खिशाचं एकमेकांशी मुळीच जमणार नव्हतं.
हॉटेलबाहेर पडलो, पण पुन्हा प्रश्‍न पडला, जायचं कुठं? बागेत किती वेळ बसायचं? काही सुचेना कुणाकडे जायचं? अनेक नावं समोर आली, पण कुणाकडेच जायला मन तयार होईना.
दोघे तसेच भटकत राहिलो, मुंबई खर्‍या अर्थानं बघितली. मुंबईकडे पाहण्याची एक नवीच दृष्टी आली होती. आता दिसत होती, ती मुंबई निराधार होती, निराश्रित होती, गरीब होती, परिस्थितीनुरूप पाहण्याचा चष्मा कसा बदलतो, त्याचा अनुभव येत होता.
तो दिवस मी कधीच विसरू शकणार नाही. पुढचे अनेक दिवस ज्या अवस्थेत घालवले. त्यातला तो पहिला दिवस. संध्याकाळपर्यंत अंधार पडेपर्यंत आम्ही दोघे भटकभटक भटकलो. रात्र झाली आणि पुन्हा भूक जाणवायला लागली. गाडगीळ म्हणाला, ‘हे बघ सुधीर, आता भूक मरायची सवय करायला पाहिजे. आता काही खायचं नाही. आणखी दोन वेळा आपण परोठा-उसळ खाऊ शकतो. पण लक्षात ठेव. दोन वेळ म्हणजे दोन दिवस आपण असंच मस्त फिरत राहू.’’

गाडगीळ बराच गमत्या होत्या. मधून मधून छान विनोद करायचा. त्याला असे दिवस काढायची कधी सवय नव्हती. घरचा बरा होता, पण घरून पैसे मागवायचे नाहीत, असा त्याचा निश्‍चय होता आणि आता माझ्या नादाला लागून माझ्यासोबत असे हे असले दिवस काढायला निघाला होता….

रात्री अकरा- बारापर्यंत आम्ही मुंबई बघत हिंडत राहिलो. आता पाय दुखायला लागले, झोप हवी होती. झोप…! आदल्या रात्रीपर्यंत (शेवटचे चार-पाच दिवस सोडले तर) झोप आली की, झोपत होतो, चार भिंतीच्या आत, अंथरूणावर, पांघरूण घेऊन, दिवा बंद करून… आज यातलं काहीच नव्हतं. आजपर्यंत फूटपाथवर झोपणारे खूप लोक बघितले होते. मुंबईत घरं असूनही गरम हवेमुळं सोयीस्कर म्हणून फूटपाथवर मोकळ्या हवेत सतरंज्याच काय पण गाद्या अंथरून, खाटा टाकून झोपणारे अनेक लोक बघितले होते. हेही माहीत होतं की, ते अंथरूण, पांघरूण किंवा खाटा आपल्या घरातून आणतात आणि सकाळी परत घरात नेऊन ठेवतात. आज आमची तीच तर पंचाईत होती. कुठून काही आणायला किंवा परत नेऊन ठेवायला घरच शिल्लक नव्हतं. आजपर्यंत स्वच्छ
जागेत झोपायची सवय होती. स्वच्छतेसंबंधी मी जरा जास्तच जागरूक होतो. अंथरूणावर सुरकुतीसुद्धा पडलेली मला चालायची नाही. कचर्‍याचा एखादा कणसुद्धा माझी झोप पार नाहीशी करी.
मला आठवतं, रात्रीचे सिनेमे सुटले, टॅ्रम्स बंद झाल्या. रस्त्यावरची वाहतूक जवळजवळ संपली. तेव्हा आम्ही दुकानाच्या मोकळ्या फळ्या शोधायला लागलो. त्यातल्या त्यात उजेड कमी येणार्‍या. कारण मला उजेडात झोप येत नसे.
त्या पहिल्या रात्रीचा अनुभव अजून मला जसाच्या तसा दृष्टीसमोर दिसतो, आम्ही दोन फळ्या गाठल्या. गाडगीळनं ताणून दिली. मला त्या फळीवर आडवं होताच येईना. ती स्वच्छ असेल का? दिवसा अनेकांच्या चपलांनी बुटांनी घाण झालेली असेल, रात्री दुकान बंद करताना झाडलेली नसेल, ढेकूण असले तर? हे सगळे विचार उगीचच गर्दी करीत होते. खरं म्हणजे हा शुद्ध वेडेपणा होता. पण ते आज वाटतंय. त्या वेळी मात्र हे असलेच विचार मनात येत होते. अंथरायला किंवा पांघरायला काही नाही. याचा मात्र काही परिणाम नव्हता. कारण ती परिस्थिती आता बदलणार नाही, याची पूर्ण जाणीव होती. कितीतरी वेळ मी तसाच त्या फळीवर बसून होतो. केव्हातरी नकळत झोप लागली असली पाहिजे.
दचकून जागा झालो, तर एक गुरखा सांगत होता, ‘‘यहां नही सोनेका-और कही जाके सो जाव..’’
त्या गुरख्यानं मला आणि गाडगीळला तिथून अक्षरश: हाकलून लावलं. पहाटेचे तीन-साडेतीन वाजले होते. आम्ही तिथून उठलो आणि त्या रस्त्याच्या पलीकडच्या रस्त्यावरच्या एका दुकानाच्या फळीवर जाऊन बसलो.
रात्री रिकाम्या असलेल्या दुकानांच्या फळ्यावर का झोपू देत नाहीत, ते काही कळेना, हा अनुभव बरेच वेळा आल्यानंतर कळलं की, काही भामटे झोपण्याच्या निमित्तानं अशा फळ्या निवडतात आणि रात्री सामसूम झाली की, दुकानांची कुलपं फोडून चोर्‍या करतात. हे कळल्यावर त्या गुरख्यांचा राग येईनासा झाला.
दुसर्‍या फळीवर झोप येईना. हे असलं आयुष्य यापुढं कसं काढायचं. या चिंतेतच बराचसा काळ निघून गेला. सकाळ झाली. तोंड धुवायला हवं होतं. शारीरिक विधीसाठी जाणं भाग होतं. आजपर्यंत यासाठी अडचण कधीच भासली नाही. त्या दिवशी मात्र डोळ्यांपुढं अक्षरश: काजवे चमकले. कुठं जायचं? पुन्हा तोच प्रश्‍न. कुणाकडे तरी जावं, तोंड धुवायचं म्हणून सांगावं आणि त्यांनी विचार करावा की, हे दोघं सकाळी सकाळी चहा मिळे, म्हणून काहीतरी निमित्त काढून आले असावेत.. हे सगळं मनात आलं. याही परिस्थितीत स्वाभिमान अजून आपली जागा सोडायला तयार नव्हता. त्या खुळ्याला वाटत होतं की, अजूनही आपलं स्थान कायम आहे. त्याचा हा गर्व गळून पडायला काही
दिवस लागणार होते.
आम्ही निमूटपणे उठलो आणि चर्नी रोड बागेच्या दिशेनं चालायला सुरुवात केली. तिथं सर्व सोय होतीच. शिवाय चौपाटीजवळ सँढर्स्ट पुलावर सार्वजनिक मुतारी आणि शौचालय होतं. विधी उरकले. आता चहा हवा होता. त्या वेळी चहा फार स्वस्त होता.
अमृततुल्य चहाची दुकानं मुंबईत जागोजागी होती. पैसा साधा सिंगल आणि दोन पैसे दुधाचा स्पेशल चहा अशा पाट्या असत. आम्ही दोघांनी दोन साधा सिंगल चहा घेतला. त्या दुकानात बराच वेळ बसून राहिलो.
पुन्हा सारे प्रश्‍न तसेच उभे राहिले. जेवण- जागा-पैसे… दोन दिवसात जवळचे पैसे संपले. त्या नंतरचे काही दिवस आठवले की, अजूनही अंगावर काटा उभा राहतो. दोन, दोन तीन-तीन दिवस उपाशी राहणं असह्य झालं. ओळखीच्या कुणाकडं तरी आणादोन आणे- चार आणे अशी उसनवारी- ते पैसे परत न दिल्यामुळं हा लफंगा आहे, सगळ्यांकडे पैसे मागतो, याला कुणी काही देऊ नका. अशा तर्‍हेचा प्रचार…
ज्या ज्या माणसाकडे जावं, त्यानं उपहासानं तिरस्कारानं बघणं, शक्यतो टाळायचाच प्रयत्न करणं आणि त्यामुळे आणखी उपास घडणं हा नित्याचा प्रकार होऊन बसला. अंघोळ ही तर दुर्मिळ गोष्ट झाली. स्वच्छतेचा एवढा बडिवार माजवणारा मी. पण माझे कपडे आणि शरीर माझं मलाच किळसवाणं वाटू लागलं. तीन-चार दिवसांनी हे असह्य झालं की, गिरगाव नाक्यावरच्या सार्वजनिक नळावर अगदी पहाटे अंधारात जायचं. अंगावरच्या कपड्यांसकट अंघोळ करायची, तेच कपडे घट्ट पिळायचे आणि पुन्हा अंगात घालायचे. अंगातल्या उष्णतेनं ते आपोआप सुकून जायचे. पण परिणाम एवढाच व्हायचा की माझं ते स्वच्छ शरीर तापानं फणफणायचं.
या अविस्मरणीय कालखंडातल्या पहिल्या पाच-सहा दिवसात मी माझा एक सदरा, एक पायजमा आणि एक कोट एवढे कपडे चोरबाजारात नेऊन विकले होते. त्यांचा सव्वा रुपया मिळाला होता. गाडगीळनं मध्ये दोनदा स्टेशनवर जाऊन हमाली करायचा प्रयत्न केला, पण ओळखीचं कोणीतरी दिसल्यामुळं दोन्ही वेळेला तो तसाच परत आला होता.
ज्यांचा ज्यांचा निकट परिचय होता, त्यांच्याकडं जायचं या काळात मी टाळत होतो. पूर्वी मानानं ज्यांच्या घरी गेलो, त्यांना माझी ही असली स्थिती दाखवणं मलाच लाजिरवाणं वाटत होतं.
गाडगीळ चार-पाच दिवस कुठं बेपत्ता झाला होता. आता माझं झोपणं फूटपाथवरच सुरू झालं होतं. जुनी वर्तमानपत्रं गोळा करायची, ती फूटपाथवर अंथरायची आणि त्याच्यावर पसरायचं. रात्री रहदारी संपल्यावर झोपायला मिळे. पहाटे रहदारी सुरू व्हायच्या अगोदर उठावंच लागे. अन्न नाही, पुरेशी झोप नाही, कपडे नाहीत, कुणाची सहानुभूती नाही. या स्थितीत शरीर जे काही तग धरून राहिलं, ते पूर्वी केलेल्या व्यायामाच्या बळावर.
एके दिवशी हे सगळं खूपच असह्य झालं. रात्री मी एका मित्राच्या घरी गेलो. काही दिवसांपूर्वीचा अत्यंत जवळचा असा तो मित्र. मला खात्री होती की, मी झोपायला मिळेल का, असं न विचारता तोच आज आमच्याकडे झोप म्हणेल. पण परिस्थितीप्रमाणे सार्‍याच मूल्यांचे अर्थ बदलले होते. त्याचा परकेपणा स्पष्टपणे जाणवायला लागला.

थोडा वेळ मी तसाच बाजूला राहिलो. त्याच्या घरची सगळी माणसं मला यापूर्वी आपलेपणानं वागवीत. पण आता सर्वच बदललं होतं. माझ्याबरोबर कोणी बोलत नव्हतं. मीच शेवटी मनाचा हिय्या करून निलाजरेपणानं त्याला विचारलं, ‘‘आजची रात्र तुझ्याकडे झोपू का? फूटपाथवर झोपायची सवय नाही रे, अगदी असह्य होतंय.’’
काही न बोलता तो उठला, आत गेला, थोड्या वेळानं परत आला, म्हणाला, ‘‘वडील म्हणतात की, घरात फार अडचण आहे, आता नको. पुन्हा केव्हातरी ये.’’
कुणालाही हे ऐकून मेल्यापेक्षा मेलं झालं असतं. पण मी सर्वार्थानं मेलेलाच होतो, जगत होतो ते माझं कोडगं शरीर. त्या कोडगेपणानंच मी पुन्हा हात जोडले, विनवण्या केल्या, त्याला शेवटी दया आली असावी, तो म्हणाला, ‘‘ठीक आहे, आजची रात्र बाहेर गॅलरीत झोप. पण पुन्हा मात्र माझ्यावर हा असला प्रसंग आणू नकोस.’’
मी गॅलरीत गेलो. त्यानं एक चटई अंथरायला दिली, पण खरं सांगतो, त्यानं गॅलरीत झोप म्हटलं, त्याक्षणी असं वाटलं की, उठावं आणि त्या गॅलरीतून खाली रस्त्यावर उडी टाकावी… हे तीव्रतेनं वाटलं, पण हातून घडलं मात्र नाही.
रोगानं जर्जर झालेले, अंगावर चिंध्या असलेले, महारोगी, लंगडे, पांगळे, आंधळे असे अनेक भिकारी जागोजाग दिसतात. जगण्याचा त्यांचा हव्यास पाहिला की, मला माझे ते दिवस आठवतात. मी तरी त्या वेळी का जगलो? काय आमिष होतं माझ्यापुढं? जगण्यासाठी काही वेगळा मार्ग निघणार होता का? जे भोगत होतो, ते सहन होत होतं का? हे सारं असं होतं, तरी मी त्या वेळी जगलो, मरण फार दुर्लभ असतं, म्हणून जगलो.
मुकाट्यानं गॅलरीत जाऊन झोपलो. सकाळी प्रातर्विधी उरकले. त्या मित्रानं चहा पुढं ठेवला, पण मी म्हटलं, ‘‘चहा सोडलाय’’. त्या सर्वांचे आभार मानून बाहेर पडलो. त्यांचा मला राग आला नाही. कारण हा सगळा परिणाम माझ्याविषयीच्या प्रचाराचा आणि त्याबरोबरच पोटासाठी लाचार होऊन मी जी आणा-दोन आण्यांची उसनवारी करीत होतो, त्याचाही असला पाहिजे. हे मला कळत होतं. आता त्याला हे आठवतही नसेल. पण तो मला अनेक वेळा भेटतो आणि मी कसलीही जाणीव वा आठवण न देता, त्याच्याशी प्रेमानं बोलतो.
या प्रसंगानंतर एकदोन दिवसांनी असाच एक लाजिरवाणा प्रसंग माझ्या हातून घडला. कुणीतरी मला सांगितलं की, ‘दुर्गाबाई खोटे मदत करतील. त्यांना भेट.’
रात्री साडेआठच्या सुमाराला मी त्यांच्या मलबार हिलवरच्या बंगल्यात गेलो, त्या मला नावानं ओखळत असाव्यात, असं दिसलं. त्यावेळी त्यांची गाण्याची तालीम चालली होती. एक खॉंसाहेब त्यांना गाणं शिकवत होते. दुर्गाबाईंनी मला काय काम आहे, ते विचारलं, मी चाचरत चाचरत त्यांच्याकडे काही मदतीची याचना केली. त्यांना नक्की माझी दया आली असावी.
त्या म्हणाल्या, ‘‘बसा थोडा वेळ. मी पाहते. काय करता येतं ते.’’
पाठोपाठ ते खॉंसाहेबही आत गेले. त्यांनी माझ्याविषयी त्यांना काही सांगितलं, मला ते बाहेर ऐकू येत होतं. ते सांगत होते, ‘‘यह लडका अच्छा नही है, सबसे पैसे मांगता है, आप कुछ मत देना, पैसे मांगनेकी इसको आदतही पड गयी है.’’
दुर्गाबाई बाहेर आल्या. त्या काय सांगणार, ते मला कळलंच होतंच. त्या खॉं साहेबांच्या कानावर माझी ही कीर्ती कुठून कशी गेली, कुणास ठाऊक! मी याही बाबतीत चांगला कीर्तीमान झालो होतो, याचा प्रयत्य आला. दुर्गाबाईंनी शांतपणानं ‌‌‘पैसे देऊ शकणार नाही,’ म्हणून सांगितलं. मात्र पुढं विचारलं, ‘‘तुम्ही या बंगल्यापर्यंत कसे आलात?’’
मी म्हटलं, ‘‘चालत आलो.’’
त्यांनी चटकन एक रुपया पुढं केला आणि म्हणाल्या, “इतक्या रात्री इथून पुन्हा चालत परत जाऊ नका. व्हिक्टोरिया (घोडा-गाडी) करून जा.’’ मी तो रुपया घेत नव्हतो. पण त्यांनी बळेबळे माझ्या हातात दिला.
माझं मन खरंच कोडगं झालं होतं. दुर्गाबाईना नमस्कार करून त्यांच्या बंगल्याबाहेर पडलो. हातात आता एक रुपया होता. पोटात आग पेटली असताना घोडागाडीत पैसे खर्च करायला मी काही मूर्ख नव्हतो. चालत गिरगावात आलो. एका हॉटेलात जाऊन दोन आण्यांची राईस प्लेट खाल्ली. दुर्गाबाईंच्या कृपेनं आज पोटात अन्न… साक्षात अन्न गेलं होतं. खरा भिकारी त्याला पैसा दोन पैसे देणार्‍या दात्याला कसा मनापासून आशीर्वाद देत असेल, त्याची माझ्यासारखी यथार्थ कल्पना क्वचितच कोणी करू शकेल. दुर्गाबाईंच्या स्मरणात हा प्रसंग आहे. या प्रसंगानंतर सात-आठ वर्षातच मी जेव्हा चित्रपटसृष्टीत कोणीतरी झालो, त्यानंतर अनेक चित्रपटांत दुर्गाबाईंचा आणि माझा एकत्र योग आला. अशाच केव्हातरी त्यांनी स्वत:हून मी त्यांच्याकडे त्या वेळी आल्याची आठवण सांगितली.
गाडगीळ जसा अचानक गेला, तसा अचानक परत आला. चर्नी रोडच्या बाहेत मला भेटला. ती बाग हे आमचं दिवसातल्या बर्‍याच वेळचं निवासस्थान होतं. तो कुठं गेला होता, ते मी विचारलं नाही. मी विचारीन, म्हणून त्यानं बराच वेळ वाट पाहिली आणि एकदम माझ्या खांद्यावर मान टाकून रडायला लागला. मी अनेकदा विचारूनसुद्धा काही बोलेना. बर्‍याच वेळानं शांत झाला, कुणीतरी काम देतो, म्हणून त्याला धुळ्याला नेलं होतं. पण ते सर्व बोगस निघाल्यामुळं तो तसाच परत आला होता. मला पैसे पाठवून चकित करायची त्याची कल्पना होती, म्हणून मला न सांगता गेला होता आणि आता सकाळपासून माझा वाट पाहात बागेत थांबला होता. माझ्यासाठी त्यानं चार सामोसे स्टेशनवरून आणले होते. ते सगळे मी खावेत अशी त्याची इच्छा होती. पण दिसत होतं की त्यानं स्वत: एकही खाल्लेला नसावा. माझ्यावरच्या प्रेमानं त्यानं चारी सामोसे माझ्यासाठी म्हणून आणले असावेत. मी त्याला खाण्याचा आग्रह केला.‌ ‘तू खाल्ल्याशिवाय मी खाणार नाही,’ असं म्हटल्यावर मात्र त्यानं दोन सामोसे खाल्ले. त्याच्या त्या खाण्यावरूनच कळत होतं की, तो उपाशी आहे आणि तरीही तो चारी सामोसे मलाच खाण्याचा आग्रह करीत होता. त्याच्या प्रेमानं मला भरून आलं, आम्ही सामोसे खाल्ले. वर भरपूर पाणी प्यायलो. आता परोठा- उसळीचा प्रश्‍न त्या दिवसापुरता तरी मिटला होता.
त्याच कालखंडात (नेमका दिवस आठवत नाही, पण त्या आधीच्या दोन दिवसात) पोटात काही गेलं नव्हतं. खूप भूक लागली होती, निदान चहा तरी मिळवा, अशी अनिवार इच्छा होती, गाडगीळ म्हणाला, ‘‘चल, आपण माधव घाटेकडं जाऊ, तो नक्की आपणाला चहा देईल.’’
माधव घाटे राहात होता माटुंग्याला. आम्ही होतो गिरगावात. हे सात आठ मैलांचं अंतर पार कसं करायचं, हा गंभीर प्रश्‍न होता. पण प्रत्येक प्रश्‍नाला काही ना काही उत्तर असतंच. आम्ही एक युक्ती केली. दादरला जाणार्‍या ट्राममध्ये चढलो. कंडक्टर आमच्याजवळ येईपर्यंत ट्राम दोन स्टॉप पुढं गेली होती आम्ही बोरीबंदरची तिकिटं मागितली. कंडक्टर म्हणाला, ‘‘ही ट्राम दादरला जाते, बोरीबंदरला जायचं तर पुढच्या स्टॉपला उतरा आणि उलट्या दिशेनं जाणार्‍या ट्राममध्ये बसा.’’
आम्ही पुढच्या स्टॉपला उतरलो. एवढ्या वेळात चर्नीरोड जंक्शनपर्यंत आम्ही विनासायास पोचलो होतो. साधारण तीन फर्लांग प्रवास झाला होता. पुन्हा तोच प्रयोग दुसर्‍या ट्राममध्ये केला पण तो कंडक्टर खाष्ट निघाला. त्यानं म्हटलं, ‘बोरीबंदरला उलटी ट्राम जाते त्यानं जा, पण आता प्रवास केलात, त्याचा एक एक आणा काढा.’ झालं. आमचं धाबं दणाणलं. काहीतरी बोलून पुढचा स्टॉप येईपर्यंत त्याला गुंतवून ठेवलं आणि स्टॉप जवळ येत असतानाच ट्राम थांबायच्या आधीच रस्त्यावर उड्या घेतल्या. मग मात्र पुन्हा या भानगडीत पडलो नाही. सरळ चालत निघालो.
फोरास रोड जंक्शनपासून जी. आय पी. माटुंग्याचा खारे घाट रोड हा पल्ला निदान सहा-सात मैलांचा होता. केवळ चहा मिळेल, म्हणून हे अंतर चालत चालत आम्ही माधव घाटेच्या घरी पोचलो. माधव घाटे संघाचा स्वयंसेवक, कार्यकर्ता, माझ्या परिचयाचा. पण गाडगीळचा खास मित्र. त्यानं चहा दिला. आम्ही केवळ चहा प्यायला मिळेल म्हणून गिरगावात तुझ्या घरी चालत आलो, हे त्या वेळी त्याला सांगितलं नाही. पण आठ-दहा वर्षांपूर्वी मंबईत मी आणि माझी पत्नी बसमधून जात असताना समोरच्या सीटवर माधव घाटे दिसला. मी ललिताची त्यांच्याशी ओळख करून दिली. आणि हा चहाचा किस्सा सांगितला. त्यानं चटकन विचारलं, ‘मग मी चहा दिला होता ना?’ त्यावेळी त्याच्या प्रश्‍नाची खूप गंमत वाटली. त्यानं चहा दिला होता, एवढंच नव्हे तर तो प्रेमानं बोलला होता, हे जरी खरं असलं तरी त्या वेळी त्या चहाच्या प्रसंगानं माझी जगण्याची इच्छाच नाहीशी झाली होती. कशाला जगायचं? एक कप चहासाठी सहा-
सहा सात मैलांचा खडतर प्रवास पायी करण्यापेक्षा उपाशी मरून गेलो, तर कुणाचं काय बिघडणार आहे? माझं स्वत:चं तर बरंच होईल. हे रोजचं जिवंत मरण जगण्यापेक्षा प्रत्यक्ष मरण एकदाच येऊन आपली या सगळ्यातून कायम सुटका करील, तर फार बरं होईल, हा विचार माझ्या मनात बळावू लागला.
या विचाराच्या गुंगीत असतानाच एक दिवस रस्त्यात एक स्वयंसेवक अचानक भेटला. भेटला म्हणण्यापेक्षा त्यानं मला पाहून धावत येऊन माझा हात धरला आणि विचारलं, ‘‘अरे, तू आहेस कुठं? परवापासून अनेक स्वयंसेवक तुझा शोध करताहेत.’’
मला काही कळेचना. आतापर्यंत मला स्वयंसेवक शक्यतो टाळत असायचे आणि हा म्हणतोय, ते तुझा शोध घेतायत म्हणून. त्यानंच पुढचं सांगितलं की, पूज्य डॉक्टरांनी मला बोलावले होतं.
मी विचारलं, “कुठे?’’
तो म्हणाला, ‘‘कार्यालयात.’’
मी त्याच्याबरोबर निघालो. विचार केला की, मला कार्यालयातून आणि संघातून काढून टाकल्याचा हुकूम काढणारे ते मुंबईचे प्रमुख. पण डॉक्टर हेडगेवार सर्वांच्या वरचे. त्यांचा अधिकार सर्वोंच्च. तेव्हा त्यांनी बोलावल्यावर कुठंही जायला हरकत नाही. आणि त्यांनी बोललावं, हेही साहजिकच होतं. माझ्या प्रकरणाची वार्ता त्यांच्या कानांवर गेली होती. त्याची पूर्ण चौकशी करण्यासाठी त्यांनी त्यावेळचे अकोला जिल्हा संघसंचालक, श्री बाबासाहेब चितळे यांना मुद्दाम मुंबईला पाठवलं होतं. त्यांनी सर्व संबंधितांची भेट घेऊन प्रकरणाची साद्यंत माहिती घेतली होती. यात माझी काहीही चूक नाही, हे त्यांना पटलं होतं आणि त्यांनी मला हेही सांगितलं होतं की, ‘तुझी काहीच चूक नसताना तुझ्यावर घोर अन्याय झाला आहे. पण आपल्या संघात स्थानीय सर्वोच्च अधिकार्‍याला काढून टाकण्याची पद्धत नाही, त्यामुळे तुला हा अन्याय सहन करायला पाहिजे. तू अत्यंत चांगला स्वयंसेवक आहेस, संघाच्या भल्यासाठीच तू त्याग केला आहेस. त्याचं फळ मात्र तुझ्यावर अन्याय होऊन तुला मिळालं आहे, हे मी डॉक्टरांना स्पष्टपणे सांगेन.”
बाबासाहेब चितळ्यांकडून हे सर्व पूज्य डॉक्टरांना कळल्यामुळंच डॉक्टरांनी मी कुठं आहे, त्याची चौकशी केली असावी, मला हुडकून आणायला सांगितलं असावं.
मी कार्यालयात गेलो. दुपारची वेळ होती, कार्यालयाच्या पायर्‍या चढत असताना मनात विचारांचा कल्लोळ माजला होता. दोन वर्ष या पायर्‍या प्रेमानं चढत होतो, या पायर्‍यांच्या पुढची वास्तू टिकवण्यासाठी शक्य ते सर्व करीत होतो आणि आज? आज माझ्या अंगावर फाटके, मळके कपडे होते. दोन-चार दिवसांत अंघोळ केलेली नव्हती. गालफडं बसली होती.
तसाच आत गेलो. डॉक्टर हॉलमध्ये बसले होते. त्यांना वाकून नमस्कार केला. ते माझ्याकडे पाहातच राहिले. काही क्षण काहीच बोलले नाहीत. म्हणाले, ‘‘बैस कुठं असतोस?’’
मी म्हटलं, “कुठंच नाही.”
त्यांनी विचारलं, “काय करतोस?” मलाच याचं उत्तर माहीत नव्हतं. पण म्हटलं, ‌‌“काहीच करीत नाही. काही करता येतं, हेच मला माहीत नाही.”
माझ्या तोंडून एवढे शब्द बाहेर पडलसे आणि डॉक्टरांचे डोळे एकदम भरून आले. मी गलबलून गेलो.
माझ्यासारख्या एका सामान्य स्वयंसेवकासाठी या महापुरुषाच्या डोळ्यात पाणी यावं, हे मला सहन होईना. मी उठलो, त्यांना नमस्कार केला आणि धावत कार्यालयाच्या बाहेर आलो.
– सुधीर फडके
(सौजन्य : राजहंस प्रकाशन)

——–
ठेवणीतले लेख

    आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा



    [recaptcha]

    काही निवडक प्रतिक्रिया:

    नरेंद्र चौधरी


    आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
    संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया