अतिथी कट्टा

दिनांक : २७-०९-२०१७

दिग्दर्शनापेक्षा अभिनय अधिक कठीण : नागराज मंजुळे

‘हायवे’नंतर बऱ्याच काळानं तुमचा अभिनेता म्हणून ‘सायलेन्स’ हा चित्रपट येतोय. या चित्रपटाच्या निर्मितीचा अनुभव कसा होता?

– प्रत्येक चित्रपटाच्या निर्मितीची प्रोसेस इंट्रेस्टिंग आणि संस्मरणीय असते. तशीच प्रोसेस मी याही चित्रपटाच्या निमित्तानं अनुभवलं.

हा एक ‘डार्क’ सिनेमा आहे. त्यामुळे तुम्हाला कॅमेऱ्याला सामोरे जाण्यापूर्वी काही रीसर्च करावा लागला का?

-मी अभिनेता असल्यामुळे रीसर्चच्या फारशा भानगडीत पडलो नाही. तसं लक्ष घातलं असतं तर ते चुकीचं ठरलं असतं. त्यामुळे मी सेटवर आलो, मला जसा अभिनय करायला सांगितला गेला तसा मी केला. अभिनेत्याचं काम असतं अभिनय करणं. ते मी या चित्रपटात प्रामाणिकपणे पार पाडलंय. या चित्रपटासाठीचा रीसर्च, तिचा लूक कसा असेल, तिचं म्हणणं काय असेल याची जबाबदारी ही माझ्यापेक्षा जास्त गजेंद्रसरांवर होती. त्यानंतर लेखक आणि निर्माते यांचा क्रमांक लागतो. मात्र जे काही काम माझ्याकडून झालं त्याचं श्रेय लेखक, निर्माते आणि दिग्दर्शक गजेंद्रसरांना जातं. त्यांच्या अनुभवाच्या जीवावरच आम्ही सर्वांनी ही फिल्म केली. सगळ्या टीमबरोबर काम करताना मजा आली.

अंजली पाटील आणि रघुवीर यादव या सहकलावंतांसोबत काम करताना कसं वाटलं?

– अंजली पाटील आणि रघुवीर यादव हे माझे आवडीचे कलावंत आहेत. या दोघांसोबत काम करण्याचा मोह आणि उत्सुकतादेखील होती. खूप खेळीमेळीत या चित्रपटाचं शूटिंग पार पडलं. दिग्दर्शक ही जबाबदारी खांद्यावर नसल्यामुळे काम करताना खूप मजा आली. सेटवरच्या अनेक गोष्टींमुळे माझ्यातील दिग्दर्शक अस्वस्थ होतो. काहीवेळा कलाकार वेळेत सेटवर येत नाहीत. काही वेळा त्यांचा मेकअप तयार नसतो. त्यामुळेही अस्वस्थता येते. मात्र एक अभिनेता या नात्यानं तुमच्यावर तेवढं दडपण नसतं. आमचा सीन झाला की मग मी आणि अंजली कवितांवर बोलत बसायचो. रघुवीर यादव यांनी आम्हाला गाणं ऐकवलं होतं. त्यामुळे चित्रपटाचा विषय गंभीर असला तरी आम्ही अगदी हलक्याफुलक्या पद्धतीनं काम केलं. खेळीमेळीत ही फिल्म शूट झाली.

तुम्ही एक दिग्दर्शक आहात आणि अभिनेतादेखील. यापैकी कोणतं काम हे तुम्हाला अधिक चॅलेंजिंग वाटलं?

– अभिनय मला अधिक कठीण वाटतो. कॅमेऱ्याला फेस करताना खरोखरच भीती वाटते. अभिनेता बनणं ही माझी आवड होती. असं घडलं नाही की, मी या क्षेत्रात आलो आणि मला जे करायचं होतं ते लगेचच करायला मिळालं. जे काही सुरुवातीला करायला मिळालं ते मी केलं. ज्या वेळी मला काही कळत नव्हतं तेव्हा मला अभिनेता बनायचं होतं. लहानपणापासून मोठमोठ्या कलावंतांना स्क्रीनवर पाहिल्यामुळे माझ्या मनात अभिनेता बनण्याची इच्छा जागृत झाली होती. मात्र दिग्दर्शक मी अपघातानं झालो. आता मात्र मी तीनही आघाड्यांवर खूश आहे.

‘सैराट’चा हिंदीत रीमेक बनतोय. याबद्दल काय सांगाल?

– सैराट हिंदीत बनतोय, एवढंच मलाही माहिती आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल आत्ता तरी माझ्याकडं फारशी माहिती नाही. परंतु या चित्रपटाला माझ्या शुभेच्छा आहेत.

ठेवणीतले लेख

    आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा



    [recaptcha]

    काही निवडक प्रतिक्रिया:

    नरेंद्र चौधरी


    आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
    संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया