अतिथी कट्टा

दिनांक :

सन्मान दिग्गजांचा…

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना राज्य शासनाचा यंदाचा चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कारासाठी यंदा अभिनेते अरुण नलावडे यांची निवड करण्यात आली आहे. त्यानिमित्त या दोन मान्यवरांनी या पुरस्काराबद्दल व्यक्त केलेले हे आपले मनोगत.
——-

शांतारामबापूंचे चित्रपट माझ्या लायब्ररीत…

व्ही. शांताराम यांच्या नावानं दिला जाणारा राज्य शासनाचा जीवनगौरव पुरस्कार मला घोषित होणं, ही नक्कीच माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. एखादा सर्वोच्च पुरस्कार मिळतो तेव्हा छान वाटणं साहजिकच आहे. शांतारामबापूंचे बरेचसे चित्रपट मी पाहिले आहेत. काही चित्रपट मी अभ्यासाकरिता माझ्या लायब्ररीमध्येदेखील ठेवले आहेत. ‘दो ऑंखे बारह हाथ’ ही माझी आवडती कलाकृती. समाजाचं वास्तव चित्रण त्यात पाहायला मिळतं. ‘कुंकू’, ‘माणूस’, ‘चानी’ हे चित्रपट मला त्यांच्या दिग्दर्शनासाठी आवडले. विशेष म्हणजे हे सर्व सामाजिक भाष्य असलेले चित्रपट त्यांनी पन्नासहून अधिक वर्षांपूर्वी केले होते. दिग्दर्शिक वैचारिकतेमधून त्या माणसानं त्या काळात जे जे काही केलं ते अभ्यासण्यासारखं आहे. ‘डर्टी डझन’ नावाचा एक अमेरिकन सिनेमा होता. ‘दो ऑंखे बाहर हाथ’ आणि ‘डर्टी डझन’ची कल्पना साधारण एकच. ‘डर्टी डझन’ हा चित्रपट अमेरिकन बाजारपेठेमध्ये खूप चांगल्या किंमतीला विकला गेला. ‘दो ऑंखे…’चे बॉक्स ऑफिसवरील यश मला आता नेमकं आठवत नाही. त्यामुळे त्याच्याबद्दल मला काही फारसं भाष्य करता येणार नाही. परंतु, हे दोन्ही सिनेमा जेव्हा मी बघतो तेव्हा तुलनात्मकदृष्ट्या मला ‘दो ऑंखे..’ अधिक भावतो. मी कथेबद्दल बोलतोय अभिनयाबद्दल नाही. कथासूत्र आणि हाताळणी याबद्दल दिग्दर्शक व्ही. शांताराम यांचं काम मला अधिक उजलं वाटलं. कारण ज्या महात्मा गांधींचं नाव घेऊन आपण गेली अनेक दशकं थयथया नाचतोय, त्याबद्दल बापूंनी या सिनेमात दाखवलं आहे.

– विक्रम गोखले

शांतारामबापूंच्या चित्रपटांचा माझ्यावर प्रभाव…

व्ही. शांताराम यांच्या नावाचा पुरस्कार मिळणं ही माझ्यासाठी निश्‍चितच खूप मोठी गोष्ट आहे. मात्र खूप मोठा पुरस्कार एका छोट्या माणसाला मिळालाय, अशी माझ्या मनातील भावना आहे. एक प्रसंग मी सांगतो. व्ही. शांताराम यांच्या कन्या मधुरा जसराज यांना मी काही काळापूर्वी दिग्दर्शित केलेला एक सिनेमा दाखवला होता. ‘वारसा’ असं या चित्रपटाचं शीर्षक असून तो अजून प्रदर्शित झालेला नाही. एका सर्वसामान्य माणसानं अक्षरशः गटारातील घाण उपसून जे काही करून दाखवलं, त्याबद्दलचा हा सिनेमा आहे. तो पाहिल्यानंतर त्या अक्षरशः गहिवरल्या. हा चित्रपट पाहताना आपल्याला बाबांची (शांतारामबापू) आठवण आली, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. तेव्हा मी त्यांना म्हटलं की, ही माझ्यासाठी खूप मोठी कॉम्प्लिमेंट आहे. त्यांना हा चित्रपट पाहताना ‘दो आँखे बारह हाथ’ची आठवण झाली. मी स्वतः शांतारामबापूंचा मोठा चाहता. अजूनही आहेच. ‘दो आँखे बारह हाथ’, ‘पिंजरा’ या चित्रपटांचा माझ्यावर खूप प्रभाव आहे. हे दोन्ही चित्रपट मी अजूनही पाहतो. तसेच इतरांनाही हे चित्रपट पाहण्यास सांगतो. असा विचार देणारे, अशा पद्धतीचे सिनेमे आजही यायला हवेत, असं मला वाटतं. मात्र दुर्दैवाची गोष्ट म्हणजे असा प्रयत्न होताना काही दिसत नाही. शांतारामबापूंनी ज्या प्रकारे सिनेमाची बांधणी केली, त्याचं अनुकरण आजही करण्यासारखं आहे. तसं झालंच तर आपण त्यांचं नाव अबाधित राखू. ‘वारसा’च्या निमित्तानं मी तसा प्रयत्नही केलाय आणि यापुढेही करत राहीन. मोठं होण्यापेक्षा आपलं नाव कायमस्वरूपी घेतलं जाणं हे मला अधिक महत्त्वाचं वाटतं. जे शांतारामबापूंबाबत झालं. आजही ते आपल्या स्मरणात आहेत. पुरस्कार तुम्हांला मोठे करत नाहीत, तर ते तुम्हांला भानावर ठेवतात. ते मला चिमटा काढतात. बघ, अजून तुझ्यात हिंमत आहे. अजून तुला खूप पुढे जायचंय. अजून खूप काही करायचंय. मोठी मजल मारायचीय. तसेच आपल्याकडे असणारे गुण हे तू दुसर्‍यांना वाटले पाहिजेस. तर आपल्यातले गुण आणखी वाढण्यास मदत होते. आपण आपल्याकडचे देत गेलो तर नवीन गुणांसाठी आपण जागा निर्माण करू शकतो.

– अरुण नलावडे

ठेवणीतले लेख

    आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा



    [recaptcha]

    काही निवडक प्रतिक्रिया:

    नरेंद्र चौधरी


    आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
    संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया