अतिथी कट्टा

दिनांक :

समाधान देऊन गेलेली – डॉ. इरावती

राजा ठाकूर तसे काळाच्या आधीचे सिनेमे काढणारे. हाही तसाच किमान दहा-पंधरा वर्षे नंतरचं कथानक असलेला. म्हणूनच कदाचित लोकांनी फार स्वीकारला नसावा, पण तो चालला चांगला. पत्रकारांनीही नावाजला. विशेषतः माझं आणि सास-यांची भूमिका करणा-या चंद्रकांत गोखले याचं काम नावाजलं गेलं. मलाही तो आवडला, त्यातल्या कथानकामुळेच. इतक्या श्रीमंत घरातील इरावती प्रियकराच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांना आपलं मानायचं ठरवते. कारण डॉक्टरांची आई मरताना आपली मुलगी तिच्याकडे सोपवते. इरावती तिला कडेवर घेते आणि डॉक्टरांच्या फोटोजवळ येते. जणू त्या फोटोला ती सांगते की, ‘हे माझं घर, माझी माणसं ‘ स्क्रीनवर मी, कडेवर ती मुलगी आणि डॉक्टरांचा फोटो आणि सिनेमा संपतो. मला हा शेवट आवडला, – प्रसिद्ध अभिनेत्री सुलोचनादीदी सांगताहेत आपल्या अत्यंत आवडत्या भूमिकेविषयी – डॉ. इरावतीविषयी.

माझ्या आवडीच्या खरं तर तीन भूमिका – ‘मराठा तितुका मेळवावा’, ‘वहिनीच्या बांगडया’ आणि ‘माझं घर माझी माणसं’ या चित्रपटांतल्या. पण ऐतिहासिक आणि ग्रामीण ढंगाच्या भूमिकांच्या गराडयातून वेगळी अशी भूमिका होती डॉ. इरावतीची- ‘माझं घर माझी माणसं’ या सिनेमातली. आणि म्हणूनच ती मला अधिक भावली, समाधान देऊन गेली. – प्रसिद्ध अभिनेत्री सुलोचनादीदी आपल्या जुन्या भूमिका आठवत सांगतात.
‘सासुरवास’ या माझ्या पहिल्या चित्रपटातली भूमिका ही कॉलेजकन्येची होती, पण तरीही तिला मर्यादा होत्या. त्या तुलनेत ‘माझं घर…’ मधली डॉ. इरावतीची भूमिका अधिक सोशल होती. मुक्त वातावरणात, प्रचंड श्रीमंतीत वाढलेली असली तरी ती ध्येयाने प्रेरित झालेली होती, स्वप्नाळू होती, कुटुंबाला महत्व देणारी होती, म्हणूनच ती भूमिका मला पटलेली होती.
     दिग्दर्शक राजा ठाकूर यांच्याबरोबर याआधीही मी अनेक चित्रपट केले होते. त्यामुळे मी काय करू शकते याची कल्पना त्यांना होती. म्हणूनच असेल बहुधा, त्यांनी त्या काळात ग्रामीण आणि ऐतिहासिक चित्रपटांच्या लाटेत ही भूमिका करायला दिली. मीही ती भूमिका याचसाठी स्वीकारली. वेगळ्या वातावरणातली, वेगळ्या पद्धतीची भूमिका करणं ही माझी गरज होती.

या चित्रपटाच्या शूटिंगसाठी मी इतकी उत्सुक असायची की स्वतःहून विचारायची, कधी शूटिंग आहे, मी कधी येऊ? या भूमिकेसाठी वेगळी अशी काही तयारी करावी लागली नाही, पण गोल पातळ आणि दोन वेण्या हा त्यावेळच्या आधुनिक स्त्रीचा गेटअप केला होता.

त्यावेळी लताबाईंच्या लांबलचक दोन वेण्यांचं मला खूप आकर्षण होतं आणि त्यावेळी दोन वेण्यांची फॅशनही होती. त्यामुळे मीही तीच वेषभूषा निवडली होती. या चित्रपटाचं सगळंच शूटिंग पुण्यात झालं आणि तेही बहुतांशी ससून मेडिकल कॉलेजमध्ये. जिथे मी म्हणजे इरावती आणि अविनाश इनामदार – ही भूमिका विवेक यांनी केली होती – प्रथम भेटतो, लग्न करायचं ठरवतो. ती प्रचंड श्रीमंत तर ते अगदी गरीब. साध्याशा चाळीत राहणारे, तरीही तिने त्यांना मनोमन वरलं आहे, पण लग्नाआधीच डॉक्टर अपघातात मरतात आणि ही अविधवा त्यांचं कुटुंब सांभाळायला त्यांच्या घरी जाते. अशी ही साधी सरळ कथा. अरविंद गोखले यांची ही कथा होती ‘अविधवा’ याच नावाची. त्यांनाही हा सिनेमा आवडल्याचं नंतर एकदा भेटल्यावर त्यांनी आवर्जून सांगितलं होतं, इतकंच नाही, तर `माझ्या दुस-या एका कथेवरच्या चित्रपटातही काम करा’, असंही सांगितलं. या चित्रपटातल्या डॉक्टरचं इरावती हे नाव त्यांनी आपली बहीण व सुप्रसिद्ध साहित्यिका इरावती कर्वे यांच्यावरून ठेवलं होतं आणि माझंही हे आवडतं नाव. माझ्या नातीचंही मी हेच नाव ठेवलंय.

तशी ह्या चित्रपटाची टीमच खूप चांगली होती. गोखल्यांची कथा. पटकथा माडगूळकरांची, संगीत सुधीर फडके यांचं, कॅमेरामन होते बाळ बापट, दिगदर्शक होते राजा ठाकूर आणि कलाकारांत माझ्याबरोबर विवेक, चंद्रकांत गोखले, रमेश देव. त्यामुळे काम करायलाही चांगलं वाटायचं.
    सुधीर फडके यांची चारच गाणी यात होती, पण सगळी अप्रतिम. या गाण्यांची एक गमतीशीर आठवण आहे. यातलं एक गाणं होतं – ‘श्रावण येतो आहे…..’ रेकॉर्डिंग व्हायचं होतं आणि शूटिंगही संपवायचं होतं. कारण सेट मोडायचा होता. गाणं तर शूट करायलाच हवं होतं. साहजिकच सुधीर फडके यांनी स्वतःच्या आवाजात ते गाणं रेकॉर्ड केलं. लताबाई नंतर येऊन ते गाणं डब करणार होत्या. शूटिंग सुरू झालं. मी गाणं म्हणायला सुरुवात केली, म्हणजे मी ओठ हलवतेय आणि गाणं म्हणतायत बाबूजी – सुधीर फडके- . सुरुवातीला सगळेच हसले, पण बाबूजींनी ते गाणं इतकं तन्मयतेनं म्हटलं होतं की नंतर सगळेच जण त्यात रमले. काही दिवसांनी लताबाई आल्या. पण त्यांनीही थेट रेकॉर्डिंगला सुरुवात केली नाही. त्या म्हणाल्या, “आधी मला शूटिंग बघायचंय”. ते कशा पद्धतीने चित्रित केलंय ते त्यांनी पाहिलं आणि नंतरच त्यांनी ते गाणं रेकॉर्ड केलं. साहजिकच पडद्यावर ते अप्रतिम अवतरलं.
    राजा ठाकूर तसे काळाच्या आधीचे सिनेमे काढणारे. हाही तसाच किमान दहा-पंधरा वर्षे नंतरचं कथानक असलेला. म्हणूनच कदाचित लोकांनी फार स्वीकारला नसावा. अर्थात तो चालला चांगला. पत्रकारांनीही नावाजला. विशेषत: माझं आणि सास-यांची भूमिका करणा-या चंद्रकांत गोखलेंचं काम नावाजलं गेलं. मलाही तो आवडला त्यातल्या कथानकामुळेच. इतक्या श्रीमंत घरातली इरावती प्रियकराच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांना आपलं मानायचं ठरवते. कारण डॉक्टरांची आई मरताना आपली मुलगी तिच्याकडे सोपवते. इरावती तिला कडेवर घेते आणि डॉक्टरांच्या फोटोजवळ येते. जणू त्या फोटोला ती सांगते की, हे ‘माझं घर माझी माणसं’. स्क्रीनवर मी, कडेवर ती मुलगी आणि डॉक्टरांचा फोटो. आणि सिनेमा संपतो. मला हा शेवट आवडला. सामाजिक संदर्भात आणि भावनात्मकदृष्ट्याही हा चित्रपट चांगला होता म्हणूनच मला फक्त माझीच व्यक्तिरेखा नाही, तर एकूणच सगळा चित्रपट आवडून गेला.
( शब्दांकन – आरती कदम )

ठेवणीतले लेख

    आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा



    [recaptcha]

    काही निवडक प्रतिक्रिया:

    नरेंद्र चौधरी


    आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
    संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया