अतिथी कट्टा

दिनांक :

पार्श्वभूमी व वस्त्रालंकार बाबुराव पेंटर


आपल्याकडे चित्रपटाचा धंदा प्रथम श्री. फाळके यांनी सुरु केला व हा धंदा अगदीच नवीन असल्याने प्रारंभी लोक अगदी भारून गेले असल्यास नवल नाही. ही कलाच आम्हा भारतीयांना नवीन होती व त्यातील गुणदोष कळण्याची पात्रता सुशिक्षितांतसुद्धा फारच थोडी होती. म्हणून गुणांच्या मानाने प्रारंभीचे चित्रपट बरेच लोकप्रिय झाले. परंतु ह्या चित्रपटकर्त्यांपैकी बहुतेकांपुढे कलासंवर्धनाचे ध्येयच नसल्याने व केवळ पैसे मिळवणे हे त्यांचे उद्दिष्ट असल्याने चित्रपटकलेत म्हणण्यासारखी प्रगती होऊ शकली नाही. संबंध कलेचीच जेथे ही स्थिती, तेथे पार्श्वभूमी, पेहराव वगैरे अंगोपांगांकडेही दुर्लक्षच झाल्यास त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही.
पार्श्वभूमीचा उपयोग चित्रपटात रसपरिपोष अधिकात अधिक होऊन सौंदर्यवृद्धि व्हावी व प्रेक्षकांना ते ते प्रसंग अगदी हुबेहूब वाटावेत. उगीच काही तरी कृत्रिम आहे असे वाटू नये, अशासाठी व नक्की स्थलबोध व्हावा यासाठी केलेला असतो. म्हणून पार्श्वभूमी तयार करावयाची ती अत्यंत विचारपूर्वक केली पाहिजे. पात्रांना उठावदारपणा (Relief) येत नसेल तर ती पार्श्वभूमी निरुपयोगी झाली असे खुशाल समजावे. कारण उठावदारपणा न आल्यास पात्रे पार्श्वभूमीतच मिसळून जातील. पार्श्वभूमीवरील नक्षी (Decoration) व रंगयोजना पात्रांपेक्षा भडक (Hard) होऊ नयेत.
पार्श्वभूमीने विशिष्ट वातावरण निर्माण करणे तसेच विशिष्ट प्रकारचे वातावरण निर्माण करण्यासाठीही पार्श्वभूमीचा उपयोग होतोच. एकदा दुःखाचा प्रवेश दाखवावयाचा असल्यास शोकरसाचा यथायोग्य आविष्कार होईल अशी पार्श्वभूमी केली पाहिजे. त्या पार्श्वभूमीच्या आनंदाच्या सूचक अशा गोष्टी बिलकुल येत उपयोगी नाहीत असे स्थूलमानाने म्हणता येईल. तद्वतच शृंगारिक प्रसंग दाखवावयाचा असल्यास शृंगार व त्याला पोषक अशीच पार्श्वभूमी असली पाहिजे. त्यावेळी त्यात शोकरसाला थारा मिळता उपयोगी नाही. वाचकांनी सूक्ष्मपणे पाश्चात्य चित्रपट पाहिल्यास त्यांत पार्श्वभूमीची सजावट व तिचा उपयोग कसा औचित्यपूर्ण केलेला असतो हे दिसून येईल.
काळ व सामाजिक व्यवहार यांचे औचित्य पार्श्वभूमी तयार करताना चित्रपट ज्या काळाचा घ्यावयाचा असेल त्या काळाच्या शिल्पशास्त्राकडे, त्यावेळच्या सामाजिक चालीरीतींकडे व पात्रांच्या दर्जाकडे इत्यादी सर्व बाबींकडे सूक्ष्म लक्ष दिले पाहिजे. प्राचीन काळची फिल्म असल्यास त्यात प्राचीन शिल्पच घातले पाहिजे. चित्रपटांत आधुनिक, पाश्चात्य धर्तीचे वास्तुशास्त्र घुसडून चालवायचे नाही. वस्त्रालंकार करावयाचे ते सुद्धा पौराणिक कल्पना व परंपरागत माहिती यांना अनुसरूनच पाहिजेत. याकरिता पार्श्वभूमी आणि वस्त्रालंकार बनविणा-यांनी जुनी चित्रे, लेख, शस्त्रास्त्रे, शिल्प इत्यादींची तज्ञांकडून माहिती मिळविली पाहिजे व पुराणवस्तुसंग्रहातील अवशेषांचा बारकाईने अभ्यास करावयास पाहिजे.
आपल्याकडे आजपर्यंत नमुनेदार व कलापूर्ण अशी पार्श्वभूमी प्रायः मुळीच केली गेलेली नाही. ‘पूरणभक्त’ या फिल्मचे उदाहरण अपवादादाखलच होय. या चित्रपटात मात्र पार्श्वभूमी वगैरे कलापूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. पार्श्वभूमी वगैरे अंगोपांगी कलापूर्ण करण्यात पाश्चात्यांनी अत्यंत परिश्रम केलेले असतात. म्हणूनच त्यांचे चित्रपट उत्कृष्ट होतात.
चित्रपटाचा धंदा आपल्याकडे सुरु होऊन आता पुष्कळ वर्षे झाली असली तरी पार्श्वभूमीच्या बाबतीत फारशी प्रगती झाल्याचे दृष्टोत्पत्तीस येत नाही. प्रगती झालीच असल्यास सेटिंग भव्यच का करावयाचे या विषयी फारसा विचार झालेला दिसत नाही. सेटिंगजवळ जी पात्रे वावरणार असतील त्यांच्या मानानेच सेटिंगच्या आकाराचे प्रमाण ठेवले पाहिजे.
अगदीच काल्पनिक चित्रपटांत मात्र सेटिंग्जचा भव्यपणा चालतो. एरव्ही निष्कारण भव्यपणा चित्रपटकालाच्या वास्तुशास्त्रास धरून आहे कि नाही हे पहिले पाहिजे. परंतु या बाबतीत फारच अंधानुकरण चालले आहे. पूर्वी महाराष्ट्र फिल्म कंपनीचा ‘मायाबाजार’ हा चित्रपट मुंबईत दाखवला जात होता तेव्हा त्यातील घटोत्कचाचे भले जंगी पोस्टर तेथे लावले होते. ते राक्षसाचेच असल्यामुळे त्याचा भव्यपणा त्याला शोभणाराच होता. पण या पोस्टरचे पुढे विकृत अनुकरण चालू झाले आणि माणसांच्या आकृती (Figures) घालून तेवढी मोठी पोस्टर्स करण्यात येऊ लागली ! घटोत्कचाचे पोस्टर एवढे मोठे करण्यात महाराष्ट्र कंपनीचा काय हेतू होता याचा कोणी विचारच केला नाही. केवळ अनुकरण करणे यातच त्यांचे कौशल्य दिसून आले! आपल्या पोस्टरांत कोणते गुण असले पाहिजेत याकडे त्यांनी लक्ष ना देता पोस्टरच्या लांबीरुंदीकडेच तेवढे त्यांनी लक्ष दिले ! असले विकृत अनुकरण पार्श्वभूमीच्या बाबतीतही आज चालू आहे ! पार्श्वभूमी पात्रांना पूर्णता आणणारी (Complimentary) असते. म्हणून प्रेक्षकांचे लक्ष मुख्यतः पात्रांवरच दिसावे अशाच त-हेची पार्श्वभूमी असली पाहिजे. प्रेक्षकांचे लक्ष पार्श्वभूमीवर केंद्रित होऊन पात्रांना गौणपणा येईल असे होऊ नये.
पार्श्वभूमी आणि पात्रे यांचा संबंध साथ आणि गायन अशा प्रकारचा आहे. गाण्यापेक्षा साथ वरचढ न होता गाण्याला पोषक अशीच असावी लागते. तसेच पार्श्वभूमी आणि पात्रे यांचे आहे.
परंतु या गोष्टींकडे चित्रपटाचा चालकवर्ग अजून चिकित्सक दृष्टीने लक्ष देत नसल्याने सुधारणा होणे अवघड झाले आहे. तसेच या धंद्याच्या चालकांची द्रव्येक दृष्टी ह्या विषयी वर लिहिलेच आहे.
पार्श्वभूमीच्या सजावटीविषयी थोडे लिहिले पाहिजे. पार्श्वभूमी सजविण्यासाठी ज्या ज्या वस्तू घातल्या असतील त्या संयुक्तिक औचित्यपूर्ण आहेत काय याचा विचार केला पाहिजे. एकही वस्तू कारण नसताना येथे का घातली असा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात उदभवता नये. पौराणिक वगैरे चित्रपटांत महिलांच्या सजावटीसाठी योजलेल्या कित्त्येक वस्तू पुष्कळदा केवळ अडगळीसारख्या दिसतात. त्या तश्या नसाव्यात. केवळ ब्लॉक भरण्यासाठी असे करणे योग्य नाही.
अरबी भाषेतील चमत्कारिक गोष्टींसारख्या कल्पनारम्य कथा जेव्हा चित्रपटात घ्यावयाचे असतात तेव्हा मात्र पार्श्वभूमी वगैरे बाबतीतला विचित्रपणा आवश्यक असतो.
वस्त्रालंकारांच्या बाबतीत वरील विवेचन सामान्यपणे लागू आहे. ज्या काळचा चित्रपट असेल त्या काळाच्या चालीरीतींकडे लक्ष देऊनच वस्त्रालंकार योजिले पाहिजेत यात तर शंकाच नाही. पण वस्त्रालंकार सौंदर्यसंवर्धनासाठी आहेत हेही न विसरून चालणार नाही. एखाद्या पौराणिक पात्राला अलंकार किती घालावयाचे याचा विचार केला पाहिजे. कित्येक वेळा असे आढळते कि पात्राचे सौंदर्य लोपून जाण्याइतकी दागिन्यांची रेलचेल केलेली असते ! अशी रेलचेल करण्यात पात्रांचे सौंदर्य कमी होते इकडे त्यांचे लक्षच नसते.
पण याचा अर्थ आपल्याकडे चांगले कारागीरच नाहीत असा मात्र नव्हे. कारागीरांच्या मागे चित्रपट मालकांचा चित्रपट लवकरात लवकर पुरा करण्यासाठी इतका लकडा असतो की, त्या कारागिरांना विचार करावयाला पुरेसा वेळ मिळत नाही. एका महिन्यातच चित्र पुरे झाले पहिजे वगैरे बंधने जर मालक कमी करतील व कारागिरांना विचारपूर्वक काम करायला मोकळीक देऊन त्यांना आवश्यक असलेली सामुग्री पुरवतील तर बरेचसे दोष चित्रपटांतून ताबडतोब नाहीसे होतील. शिवाय कित्येक वेळा पार्श्वभूमी वगरे सर्व ठाकठीक असले तरी सदोष प्रकाश योजना आणि भरपूर सामुग्रीची वाण यामुळे सुद्धा चित्रपट खराब होतात.
असो. हल्ली काही मंडळी परदेशांतून चित्रपटविषयक कलांचे शिक्षण घेऊन येऊ लागली आहेत. परंतु त्यांच्याकडे फारशी अपेक्षा करता येत नाही. कारण ही मंडळी प्रथम हिंदुस्थानातच काही वर्षे शिकून व काम करून आपल्या कलेची विशेष वाढ करण्याच्या हेतूनेच परदेशी शिक्षणास गेलेली असतात असे बहुधा नसते. आज या धंद्यात तेजी आहे तर हे शिकून पैसे मिळवावे एवढ्या उद्देशानेच बहुधा हि मंडळी प्रेरित झालेली असतात. जोपर्यंत कलैक दृष्टीची माणसे पुढे येणार नाहीत तोपर्यत आशा करण्यास फारशी जागा नाही. तरीपण बोलपटाच्या नव्या प्रसारामुळे या धंद्यात पुष्कळ सुशिक्षित पडू लागले आहेत व त्यामुळे इकडे जनतेचे लक्ष अधिकाधिक जाऊ लागले आहे ही समाधानाची गोष्ट आहे. त्यामुळे चित्रपटाची निर्मिती वाढेल व साहजिकच कलादृष्टी व स्पर्धाही वाढल्यामुळे चित्रपटांचा दर्जाही वाढेल. तसे झाले म्हणजे आपले चित्रपट पाश्चात्य देशांतसुद्धा यश मिळवल्याशिवाय राहणार नाहीत. असे होईपर्यंत या कलेला पूर्णता आली असे म्हणता येणार नाही.
( ‘प्राविण्य’ सिनेमा अंकावरून साधारणपणे १९३५ साली )
ठेवणीतले लेख

    आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा



    [recaptcha]

    काही निवडक प्रतिक्रिया:

    नरेंद्र चौधरी


    आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
    संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया