अतिथी कट्टा

दिनांक :

थिएटरात नाटक आणि सिनेमा जेव्हा एकत्र नांदत होते…

विसाव्या शतकाचं दुसरं दशक. म्हणजे भारतीय सिनेमाचं वय जेमतेम ९-१०. त्यावेळच्या सिनेमाच्या निर्मितीची आणि प्रदर्शनाची पद्धत, परिस्थिती, त्यावेळच्या रंगभूमीशी असलेलं त्याचं नातं आणि या दोन्ही क्षेत्रांत काम करणा-यांची, प्रेक्षकांची आणि तत्कालीन सरकारचीही या माध्यमांकडे पाहण्याची मानसिकता अशा ब-याच गोष्टींवर प्रकाश टाकणारा हा उतारा. `माझा नाटकी संसार’ या भा. वि. उर्फ मामा वरेरकर यांच्या आत्मचरित्राचा चौथा भाग १९६२ साली प्रसिद्ध झाला. पहिल्या भागानंतर २१ वर्षांनी. या भागातील `नटाचा झाला नाटककार’ या प्रकरणातून साभार.

…कोल्हापूरच्या महाराष्ट्र फिल्म कंपनीचा स्टुडिओ जळून गेला होता. या कंपनीचे सर्व अध्वर्यू ललितकलादर्श मंडळीतच वाढले होते. हीच फिल्म कंपनी काढण्यासाठी आनंदराव पेंटर हे `मानापमान’ नाटकाचे देखावे तयार केल्यानंतर आपल्या शिष्यगणांसह ललितकलादर्श मंडळी सोडून कोल्हापूरला गेले होते. `सैरंध्री’ हा चित्रपट काढण्याची सर्व सामग्री तयार झाली आणि त्याचवेळी आनंदराव पेंटर स्वर्गवासी झाले. त्यांचे शिष्य आणि बंधू बाबूराव पेंटर यांनी त्यांचं काम पुढे चालवून कंपनी नावारूपाला आणली. त्या काळच्या कुठल्याही चित्रपट संस्थेपेक्षा महाराष्ट्र फिल्म कंपनीचे चित्रपट उच्च दर्जाचे ठरले. कथा, अभिनय यांच्याप्रमाणेच कलात्मक तंत्रामुळे हे चित्रपट भारतात अव्वल दर्जाचे ठरले असतानाच ही आपत्ती आली. स्टुडिओबरोबर सर्व सामान, देखावे आणि फिल्म्स (पाझिटिव्ह आणि निगेटिव्ह) जळून गेल्या. ज्या काही फिल्म्स बाहेर चालत होत्या तेवढ्याच शिल्लक राहिल्या. कॅमेरा तेवढा बचावला होता. लॅबोरेटरीही वाचली होती.

या आपत्तीमुळं नवा चित्रपट काढणं अशक्य झालं होतं. आजच्याप्रमाणे त्यावेळी चित्रपटाला लाखांनी पैसे लागत नव्हते. उण्यापु-या दहा दजार रुपयांत उत्तम चित्रपट निघणं अशक्य नव्हतं. काही सामान्य चित्रपट पाच हजारातदेखील तयार केले जात होते. पण त्या काळात या धंद्यासाठी ही एवढी रक्कम उभी करणंदेखील बिकट होत होतं. ज्या मुंबईच्या सिनेमांनी महाराष्ट्र फिल्म कंपनीचे चित्रपट दाखवले होते, त्यांनी बाबुराव पेंटरांना या प्रसंगात मदत करायचं साफ नाकारालं. त्यांना तारण पाहिजे होतं. एका पुंजीपतीनं तर म्हटलं, “उद्या तुमची फिल्म निघाली नाही तर काय तुमच्या दाढीचे केस घ्यायचे?’’

बिचारे बाबुराव हताश झाले. त्यांची माझी सहज भेट झाली. मी त्यांना घेऊन कंपनीच्या बि-हाडी आलो. ते त्यांचं एका काळचं माहेरच होतचं ना! (बापुराव) पेंढारकरांना मी सर्व हकीकत सांगितली. `सत्तेचे गुलाम’ नाटक निघाल्यनंतर काही शिल्लक पडली होती, पण ती सारीच देऊन टाकणं शक्य नव्हतं. म्हणून श्री. सीताराम तलगेरी, इंजिनियर आणि त्यांचे एक-दोन मित्र अशी सर्व मंडळी मिळून दहा हजार रुपये उभे केले. त्यात सर्वात मोठा भाग ललितकलादर्श नाटक मंडळीचा होता. या रकमेवर महाराष्ट्र फिल्म कंपनीचा स्टुडिओ उभारला गेल्यावर त्यांनी सहा फिल्म्स तयार करून प्रदर्शन करण्यासाठी द्यायच्या असा करार झाला होता. या कराराच्या अटी पूर्ण करण्यासाठी एखादं सिनेमा थिएटर ताब्यात असणं आवश्यक होतं म्हणून ग्रँट रोडवरचं नाव्हेल्टी थिएटर घेण्याची बोलणी सुरू झाली.

हे थिएटर फार मोठं होतं. ते नुसतंच सिनेमा थिएटर नव्हतं. नाटकाचीही त्यात सोय होती. ती मुंबईतील कोणत्याही थिएटरपेक्षा प्रशस्त होती. स्टेजची लांबी, रुंदी आणि खोली भरपूर असून खाली प्रशस्त तळघर होतं. या वेळपर्यंत हे थिएटर फक्त चित्रपट दाखवण्यासाठी उपयोगात आणलं जात होतं. नाटकाचे प्रयोग करण्यासाठी स्टेजभर वीज खेळवता यावी अशी विजेच्या तारांची व्यवस्था आणि स्विचबोर्ड तयार करून घ्यावा लागला. रंगभूमीला योग्य असं तोंडही करून घेतलं.

यावेळपर्यंत कंपनीचे प्रयोग बाम्बे थिएटरात होत होते. हे थिएटर पिला हाऊस या नावानं ओळखल्या जाणा-या ग्रँट रोडच्या विभागात होतं. या विभागात एकमेकांना जवळ असलेली अशी सात थिएटरं होती. त्यात गुजराती, उर्दू आणि मराठी अशी नाटकं केली जात होती. या तिन्ही भाषाभगिनी एकाच कुटुंबाप्रमाणे या विभागात खेळीमेळीनं आणि आपुलकीनं नांदत होत्या. उत्पन्नाच्या दृष्टीनं उर्दू (हिंदी) आणि दोन नाटक कंपन्या जरी संपन्न होत्या तरी कला आणि साहित्य या दृष्टीनं मराठी कंपन्या आदर्श होत्या. उर्दू कंपन्यात एखादं नाटक लोकप्रिय झालं म्हणजे ते सारखं तीन-तीन वर्षे चालत असे. या दृष्टीनं `जहेरी साँप’ हे नाटक त्या काळात फार लोकप्रिय झालं होतं. त्याची छाया गडकरी यांच्या `पुण्यप्रभाव’ या नाटकावर फार मोठ्या प्रमाणावर पडलेली होती…

नाव्हेल्टी थिएटरात बुधवारी आणि शनिवारी रात्री आणि रविवारी दिवसा नाटकं करावयाची आणि इतरवेळी चित्रपट दाखवायचे अशी योजना होती.
त्यावेळी चित्रपट बोलके नव्हते. दोन आठवडे चालणारा चित्रपट चांगलाच समजला जात असे. त्यावेळी कुठलाच चित्रपट चार आठवड्यांपेक्षा जास्त काळ चालला नव्हता. सुरुवातीला इंग्रजी चित्रपटच या थिएटरात आम्ही दाखवीत होतो. त्यानंतर महाराष्ट्र फिल्म कंपनीचा सिंहगड हा चित्रपट तयार होऊन आला तो फारच लोकप्रिय झाला. पुरे चार आठवडे चालला. मुंबईतील त्या वेळच्या कोणत्याही देशी चित्रपटगृहात कोणताच देशी चित्रपट इतका लोकप्रिय झाला नव्हता. या `सिंहगड’ चित्रपटाच्या यशस्वितेमुळे बराच विश्वास उत्पन्न झाला, पण त्यावेळी देशी चित्रपट पुरेसे तयार होत नसल्यामुळं इंग्रजी चित्रपटांवर हे थिएटर चालवणं भाग पडलं…

नाव्हेल्टी थिएटरात जाण्यापूर्वी नवीन नाटक बसवावं असं ठरलेलं असल्यामुळे `तुरुंगाच्या दारात’ हे नाटक मी लिहून पुरं केलं. या नाटकाचा विषय अस्पृश्यतानिवारण हा होता…गांधीजींच्या तत्वाचा प्रसार करण्याच्या कामी हे नाटक उपयुक्त ठरेल असं मला वाटलं होतं, पण सर्वच गोष्टी त्याच्या आड आल्या. पहिली गोष्ट म्हणजे नाटकाचा विषय अस्पृश्यतानिवारण. दुसरी गोष्ट म्हणजे, अस्पृश्यतानिवारणाच्या संबंधात लोकमान्य टिळकांचा उल्लेख. तिसरी, एकांकप्रवेशी नाटक. चवथी, नाटकाचा कालावधी तीन तास. आणि शेवटची गोष्ट म्हणजे, नाटकात फक्त अकरा गाणी.

या नाटकाला मुहूर्तही फार विचित्र मिळाला. एक फेब्रुवारी १९२३ रोजी हे नाटक रंगभूमीवर आलं. त्याच दिवशी नाटकावरचा करमणुकीचा कर सुरू झाला. रँग्लर परंजपे त्यावेळी शिक्षणमंत्री होते. शिक्षणाच्या वाढीसाठी म्हणून मी हा कर बसवतो आहे असं ज्यावेळी त्यांनी सांगितलं त्याचवेळी शिक्षणाच्या कामी याचा उपयोग झाला नाही तर मी राजीनामा देईन अशी घोषणा त्यांनी केली होती. (हा कर शिक्षणाच्या कामी खर्ची पडला नाही आणि रँग्लर परंजपे यांनी राजीनामाही दिला नाही. ) या करमणुकीच्या करामुळं सर्वत्र मोठी खळबळ उडाली होती. वस्तुतः हा कर होता लोकांवर, पण लोकांना त्याची जाणीव नव्हती. लोकांवरचा हा कर वसूल करण्याची जबाबदारी वस्तुतः सरकारची, पण तो वसूल करण्याचं जोखीम टाकलं होतं नाटक करणा-यांवर आणि चित्रपट दाखवणा-यांवर. यात चूक झाल्यास त्या संस्थांना दंड ठोठावण्याचीही जरब देण्यात आली होती. शेवटपर्यंत हाच अन्याय स्वातंत्र्याच्या कालातही चालू होता.

सुरुवातीला शेवटच्या दरावरदेखील कर होता, पण पुढे तो काढून टाकण्यात आला. पुन्हा काही दिवसांनी तो परत ठेवण्यात आला असंही आठवतं. प्रत्येक नाटक मंडळी आणि सिनेमागृह यांना या करासाठी आपली स्वतंत्र कचेरी उघडावी लागली होती. सिनेमागृहाचे मालक यांनी एकत्र येऊन या कराविरुद्ध जोराची चळवळ केली, पण तिचा काहीच उपयोग झाला नही. चळवळ करायची तर ती लोकांनी कारवी, हा कर काही चित्रपटांवर नाही किंवा नाटकांवरही नाही, लोकांवर आहे असं सरकारचं म्हणणं होतं आणि सामान्य जनसमाज या कामी चळवळ करायला पुढे सरसावत नव्हता.

ठेवणीतले लेख

    आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा



    [recaptcha]

    काही निवडक प्रतिक्रिया:

    नरेंद्र चौधरी


    आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
    संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया