चित्र-चरित्र

मुक्ता बर्वे
मुक्ता बर्वे
अभिनेत्री
१७ मे १९८१

मुक्ता बर्वे यांचा जन्म पिंपरी चिंचवड पुणे येथे झाला. मुक्ताचे वडील श्री वसंत बर्वे टेल्को कंपनीत नोकरीस तर आई विजया बर्वे या शिक्षिका तसेच नाट्यलेखिका होत्या. मुक्तानं बालपणापासून रंगभूमीवर काम करण्यास सुरुवात केली. आईने लिहिलेल्या "रुसू नका फुगू नका" या बालनाट्यात भित्रा ससा आणि परी राणी अशा दोन्ही भूमिकांमध्ये मुक्ता झळकली. यावेळी ती अवघी चार वर्षांची होती. त्यानंतर थेट दहावी झाल्यावर मुक्ताने रत्नाकर मतकरी यांचं "घर तिघांचे हवे" हे नाटक केलं.पुणे विद्यापीठातून ती नाट्य शास्त्र विषयात पदवीधर झाली. १९९९ मध्ये 'घडलंय बिघडलंय' या कार्यक्रमातून मुक्ताने टेलिव्हिजन क्षेत्रात पदार्पण केलं. 'आम्हाला वेगळं व्हायचंय' हे तिचं पहिलं नाटक आणि तिचा पहिला चित्रपट होता २००२ मधील 'चकवा'. `थांग`, `सावर रे`, `माती माय`, `एक डाव धोबीपछाड`, `बदाम राणी गुलाम चोर`, `ऐका दाजीबा`, `हायवे`, `मंगलाष्टक वन्स मोअर`, `जोगवा`, `मुंबई पुणे मुंबई`, `मुंबई पुणे मुंबई २`, `डबलसीट`, `गणवेष`, `वायझेड` या महत्त्वपूर्ण चित्रपटांमधून मुक्ता झळकली. `देहभान`, `फायनल ड्राफ्ट`, `छापा काटा`, `रंग नवा`, `इंदिरा`, `कोडमंत्र` ही तिची उल्लेखनीय नाटकं. `पिंपळपान`, `बंधन`, `बुवा आले`, `चित्त चोर`, `आभाळमाया`, `अग्निशिखा`, `मधू इथे चंद्र तिथे`, `एका लग्नाची दुसरी गोष्ट` या मालिकांमधील मुक्ताच्या व्यक्तिरेखा रसिकांच्या पसंतीस उतरल्या.

स्माइल प्लीज (२०१९), वेडिंगचा शिनेमा (२०१९), बंदीशाळा (२०१९), मुंबई पुणे मुंबई-३ (२०१८), रणांगण (२०१८), आम्ही दोघी (२०१७), हृदयांतर (२०१७) हे मुक्ताचे अलीकडचे काही उल्लेखनीय चित्रपट आहेत.

२०२१ मधील 'अजूनही बरसात आहे' या मालिकेमधील मुक्ताच्या अभिनयाचं कौतुक झालं होतं. मुक्ता बर्वे यांनी २०२२ मध्ये 'आपडी थापडी' या मराठी चित्रपटात तसेच 'चारचौघी' या नाटकात अभिनय केला

--मंदार जोशी



चित्र-चरित्र