चित्र-चरित्र

संजय सूरकर
संजय सूरकर
दिग्दर्शक
१९ ऑगस्ट १९५९ --- २७ सप्टेंबर २०१२

संजय सूरकर हे मूळचे नागपूरचे होते. पण त्यांची चित्रपट कारकिर्द प्रामुख्याने घडली ती मुंबई येथे आल्यानंतरच. त्यांनी राज्य नाट्यस्पर्धेत ‘वंश’ या नाटकाचे दिग्दर्शन केले व ते नाटक पुरस्कार प्राप्त ठरले. तेव्हा कलावैभवचे मोहन तोंडवलकर यांनी ‘पाउलखुणा’ या नावाने तेच नाटक व्यावसायिक रंगभूमीवर आणले. रंगभूमीची हौस असूनही संंजय सूरकर मराठी चित्रपट व मालिका यांच्या जगात खूप रमले व त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत विविधता आणण्याचे मूलभूत व महत्त्वपूर्ण काम केले. ‘चौकट राजा’ (१९९१), ‘यज्ञ’ (१९९४) ‘तू तिथं मी’ (१९९५), ‘रावसाहेब’ (१९९६), ‘घराबाहेर’, ‘सातच्या आत घरात’ (२००४), ‘सखी’ (२००७), ‘आईशपथ’ (२००६), ‘तांदळा’ (२००८), ‘मास्तर एके मास्तर’ (२००९), असे मराठी चित्रपट करता करता ‘स्टॅण्डबाय’ या चित्रपटाद्वारे ते हिंदीतही पोहोचले.

सतत नवे विषय हाताळणे या वैशिष्ट्यामुळे संजय सूरकर यांच्याबद्दल चित्रपटासृष्टीत कायम उत्सुकता राहिली. त्यांनी ‘अवंतिका’ (१९९८), ‘सुकन्या’ (१९९८), ‘ऊन पाऊस’ (१९९८) या मराठी मालिकाही दूरदर्शनसाठी तयार केल्या. त्यांनतर त्यांनी ‘आप की अंतरा’ या हिंदी मालिकेचे दिग्दर्शन केले. यात त्यांनी ऑटीझम या विकाराभोवती भावपूर्ण कथानक गुंफले, तर ‘सुखान्त’ या चित्रपटातून त्यांनी इच्छामरणाचा विषय मांडला. भरपूर व उत्तम वाचन, सामाजिक घडामोडींचे भान व आपल्या मनोरंजन क्षेत्राची वाटचाल यावर संंजय सूरकर यांचे कायमच विशेष लक्ष राहिले व त्यांना आपल्या प्रगतीत त्याचा खूप ङ्गायदादेखील झाला. ‘वेगळ्या वाटेवरचा एक दिग्दर्शक’ अशीच संजय सूरकर यांची ओळख आहे. स्मिता तळवळकर यांच्या ‘अस्मिता चित्र’चे यश व प्रतिष्ठा यातही संजय सूरकर दिग्दर्शित चित्रपटांचा विशेष वाटा आहे.

वयाच्या अवघ्या ५३ व्या वर्षी ‘लाठी’ या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या दरम्यान हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे पुणे येथे निधन झाले.

- दिलीप ठाकूर



चित्र-चरित्र