चित्र-चरित्र

द. मा. मिरासदार
द. मा. मिरासदार
विनोदी लेखक व कथाकथनका
१४ एप्रिल १९२७

मराठीतले विनोदी लेखक व कथाकथनकार दत्ताराम मारुती मिरासदार उर्फ द. मा. मिरासदार यांचा जन्म १४ एप्रिल १९२७चा. काही वर्षे पत्रकारी केल्यानंतर त्यांनी १९५२ साली अध्यापनक्षेत्रात प्रवेश केला. पुण्याच्या कँप एज्युकेशनच्या शाळेत ते शिक्षक होते. व्यंकटेश माडगूळकर, शंकर पाटील आणि द. मा. मिरासदार या त्रयीने १९६२ सालापासून कथाकथन करून महाराष्ट्रातलील जनतेला भुरळ घातली होती. मिरासदारांच्या व्यंकूची शिकवणी, माझ्या बापाची पेंड, शिवाजीचे हस्ताक्षर, भुताचा जन्म, माझी पहिली चोरी, हरवल्याचा शोध इत्यादी कथा उत्कृष्ट लिखाण आणि सादरीकरण यामुळे वाचकांच्या आणि श्रोत्यांच्या मनात कायमच्या कोरल्या गेल्या. गप्पागोष्टी, गुदगुल्या, मिरासदारी, गप्पांगण, ताजवा, असे २४ कथासंग्रह, १८ विनोदी चित्रपटांच्या पटकथा त्यांच्या नावावर आहेत. ‘एक डाव भुताचा’ या चित्रपटात कथा-पटकथा लेखनासह हेडमास्तरची भूमिकाही त्यांनी केली होती. ‘ठकास महाठक’ हा त्यांचा आणखी एक उल्लेखनीय चित्रपट. मिरासदार यांनी लिहिलेल्या ‘व्यंकूची शिकवणी’ या कथेवर ‘गुरुकृपा’ हा चित्रपट बेतला होता. ‘एक डाव भुताचा’ आणि ‘ठकास महाठक’ ह्या दोन चित्रपटांच्या संवादलेखनाबद्दल त्यांना पारितोषिके मिळाली आहेत. मिरासदार यांच्या ‘भुताचा जन्म’ या कथेवर बनलेली शॉर्टफिल्म आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये गाजली. ही कलाकृती रोममध्ये होणाऱ्या फेस्टिवलमध्येही दाखवली गेली.

द. मा. मिरासदार यांचे २ ऑक्टोबर २०२१ रोजी निधन झाले.

- मंदार जोशी



चित्र-चरित्र