चित्र-चरित्र

आचार्य प्र. के. अत्रे
आचार्य प्र. के. अत्रे
पटकथा, संवाद, गीतलेखक, निर्माता, दिग्दर्शक
१३ ऑगस्ट १८९८ --- १३ जून १९६९

प्रल्हाद केशव अत्रे हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. कवी, विडंबनकार, नाटककार, पत्रकार, विनोदी लेखक आणि पट्टीचा वक्ता अशी सर्व क्षेत्रे त्यांनी आपल्या कर्तृत्वाने गाजवली होती. १९३२ साली चित्रपट बोलू लागल्यावर या नव्या माध्यमाबद्दल अनेक मराठी साहित्यिकांना कुतूहल होते. आचार्य अत्रे हे त्यापैकी एक. चित्रपटात मात्र ते निमंत्रणावरून आले. १९३३ साली आचार्य अत्रे यांचे ‘साष्टांग नमस्कार’ हे विनोदी नाटक गाजत होते. पुण्याला दादासाहेब तोरणेंचा ‘सरस्वती सिनेटोन स्टुडिओ’ होता. त्यांनी आचार्य अत्रे यांना पुढच्या बोलपटांची कथा लिहायला बोलावले, पण हा चित्रपट तयार झालाच नाही. दरम्यान सांगलीहून बेडेकर यांनी ‘ठकीचे लग्न’चे संवाद लिहायला त्यांना बोलावले आणि बाबूराव पेंढारकरांनी ‘हंस पिक्चर्स’साठी तिसरे निमंत्रण दिले. ‘हंस’साठी त्यांनी ‘धर्मवीर’ (१९३७) या चित्रपटाची पटकथा लिहिली. मा. विनायक यांनी तो चित्रपट दिग्दर्शित केला. अत्रे लेखक, विनायक दिग्दर्शक असे ‘हंस’चे ‘प्रेमवीर’, ‘ब्रह्मचारी’, ‘ब्रॅण्डीची बाटली’ हे विनोदी आणि ‘अर्धांगी’ असे गंभीर चित्रपट तयार झाले. सर्वच विनोदी चित्रपट गाजले, पण त्यातल्या त्यात ‘ब्रह्मचारी’ या चित्रपटाने रसिकांना मोहिनी घातली. ‘यमुनाजळी खेळू खेळ कन्हैया’ या अत्रे यांच्या गाण्याने अतोनात लोकप्रियता मिळवली.

चित्रपटांची लोकप्रियता लक्षात घेऊन अत्रे यांनी लिमिटेड कंपनी काढण्याची कल्पना मांडली. बाबूराव पेंढारकर यांनी ती उचलून धरली. त्यानंतर ‘हंस’चे ‘नवयुग चित्रपट लि. कंपनी’मध्ये रूपांतर झाले आणि ती कंपनी कोल्हापूरहून पुण्यात आली. अशा प्रकारे अत्रे यांनी ‘नवयुग स्टुडिओ’ सुरू केला. ‘नवयुग’साठी आचार्य अत्रेंनी ‘लपंडाव’ हा चित्रपट लिहिला. ‘नवयुग’ने के. नारायण काळे यांना दिग्दर्शनाचे काम दिले. ‘लपंडाव’ पूर्ण झाल्यावर ‘संत सखू’ दिग्दर्शित करायचे मा. विनायक यांनी नाकारल्यावर अत्रे ‘नवयुग’चा राजीनामा देऊन बाहेर पडले. म्हणजे ‘प्रभात’च्या आधी एक वर्ष ‘नवयुग’ कंपनी फुटली आणि आचार्य अत्रे मुंबईत आले. त्यांनी परळला भाडे करारावर स्टुडिओ घेतला आणि ‘पायाची दासी’ हा चित्रपट लिहिला. तोही लोकप्रिय ठरला. ‘पायाची दासी’तील ‘अंगणात फुलल्या जाईजुई’ व ‘ऐन दुपारी एकटी अशी’ ही गाणी गाजली. त्यानंतर आचार्य अत्रे यांनी ‘वसंतसेना’ हा हिंदी-मराठी चित्रपट निर्माण केला. गजानन जागीरदारांनी त्याचे दिग्दर्शन दिले. पण ‘वसंतसेना’ने त्यांना प्रचंड अपयश दिले. कर्जाचा डोंगर उभा राहिला. त्यानंतर ‘बाईलवेडा’ (१९४३), ‘मोरूची मावशी’ (१९४८), ‘ब्रह्मघोटाळा’ (१९४९), ‘ही माझी लक्ष्मी’ (१९५१), ‘श्यामची आई’ (१९५३), ‘महात्मा फुले’ (१९५४) हे चित्रपट काढून आचार्य अत्रे यांनी ‘अत्रे पिक्चर्स’ बंद केली आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात उडी घेतली. त्यासाठी त्यांनी ‘दै. मराठा’ हे वृत्तपत्र सुरू केले.

‘श्यामची आई’ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे राष्ट्रपती सुवर्णपदक मिळाले. ‘महात्मा फुले’ला रौप्यपदक मिळाले. ‘मोरूची मावशी’पासून कथा-पटकथा-संवाद याबरोबरच पुढच्या सर्व चित्रपटांचे दिग्दर्शनही आचार्य अत्रे यांनी केले. पण आर्थिक परिस्थिती ओढगस्तीची राहिली. त्यांना ‘चित्रमंदिर स्टुडिओ’ विकावा लागला, तसेच हिंदी चित्रपटसृष्टीशी स्पर्धा सुरू झाल्यामुळे अत्रे चित्रपटसृष्टीतून बाहेर पडले.

- सुधीर नांदगावकर



चित्र-चरित्र