चित्र-चरित्र

माधव शिंदे
माधव शिंदे
निर्माता-दिग्दर्शक
२ जुलै १९१७ --- २० ऑगस्ट १९८८

माधव रावजी शिंदे कोल्हापूरचे होते. आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात मा. विनायक यांच्या ‘हंस पिक्चर्स’ या संस्थेत त्यांनी उमेदवारी केली. लता मंगेशकर तेव्हा मा. विनायक यांच्या परिवारात होत्या, त्यांच्याशी माधवरावांचा परिचय झाला. लताबाईंनी माधवरावांना स्वतंत्र दिग्दर्शनाची पहिली संधी दिली. ‘सुरेल चित्र’ ही संस्था स्थापन करून माधव शिंदे यांनी ‘वादळ’ (१९५१) हा चित्रपट दिग्दर्शित केला. निर्माती लता मंगेशकर. ते स्वत: कोल्हापूरचे असूनही माधव शिंदे कधी तमाशाप्रधान चित्रपटांच्या वाटेला गेले नाहीत. कौटुंबिक चित्रपट हा त्यांचा प्रांत. रडारड असणार्‍या कौटुंबिक चित्रपटांची त्या काळात चलती होती. माधव शिंदे यांनी आपल्या चित्रपटांतून ही रडारड टाळून सातत्याने ते चित्रपट दिग्दर्शित करत राहिले. १९५० ते १९७० हा मराठी चित्रपटांचा पडता काळ होता. पण अशा काळातही माधव शिंदे यांची निर्मिती सातत्याने सुरू राहिली. या काळात त्यांनी ‘कांचनगंगा’ (१९५४), ‘बाळ माझं नवसाचं’ (१९५५), ‘गृहदेवता’ (१९५७), ‘शिकलेली बायको’ (१९५९), ‘कन्यादान’ (१९६०), ‘थोरातांची कमळा’, ‘माणसाला पंख असतात’, ‘धर्मकन्या’ इ. चित्रपट १९७० पर्यंत दिग्दर्शित केले.
‘गृहदेवता’ हा चित्रपट ताश्कंद महोत्सवात दाखविला गेला. त्यातील काव्यात्मकता वेधक होती. डॉ. नाथमाधव यांच्या कादंबरीवरील ‘शिकलेली बायको’ हा चित्रपट रौप्यमहोत्सवी ठरला. महादेवशास्त्री जोशींच्या कथेवर ‘कन्यादान’ हा चित्रपट आधारित होता. ‘थोरातांची कमळा’ किंवा वि.स. खांडेकरांनी लिहिलेला ‘माणसाला पंख असतात’ या चित्रपटकथा माधव शिंदे यांच्या प्रकृतीशी विसंगत होत्या. कौटुंबिक विषयाचे व कोमल भावनांचे चित्रण करणारे दिग्दर्शक म्हणून मराठी चित्रपटांच्या इतिहासात माधव शिंदे ओळखले जातात. वयोमानानुसार माधव शिंदे आपल्या कामातून निवृत्त झाले.
- सुधीर नांदगांवकर



चित्र-चरित्र