चित्र-चरित्र

शं. ना. नवरे
शं. ना. नवरे
लेखक
२१ नोव्हेंबर १९२७ --- २५ सप्टेंबर

शंकर नारायण नवरे उर्फ शन्ना नवरे
शं.ना. नवरे यांचं व्यक्तिमत्व अतिशय लोभस आणि लोकप्रिय होतं... ते अतिशय शैलीदार वक्ते आणि माणसांमध्ये रमणारे लेखक म्हणून प्रसिद्ध होते... कादंबरी, कथा, ललित लेख नाटकं , सिनेमा असं चौफेर लेखन त्यांनी केलंय. त्यांच्या लेखनातून बदलत्या शहरी समाज मनाचं चित्रण आपल्याला पहायला मिळतं. त्यांनी आपल्या लेखणीतून मध्यमवर्गीयांच्या सुखदु:खाचं चित्रण केलंय.शंनांच्या लेखनानं वाचकांना कधी अंतर्मुख केलं तर प्रसंगी रिझवलेही.

१९४५ मध्ये शालांत परीक्षा पास झाल्यावर त्यांनी मुंबईच्या सेंट झेव्हियर्स, सिद्धार्थ कॉलेज आणि पुण्यातल्या फर्ग्युसन कॉलेजमधून महाविद्यालयीन शिक्षण घेतलं. १९४९ साली त्यांनी बी.एस्सीची पदवी मिळवली. काही काळ त्यांनी मंत्रालयात शासकीय नोकरीही केली मात्र काही काळानंतर त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. सामान्य, मध्यमवर्गियांच्या जाणीवा, सुख-दु:खाच्या व्यथा आणि वेदना त्यांनी आपल्या सिध्दहस्त लेखणीतून, रंगमंचीय अविष्कारातून समाजासमोर आणल्या. कथा, ललित लेख, नाटक, चित्रपट पटकथा, वृत्तपत्रीय व नियतकालिकांतील स्तंभ अशा विविध माध्यमांतून ‘शन्नां’नी लेखन केले, पण ‘शन्ना’ खऱ्या अर्थाने खुलले आणि रमले ते कथेच्या विश्वात. १९५१ नंतर नवकथेचा बहारीच्या काळात ‘शन्नां’चीही प्रतिभा बहरली. मात्र कोणत्याही एका लेखन प्रकारात ते कधीच अडकून पडले नाहीत. वाचकांना अंतर्मुख करणारी, खुसखुशीत मध्येच हास्याची लकेर, चिमटे घेणारी ‘शन्नां’ची लेखणी तितक्याच ताकदीची रंगमंचीय पात्रे उभी करू शकली. शन्नाडे या नावाने त्यांनी वृत्तपत्रांतूनही स्तंभलेखन केले आहे. शं.ना. नवरे यांनी जयवंत दळवी यांच्या महानंदा कादंबरीवरून ’गुंतता हृदय हे’ हे नाटक लिहिले आहे. हे नाटक अमाप गाजले. डोंबिवली गावावर त्यांचे अतोनात प्रेम होते. ‘डोंबिवली भूषण’ पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले होतेच पण ते खऱ्या अर्थाने या शहराच्या सांस्कृतिक जडणघडणीतील महत्त्वाचा दुवाही होते. डोंबिवलीविषयी त्यांच्या मनातले ममत्व कायम होते त्यामुळेच नातेवाईक तसेच मित्रांनी आग्रह करूनही त्यांनी मुंबईत कायमचे वास्तव्य केले नाही. नोकरीनिमित्त मुंबई ही फक्त त्यांची कर्मभूमीच राहिली. डोंबिवलीत झालेल्या २००३ सालच्या नाट्यसंमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यांना लेखनातून मिळणाऱ्या पैशांचा मोठा हिस्सा ते पडद्यामागच्या कलाकारांसाठी खर्च करीत असत.
-मंदार जोशी



चित्र-चरित्र