चित्र-चरित्र

सलील कुलकर्णी
सलील कुलकर्णी
संगीतकार
६ ऑक्टोबर १९७२

वयाच्या तिस-या वर्षी सलील कुलकर्णी यांची आकाशवाणी वरून संगीताची सुरवात झाली. त्यांनी संगीताचे शिक्षण गंगाधरबुवा पिंपळखरे, जयमाला शिलेदार आणि प्रमोद मराठे यांच्याकडे घेतले. एमबीबीएस पूर्ण केल्यानंतर त्यांनी संगीताला जास्तीत जास्त वेळ देण्याचे ठरवले. दवाखाना व संगीताचे कार्यक्रम या दोन्हीमधे दुवा साधून सलील रियाज व लिखाण करत होते. त्यांचा गीतकार संगीताचे अनेक कार्यक्रम सादर केल्यानंतर २००३ मध्ये डॉ. सलील आणि संदीप खरे यांनी 'आयुष्यावर बोलू काही' या सांगितिक कार्यक्रमाची निर्मिती केली. त्यावेळी त्यांनाही वाटले नाही या कार्यक्रमाला एवढा प्रचंड प्रतिसाद मिळेल तो. पण या संगीताच्या आगळ्या, वेगळ्या प्रयोगाला सर्वत्र प्रसिद्धी मिळाली. आज या कार्यक्रमाचे १२०० हून अधिक प्रयोग झाले आहेत. डॉ. सलील आणि संदीप यांच्या आयुष्यावर बोलू काही‘ कार्यक्रमाने रसिकांना नेहमीच भुरळ घातली आहे. ‘आयुष्यावर बोलू काही’ या कार्यक्रमातील ‘दमलेल्या बाबाची कहाणी’ म्हणजे हमखास डोळ्यांत आसवांना आमंत्रण देणारी. पण ‘दमलेल्या बाबा’च्या कल्पनेचा जन्म झाला तो नागपुरात. या कार्यक्रमात ‘दूर देशी गेला बाबा’ असं एक गाणं आहे. नागपुरात एकदा कार्यक्रमासाठी आलो असताना नितीन गडकरी यांच्याकडे जेवायला बोलावलं होतं. त्यावेळी गप्पांमध्ये कांचन वहिनींनी ‘दूर देशी जाणारा जसा बाबा असतो, तसाच एक दमलेला बाबा असावा’, असा विषय काढला. गडकरींच्या घरून हॉटेलमध्ये परत आल्यानंतरही दमलेल्या बाबाचा विषय डोक्यात तसाच होता. मग हॉटेल सेंटर पॉइंटमध्ये मी व संदीप आम्ही रात्री उशिरापर्यंत चर्चा केली आणि त्यानंतर तीन दिवसांनी संदीपने ‘दमलेला बाबा’ माझ्या हाती ठेवला, ही आठवण सलील कुलकर्णी यांनी एका मुलाखतीत सांगितली होती.

२००३ मध्ये सलील कुलकर्णी यांचे संगीत असलेला 'विठ्ठल विठ्ठल' हा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला. आपल्या सांगितिक कारकीर्दीमध्ये सलील यांनी अनेक हिंदी आणि मराठी अल्बमना संगीत दिले आहे. तसेच हिंदी आणि मराठी चित्रपटांना संगीत त्यांनी संगीत दिले आहे. नवीन पिढीचे संगीतकार अशी त्यांची ओळख असून त्यातही बालगीतांचे संगीतकार म्हणून त्यांना जास्त पसंती आहे. एक उनाड दिवस, जन मन गण, जमीन, चैंपियन, आता कशाला उद्याची बात, धागे दोरे, छोड़ो कल की बाते, निशानी डावा अंगठा, विट्ठल विट्ठल, पांढर, चिंटू, चकवा, बंड्या आणि बेबी, हाय काय नाय काय, आनंदी आनंद, हॉउसफुल आणि बॉयोस्कोप हि त्यातील काही प्रमुख चित्रपटाची नावे आहेत. झी मराठी ने केलेल्या विविध संगीतकार आणि कवी यांच्या गीतांवरील कार्यक्रम नक्षत्रांचे देणे चे संगीत नियोजन डॉ. सलील कुलकर्णी यांनी केले. दूरचित्रवाणी वरील सा रे ग म प व गौरव महाराष्ट्राचा मधील परीक्षक म्हणून त्यांना भरपूर प्रसिद्धी मिळाली. आयुष्यावर बोलू काही या कार्यक्रमापासून ते सारेगमपमधील परिक्षकापर्यंतचा सलील यांचा प्रवास पाहता ते आज लहानथोरांचे आवडते झाले आहेत. त्यांचे अग्गोबाई ढग्गोबाई, अग्गोबाई ढग्गोबाई भाग २, लता दीदींच्या बरोबरचा अल्बम,मैत्र जीवाचे, मधली सुट्टी, सुधीर मोघे व बा.भ. बोरकर यांच्या कविता हे सर्व अल्बम खूप गाजले आहेत. त्यांनी लोकसत्ता तसेच सकाळ या वृत्तपत्रामध्ये ते स्तंभ लेखनही केले आहे. २०१७ च्या गणपतीत डॉ. सलील कुलकर्णी यांनी हे गजवदना गाण्याचा व्हिडिओ सादर केला होता. ‘हे गजवदन’ या गाण्याचं वेगळेपण म्हणजे ९० कलाकारांचा सहभाग असलेले हे गाणं होते. 'लपवलेल्या काचा' हे पुस्तकही प्रकाशित झाले आहे. पुण्यात सलील कुलकर्णी म्युझिक स्कूल ही सुरू केले असून याद्वारे ते युवा कलाकारांना मार्गदर्शन करतात. डॉ. सलील कुलकर्णी यांचा लेखक व दिग्दर्शक म्हणून 'वेडिंगचा शिनेमा' हा पहिला चित्रपट एप्रिल २०१९ मध्ये प्रदर्शित झाला. ‘वेडिंगचा शिनेमा’ने भारतात आणि परदेशांतसुद्धा रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळवला. वेडिंगचा शिनेमा’ची प्रस्तुती एव्हरेस्ट एंटरटेन्मेंटची असून निर्मिती गेरुआ प्रॉडक्शन्स आणि पीइएसबीची आहे. या निखळ विनोदी चित्रपटाचा मोठ्या प्रमाणावर बोलबाला झाला आणि रूढार्थाने डॉ. सलील कुलकर्णी दिग्दर्शक म्हणून प्रस्थापित झाले.

- संजीव वेलणकर



चित्र-चरित्र