चित्र-चरित्र

किरण शांताराम
किरण शांताराम
दिग्दर्शक, निर्माते
२६ जून १९४३

भारतीय चित्रपटांचे श्रेष्ठ दिग्दर्शक व्ही. शांताराम हे किरण यांचे पिताश्री. १९५९ साली एस.एस्सी. झाल्यावर किरण यांनी व्ही. शांताराम यांच्या मार्गदर्शनाखाली चित्रपटक्षेत्रातली उमेदवारी सुरू केली. लवकरच ते दिग्दर्शन विभागात शांतारामबापूंचे पाचवे साहाय्यक म्हणून काम करू लागले. ते १९७५ साली साहाय्यक दिग्दर्शक झाल्यावर शांतारामबापूंनी त्यांना दिग्दर्शनाची संधी दिली. जगदीश खेबुडकरांची संवाद व गीते आणि राम कदम यांचे संगीत असलेला ‘झुंज’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. पण त्यानंतर किरण पुन्हा दिग्दर्शनाकडे वळले नाहीत. त्यांनी १९८८ साली ‘व्ही. शांताराम प्रॉडक्शन’च्या युवा विभागासाठी ‘अशी ही बनवाबनवी’ हा सचिन दिग्दर्शित विनोदी चित्रपट निर्माण केला. तो कमालीचा यशस्वी झाला. नंतर १९८९ साली गिरीश घाणेकरांना दिग्दर्शनासाठी घेऊन ‘बाळाचे बाप ब्रह्मचारी’ चित्रपट निर्माण केला. दरम्यान शांतारामबापूंचे निधन (१९९०) झाले. त्यामुळे त्यांनी उभे केलेले साम्राज्य सांभाळण्याची जबाबदारी किरण यांच्यावर आली. साहजिकच त्यांना निर्मितीकडे लक्ष देणे जमेना. रेकॉर्डिंग स्टुडिओ, राजकमल स्टुडिओ, व्ही. शांताराम फाऊंडेशन, प्लाझा थिएटर, सिल्व्हर स्क्रीन एक्स्चेंज या सर्व संस्थांचा कार्यभार किरण यांनी समर्थपणे सांभाळला. याच काळात किरण मुंबईतील अग्रगण्य फिल्म सोसायटी ‘प्रभात चित्र मंडळ’च्या संपर्कात आले आणि चित्रपट संस्कृतीचा वारसा त्यांच्या लक्षात आला. यातूनच १९९७ साली मुंबई महानगराचा पहिला आंतरराष्ट्रीय महोत्सव भरवण्यात त्यांनी पुढाकार घेतला. त्यासाठी ‘मुंबई अकादमी ऑफ मुव्हिंग इमेजिस’ हा न्यास स्थापन केला. या संस्थेचे सचिव या नात्याने महोत्सवाची धुरा त्यांनी सांभाळली. नंतर हा महोत्सव ‘रिलायन्स’कडे देण्यात आला. महाराष्ट्र शासनाने २००१ साली त्यांची मुंबईचे नगरपाल म्हणून नियुक्ती केली गेली. वर्षभरात त्यांनी उत्तम कामगिरी केल्याने या पदाच्या इतिहासात प्रथमच २००२ मध्ये दुसर्‍या वर्षी त्यांची नियुक्ती करण्यात आली. या काळात मुंबई महानगरासाठी एखादा आंतरराष्ट्रीय कार्यक्रम आयोजित करावा, या उद्देशाने देशातला पहिला ‘थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सव’ सुरू झाला. या महोत्सवाने दशकभराचा टप्पा पार केला आहे. चित्रपट निर्मितीपेक्षाही चित्रपट संस्कृती प्रसार हे किरण यांचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी प्रभात चित्र मंडळ, फेडरेशनचा महाराष्ट्र चॅप्टर, एशियन फिल्म फाऊंडेशन इ. संस्थांत किरण कार्यरत आहेत. - सुधीर नांदगांवकर (मजकूर लेखन सौजन्य : विवेक मासिक, आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण, शिल्पकार चरित्रकोश)चित्र-चरित्र