चित्र-चरित्र

मृणाल कुलकर्णी
मृणाल कुलकर्णी
अभिनेत्री
२१ जून

मृणाल रुचिर कुलकर्णी यांचा जन्म पुणे येथे झाला. प्रख्यात लेखक गो.नी. दांडेकर यांची नात, प्रा. वीणा देव आणि डॉ. विजय देव यांची कन्या, चरित्र अभिनेते जयराम कुलकर्णी, डॉ. हेमा कुलकर्णी यांची सून असलेल्या मृणाल यांनी वयाच्या पंधराव्या वर्षी ‘स्वामी’ मालिकेद्वारे ‘रमा’ म्हणून अभिनयक्षेत्रात पदार्पण करत, पुढे छोटा आणि मोठा असे दोन्ही पडदे गाजवले.

गोनीदांबरोबर गडकिल्ले पालथे घालणार्‍या मृणाल प्रारंभी अभिनयाकडे गांभीर्याने पाहत नव्हत्या; पण त्यांच्या ‘रमे’वर रसिकांनी इतके अपरंपार प्रेम केले की, पुढे अभिनय हीच त्यांची मुख्य ओळख बनली. शालेय शिक्षण हुजूरपागा शाळेत, तर पुण्याच्या सर परशुराम महाविद्यालयातून बी.ए. आणि मराठी-इंग्रजी वाङ्मयात ‘मास्टर इन लिटरेचर’ ही पदवी घेणार्‍या मृणाल यांनी महाविद्यालयात अध्यापक म्हणूनही काही काळ काम केले आहे. त्यांच्या आजीच्या (नीरा दांडेकर यांच्या) आग्रहामुळे त्या गंगाधरबुवा पिंपळखरे, पद्माकर बर्वे व मालती पांडे-बर्वे यांच्याकडे गाणे शिकल्या. चित्रकला, ट्रेकिंग, छायाचित्रण व वाचन हे छंद जोपासण्याबरोबरच त्यांनी कथ्थकचेही शिक्षण घेतले आहे. व्यक्तिमत्त्वाचे पैलू जितके अधिक, तितका अभिनयही अधिक कसदार व संपन्न होतो, याचे मृणाल या साक्षात उदाहरण आहेत.

‘स्वामी’, ‘पिंपळपान’, ‘अवंतिका’, ‘राजर्षी शाहू महाराज’ ‘गुंतता हृदय हे’ अशा मराठी, तर ‘श्रीकांत’, ‘हसरते’, ‘मीरा’, ‘टीचर’, ‘दी ग्रेट मराठा’, ‘स्पर्श’, ‘नूरजहॉं’, ‘द्रौपदी’, ‘सोनपरी’, ‘झूठा सच’ या गाजलेल्या हिंदी मालिकांमधून अभिनय आणि व्यक्तिमत्त्वातला वेगळेपणा रसिकांच्या मनावर ठसवणार्‍या मृणाल, ‘माझं सौभाग्य’ या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत आल्या. प्रारंभी सारे काही सोसणारी, मात्र नंतर नवर्‍याला वठणीवर आणणारी नायिका या चित्रपटात त्यांनी साकारली. ‘जमलं हो जमलं’, ‘घराबाहेर’, ‘लेकरू’, थांग’, ‘जोडीदार’ हे मृणाल यांचे महत्त्वाचे चित्रपट. त्यांनी ‘कमला की मौत’, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’, ‘वीर सावरकर’, ‘कुछ मीठा हो जाए’ या हिंदी चित्रपटांतही निवडक भूमिका केल्या आहेत. ‘राजा शिवछत्रपती’ मालिकेमधील जिजाबाई यांची साकारलेली व्यक्तिरेखा खूप गाजली. ‘यलो’, ‘राजवाडे अॅंड सन्स’, ‘अ रेनी डे’ हे त्यांचे अलीकडचे काही चित्रपट.

भूमिकांबाबतचा चोखंदळपणा, निवड करण्यामागची त्यांची दृष्टी हाही मृणाल यांचा नोंद घेण्याजोगा विशेष आहे. मालिकेतली भूमिका असो वा चित्रपटातली, मृणाल आपल्या तत्त्वाबाहेर जाऊन ती करणार नाही हे नक्की. राज कपूर यांच्या ‘हीना’ चित्रपटातील ‘हीना’ या भूमिकेसाठी त्यांना विचारणा झाली होती. वेगळ्या शक्यता निर्माण करणारी, मोठी वाट खुली करणारी ही संधी होती. मात्र ‘अशा चित्रपटातले नायिकेचे दर्शन मनाला पटत-रुचत नाही’ या कारणास्तव मृणाल यांनी ही भूमिका, नवी संधी नाकारण्याचे धाडस दाखवले.

‘माझं सौभाग्य’ या मृणाल यांच्या पहिल्याच मराठी चित्रपटासाठी त्यांना महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. ‘जोडीदार’मध्ये त्यांनी सर्वसामान्य पतिव्रता आणि व्यावसायिक डावपेच खेळत व्यवसायाचा मोठा पसारा सांभाळणारी आधुनिक मुलगी अशी दुहेरी भूमिका साकारली. या दुहेरी भूमिकेसाठी त्यांना ‘स्क्रीन’ आणि ‘फिल्मफेअर’ पुरस्कार मिळाले. ‘घराबाहेर’ या चित्रपटासाठी त्यांना उत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्रीचा महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला. अभिनयक्षेत्रातील कामगिरीबद्दल त्यांना ‘स्मिता पाटील पुरस्कार’ मिळाला आहे. गजेंद्र अहिरे दिग्दर्शित ‘बयो’ हा त्यांचा चित्रपट पॅनोरमासाठी निवडला गेला. मालिका, मॉडेलिंग, मराठी-हिंदी चित्रपट याबरोबरच त्यांनी काही प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय चित्रपटही केले आहेत. रूपसंपदा, बुद्धिचातुर्य व अभिनयनिपुणता असे एकत्रित वरदान मिळालेल्या मृणाल यांनी व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू जाणीवपूर्वक जोपासले. ‘अभिनयाहून वेगळा पर्याय माझ्यापुढे नव्हताच कधी, मी अभिनयाशिवाय दुसरं काहीच करू शकत नाही’, असे ऋषी कपूर यांचे म्हणणे मृणाल कुलकर्णी यांनी लहानपणी वाचले होते, तेव्हाच आपल्यापुढे एक नाही तर अनेक पर्याय असले पाहिजेत, असे त्यांनी ठरवून टाकले होते.

अध्यापक म्हणून काम करणे, संगीत शिकणे, नृत्यनिपुणता व अफाट वाचन करणे या सर्व गोष्टी त्या जागरूकतेचेच द्योतक आहेत. कला आणि व्यवहार यांचे व्याप सांभाळताना पुण्यातील ‘आपलं घर’ या अनाथगृहासाठीही त्या काम करत आहेत. ‘मेकअप उतरवल्यावर’ हे त्यांचे पुस्तकही प्रसिद्ध आहे. अलीकडेच त्यांनी दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करून ‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं’, ‌‘रमा माधव’ हे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत.

'फत्तेशिकस्त', 'फर्जंद', 'ये रे ये रे पैसा', 'ये रे ये रे पैसा २', 'स्माइल प्लीज', 'वेलकम होम', 'होम स्वीट होम' हे मृणाल कुलकर्णी यांचे अलीकडचे काही महत्त्वाचे चित्रपट.

- स्वाती प्रभुमिराशी
(मजकूर लेखन सौजन्य : विवेक मासिक, आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण, शिल्पकार चरित्रकोश)

मृणाल यांनी २०२२ मध्ये 'सरी', 'गोष्ट एका पैठणीची', 'शेर शिवराज', 'पावनखिंड', 'सहेला रे' या मराठी चित्रपटांत तसेच 'द कश्मीर फाइल्स' या हिंदी चित्रपटात अभिनय केला. तसेच 'सहेला रे' या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले.

- मंदार जोशी



चित्र-चरित्र