चित्र-चरित्र

डॉ. गिरीश ओक
डॉ. गिरीश ओक
अभिनेता
१७ ऑगस्ट १९६०

गिरीश ओक हे व्यवसायाने डॉक्टर आहेत. त्यांच्या कुटुंबाचा नाटकाशी तसूभरही संबंध नव्हता. ते स्वत:ही वयाच्या १७ वर्षांपर्यंत नाटकाच्या संपर्कात आले नव्हते. वैद्यकीय पदवी मिळविल्यानंतर त्यांनी नागपुरात रुग्णालय सुरू केले होते. यानंतर त्यांना वाटायला लागले की, हे आपले काम नाही. आपल्याला काहीतरी वेगळे करायचे आहे. यामुळे ते अभिनय करायला मुंबईत गेले. अथक परिश्रम घेऊन उत्कृष्ट नाट्य व चित्रपट अभिनेते म्हणून लौकिक प्राप्त केला. १९८४पासून त्यांच्या कलाकारकीर्दीस सुरुवात झाली. नाटक, चित्रपट आणि टीव्ही मालिका या तीनही माध्यमांमध्ये त्यांनी मुशाफिरी केली. प्रभाकर पणशीकरांनी 'तो मी नव्हेच' हे नाटक एका उंचीवर नेऊन ठेवले होते. डॉ. गिरीश ओक यांनी हे शिवधनुष्य पेलले. हे नाटक गिरीश ओक यांच्या आयुष्यात मैलाचा दगड ठरले आहे. तसेच ‘ती फुलराणी’मधील त्यांचे संस्मरणीय आहे. गिरिजा ओक या डॉ.गिरीश ओक यांच्या कन्या आहेत. ‘हलाहल’, ‘अनुराधा’, ‘वाट पाहते पुनवेची’, ‘शिवरायांची सून ताराराणी’, ‘देवकी’, ‘लक्ष्मी’, ‘सातच्या आत घरात’, ‘बळीराजाचे राज्य येऊ दे’, ‘हॅलो गंधे सर’, ‘तू ही रे’ हे त्यांचे उल्लेखनीय चित्रपट. ‘जुळून येती रेशीमगाठी’, ‘दामिनी’, ‘बंदिनी’, ‘परमवीर’, ‘दुहेरी’, ‘अवंतिका’, ‘अग्निहोत्र’, ‘पिंजरा’ या त्यांच्या गाजलेल्या टीव्ही मालिका. ‘यू टर्न’, ‘कुसुम मनोहर लेले’, ‘श्री तशी सौ’, ‘लव्ह बर्डस्’ या नाटकांमधील त्यांचा अभिनय गाजला.

'अगंबाई सूनबाई', 'अगंबाई सासूबाई' आणि 'दुहेरी' या ओक यांनी अलीकडच्या काळात केलेल्या टीव्ही मालिका आहेत.

-मंदार जोशी



चित्र-चरित्र