चित्र-चरित्र

डॉ. निलेश साबळे
डॉ. निलेश साबळे
अभिनेते, सूत्रसंचालक
३० जून १९८६

निलेश साबळे यांचे माध्यमिक शिक्षण महात्मा गांधी विद्यालय, दहिवडी येथे झाले. निलेश साबळे यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. त्याच्या घरातील कोणालाही अभिनयाची पार्श्वभूमी नाही, तरीही या क्षेत्रात जिद्दीनं उतरायचं आणि यशस्वी व्हायचं हा ध्यास कायम मनी त्यांनी बाळगला. "आधी शिक्षण आणि मग इतर' अशी कुटुंबियांची सक्त ताकीद असल्याने निलेश यांनी बीएएमएस (आयुर्वेद) ही डॉक्टनकीची पदवी चांगल्या गुणांनी मिळविली. वाशी येथे काही काळ नोकरी केली. गडहिंग्लज (कोल्हापूर) येथे वैद्यकीय शिक्षण घेत असताना एकपात्री प्रयोग केले. अभिनयाची खरी सुरवात बारावीत असताना "हसरी फसवणूक' या एकपात्रीपासून झाली. भोर येथील राजगड ग्रुपमधील सहकाऱ्यांसह प्रकाश मोरे, प्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते, महेश कोठारे, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव, राकेश सारंग यांचे मार्गदर्शन मिळाले. अवधूत गुप्ते, मिलिंद गुणाजी यांच्यासमवेत कार्यक्रम केले. "हास्यसम्राट'मध्ये पाहुणा कलाकार, ई-मराठीवरील "नान्याच्या गावाला जाऊ या' या मालिकेत काम केले. शिक्षण घेत असताना एकपात्री, मिमिक्रीच्या माध्यमातून स्वतःतील कलाकार कायम जिवंत ठेवला. ते स्वत: चांगले गातात, दिग्दर्शन करू शकतात, चित्रं काढतात. ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमामुळे ते घराघरात पोचले. "महाराष्ट्राचा सुपरस्टार', "फू बाई फू', "होम मिनिस्टर' या त्यांच्या इतर गाजलेल्या मराठी मालिका तसेच "दुभंग' या मराठी चित्रपटामध्येही त्यांनी काम केलं आहे.
-मंदार जोशीचित्र-चरित्र