चित्र-चरित्र

शंकर महादेवन
शंकर महादेवन
पार्श्वगायक, संगीतकार
३ मार्च १९६७

शंकर महादेवन यांचा जन्म मुंबईतील चेंबूरचा. केरळमधल्या तमिळ अय्यर कुटुंबात मुंबईत जन्मलेल्या महादेवन यांची मातृभाषा तमिळ असली तरी त्यांची कर्मभूमी बालपणापासूनच महाराष्ट्र राहिली. तमिळ, हिंदी, मराठी चित्रपटांसाठी त्यांनी संगीतदिग्दर्शन व गायन केले आहे. भारतीय

चित्रपटांसाठी संगीतदिग्दर्शन करणार्‍या शंकर-एहसान-लॉय या त्रिकुटापैकी ते एक सदस्य आहेत. महादेवन यांचे हिंदुस्तानी संगीतात प्रशिक्षण झाले आहे. त्यांनी ज्येष्ठ मराठी संगीतकार श्रीनिवास खळे यांच्याकडे संगीताचे धडे घेतले. पं. भीमसेन जोशी आणि लता मंगेशकर यांनी गायिलेल्या “राम का गुनगान गाईयेगा’ या देशभर गाजलेले गीत श्रीनिवास खळे यांनी एचएमव्हीसाठी संगीतबध्द केले. त्या वाद्यमेळ्यात वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी महादेवन यांनी सतारीची साथ केली होती. वीणा, सतार आणि अन्य वाद्यांच्या वादनाचे प्रशिक्षण, रियाज सुरू असताना, त्यांनी शिक्षणाकडे दुर्लक्ष केले नाही. मुंबई विद्यापीठातून कॉम्प्युटर इंजिनियरिंगची बी. ई. पदवी मिळवल्यावर ओरॅकल व्हर्शन ६ या कंपनीत त्यांनी सॉफ्टवेअर इंजिनियरिंगचीही नोकरी केली. इतर ख्यातनाम सॉफ्टवेअर कंपन्यातही त्यांनी काही काळ नोकरी केली.

‘ब्रेथलेस’ या हिंदी पॉप अल्बमद्वारे ते पहिल्यांदा प्रसिद्धीच्या झोतात आले. ‘अगं बाई अरेच्या’मधील ‘मन उधाण वार्‍याचे’ या गाण्याद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत त्यांनी आपला ठसा उमटवला. त्यानंतर त्यांनी बऱ्याच मराठी चित्रपटांसाठा पार्श्वगायन केले आहे. नोव्हेंबर २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कट्यार काळजात घुसली’ ह्या चित्रपटामधून शंकर महादेवन यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. या चित्रपटासाठी त्यांनी गायलेली ‘सूर निरागस हो’, ‘घेई छंद मकरंद’, ‘मनमंदिरा’ ही गाणी खूप गाजली. प्रांत आणि भाषेची बंधने संगीताच्या सुरेल स्वरावर ओलांडून हिंदी, मराठी, तेलगु, मल्याळम, कन्नड भाषिक रसिकांची लोकप्रियता मिळवणारे अशी संगीतकार आणि गायक शंकर महादेवन यांची ओळख आहे. संगीतकार ए. आर. रेहमान यांच्यासह देशातील ख्यातनाम संगीतकारांच्याकडे त्यांनी तमिळ, तेलगु, कन्नड, मराठी, हिंदी चित्रपटांसाठी गीते गायिली आहेत. जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेल्या आणि अजय-अतुल यांनी संगीतबध्द केलेल्या “मोरया मोरया’ या लोकप्रिय गीताचे गायक शंकर महादेवनच आहेत. १९९५ पासून चित्रपटात पार्श्वगायन करणाऱ्या महादेवन यांनी गायिलेल्या ‘कंडुकोदायन’ या तमिळ चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आणि त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. हिंदी, तेलगु, कन्नड चित्रपटांना त्यांनी संगीतही दिले आहे. ‘दिल चाहता है’, ‘कल हो ना है’, ‘बंटी और बबली’, ‘कभी अलविदा ना कहना’, ‘लक्ष्य’, ‘तारें जमीं पर’, ‘लक बाय चान्स’, ‘डॉन २’ हे त्यांचे काही उल्लेखनीय चित्रपट. ‘तारे जमीं पर’ चित्रपटामधील ‘मेरी मॉं’ या गाण्यासाठी त्यांना पार्श्वगायनाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.

२०२२ मध्ये शंकर महादेवन यांनी 'एकदा काय झालं' या चित्रपटासाठी पार्श्वगायन केलं.

-मंदार जोशी



चित्र-चरित्र