चित्र-चरित्र

सई ताम्हणकर
सई ताम्हणकर
अभिनेत्री
२५ जून १९८६

सई ताम्हणकरचा जन्म सांगलीचा. तेथील चिंतामणराव कॉलेज ऑफ कॉमर्स या महाविद्यालयामधून तिनं पदवी घेतली. महाविद्यालयात असताना तिचा कल हा खेळाकडे होता. राज्य पातळीवरील ती कबड्डीपटू होती. मात्र, महाविद्यालयीन सांस्कृतिक स्पर्धांमध्ये भाग घेऊन तिनं आपल्यातील अभिनेत्रीचे कलागुण दाखविले. काही ‘स्ट्रीट प्ले’मध्येही ती सहभागी झाली. ‘आधे अधुरे’ या नाटकामधील तिच्या कामाचं खूप कौतुक झालं. या नाटकानेच तिला ‘या गोजिरवाण्या घरात’ ही पहिली मालिका मिळवून दिली. तिथून सईनं मागं वळून पाहिलं नाही. विख्यात दिग्दर्शक सुभाष घईंच्या ‘ब्लॅक अॅंड व्हाईट’ चित्रपटाद्वारे तिनं २००८ मध्ये चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर ती आमिर खानच्या ‌‘गजनी’मध्येही छोट्या भूमिकेत झलकली होती. काही हिंदी चित्रपटानंतर तिच्या कामाची वाखाणणी झाली ती ‘सनई चौघडे’ या चित्रपटाद्वारे. या चित्रपटामधील मुख्य व्यक्तिरेखेने सईला बरेच मराठी चित्रपट मिळाले. ‘बालक पालक’, ‘दुनियादारी’, ‘वजनदार’, ‘पिकनिक’, ‘सौ. शशी देवधर’, ‘झपाटलेला २’, ‘मंगलाष्टक वन्स मोअर’, ‘पोरबाजार’, ‘पोस्टकार्ड’, ‘अनुमती’, ‘वायझेड’‘, ‘राक्षस’, ‘फॅमिली कट्टा’ हे तिचे काही उल्लेखनीय मराठी चित्रपट. ‘हंटर’ या हिंदी चित्रपटानेही तिला मोठी लोकप्रियता मिळवून दिली. ‘अग्निशीखा’, ‘साथी रे’, ‘कसौटी’ या मालिकांमध्येही ती झळकली. २०१७ मध्ये तिनं ‘सोलो’ हा मल्याळम चित्रपटही केला.
मंदार जोशीचित्र-चरित्र