चित्र-चरित्र

मकरंद अनासपुरे
मकरंद अनासपुरे
अभिनेता
२२ जुलै १९७३

मकरंद मधुकर अनासपुरे या हरहुन्नरी कलाकाराने वेगळी शैली, प्रसंगावधान, अंगभूत अभिनयगुण आणि विनोदाची समज या वैशिष्ट्यांच्या जोडीला खास मराठवाडी भाषेची आणि उच्चारांची जोड या भांडवलावर रुपेरी पडद्यावरचा यशस्वी प्रवास केला आहे. रुपेरी पडद्यावरच्या यशासाठी फक्त देखणा चेहरा चेहरा लागतो, हा समज खोटा ठरवत, चारचौघांसारखे सर्वसाधारण दिसणारे मकरंद आज मराठी चित्रपटातले आघाडीचे आणि लोकप्रिय कलाकार ठरले. मकरंद यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे रुपेरी पडद्यावर यश मिळाल्यावर बहुतेक जण रंगभूमीकडे पाठ फिरवतात, याला त्यांनी स्वत:च्या कर्तृत्वाने अपवाद निर्माण केला आहे. मराठी चित्रपटांमध्ये उदंड यश मिळवूनही मकरंद रंगभूमीवरही आणि छोट्या पडद्यावरही कार्यरत आहेत.

मकरंद मधुकर अनासपुरे यांचा जन्म औरंगाबाद येथे झाला. मकरंद यांचे वडील मधुकर आणि आई माधुरी हे दोघेही साधारण घरातले होते. घरात कलेचा वारसा फारसा नव्हता, पण मकरंद यांच्याकडे उपजतच कला होती. मकरंद यांचे सुरुवातीचे शिक्षण बीडला आणि नंतर औरंगाबादला झाले. ते विज्ञानाचे पदवीधर असून नाटकाच्या, अभिनयाच्या वेडामुळे त्यांनी मराठवाडा विद्यापीठातून नाट्यशास्त्राचीही पदवी मिळवली. महाविद्यालयीन जीवनापासूनच ते स्पर्धात्मक पातळ्यांवर चमकू लागले होते.

मकरंद यांना रंगभूमीवर पहिली संधी मिळाली तीच ‘सुयोग’निर्मित ‘झालं एकदाचं’ या अशोक सराफ आणि सुधीर जोशी यांच्या नाटकातून! (१९९४). मराठी चित्रपटातले लोकप्रिय नायक म्हणून गाजणार्‍या मकरंद यांचा पहिला चित्रपट मात्र हिंदी होता! ‘यशवंत’ हा त्यांचा पहिला चित्रपट! त्यानंतर पहिला मराठी चित्रपट त्यांना मिळाला तो ‘सरकारनामा’. या चित्रपटातूनच मकरंद यांच्या मराठवाडी बोलीचा ठसका रसिकांच्या परिचयाचा झाला आणि मग त्यांनी मागे वळून पाहिले नाही! मकरंद यांच्या अभिनयाचे वैशिष्ट्य असे की, त्यांना स्वत:ची बलस्थाने वेळेवर आणि अचूक गवसली आहेत. त्यामुळे ती वैशिष्ट्ये सातत्याने वापरून अधिक धारदार, तीक्ष्ण बनवताना ते दिसत आहेत. अभिनयाच्या व संवाद उच्चारण्याच्या खास लकबीमुळे मकरंद लोकप्रिय अभिनेता झाले आहेत. मकरंद यांनी गेल्या सुमारे वीस वर्षांत प्राधान्याने विनोदी चित्रपट केलेले दिसतात. ‘पिपाणी’, ‘नवसाचं पोर,’ ‘असंच पाहिजे’, ‘नवं नवं’, ‘नाथा पुरे आता’, ‘सावरखेड एक गाव’, ‘काय द्याचं बोला’, ‘जबरदस्त’, ‘शुभमंगल सावधान’, ‘दोघात तिसरा आता सगळं विसरा’, ‘बाप रे बाप डोक्याला ताप’, ‘सासू नंबरी जावई दस नंबरी’, ‘दे धक्का’, ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’, ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’, ‘जाऊ तिथे खाऊ’, ‘निशाणी डावा अंगठा’, ‘ऑक्सिजन’, ‘हापूस’ असे अनेक यशस्वी चित्रपट मकरंद यांच्या नावावर आहेत. त्यांनी अभिनित केलेल्या चित्रपटांची संख्या ८० हून अधिक आहे. अर्थात विनोदी भूमिकांचे आधिक्य असले तरी प्रत्येक व्यक्तिरेखेत मकरंद यांचा ‘खास स्पर्श’ दिसून येतो. मकरंद यांचे काम पाहताना ‘विनोदी भूमिका ही अत्यंत गंभीरपणे घ्यायची गोष्ट आहे’ या विधानाची प्रचिती येते. अभिनयाच्या जोडीने मकरंद निर्मितीच्या आणि दिग्दर्शनाच्या क्षेत्रातही उतरले आहेत. त्यांनी ‘गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा’ व ‘गोष्ट छोटी डोंगराएवढी’ (२००९) या चित्रपटांची निर्मिती केली आणि ‘डँबिस’ (२०११) हा चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केला, तसेच या चित्रपटाच्या निर्मितीतही त्यांचा सहभाग होता. या चित्रपटाला बोस्टन आंतरराष्ट्रीय महोत्सवात ‘स्पेशल इंडी स्पिरीट रेक्क्कनेशन’ पुरस्कार मिळाला.

मकरंद यांची ‘पाच लाख चार लाख’, ‘हुरहुर’, ‘बकरी’, ‘सगळे एकापेक्षा एक’, ‘जाऊ बाई जोरात’ आणि ‘केशवा माधवा’ ही नाटके खूप गाजली. छोट्या पडद्यावर ‘शकुन अपशकुन’, ‘बेधुंद मनाच्या लहरी’, ‘तो एक राजहंस’, ‘तिसरा डोळा’, ‘शेजार’, ‘आमच्यासारखे आम्हीच’, ‘गंगूबाई नॉन मॅट्रिक’, ‘जिभेला काही हाड’, ‘तू तू मैं मैं’ या मालिकांमधून, तसेच ‘टिकल ते पॉलिटिकल’, ‘हास्यसम्राट’, ‘हफ्ताबंद’ या रिऍलिटी शोमधून त्यांनी कामे केली.

मकरंद यांनी ‘यशवंत’, ‘निदान’, ‘वास्तव’, ‘वजूद’, ‘जिस देश मे गंगा रहता है’, ‘प्राण जाय पर शान न जाय’ असे हिंदी चित्रपट केले आहेत. तसेच ‘हिरेवाली मुटीया’ या भोजपुरी चित्रपटात काम केलेले आहे. मकरंद यांना ‘काय द्याचं बोला’साठी महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार, ‘बघ हात दाखवून’साठी संस्कृती कलादर्पण व महाराष्ट्र शासनाचा बेस्ट कॉमेडीअन, ‘डँबीस’साठी अत्रे पुरस्कार, पु.ल. देशपांडे तरुणाई पुरस्कार, तसेच पहिला युवा बालगंधर्व पुरस्कार, २०१०-२०१२ या सलग तीन वर्षात महाराष्ट्राचा फेवरेट हा पुरस्कार, मराठवाडाभूषण असे, अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

मकरंद यांनी अलीकडच्या काळात ‘मला एक चान्स हवा’, ‘तिचा बाप त्याचा बाप’, ‘दोन घडीचा डाव’, ‘डावपेच’, ‘अगडबम’, ‘मन्या सज्जना’, ‘रंगा पतंगा’, ‌‘शासन’, ‘पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा’, ‘अनवट’, ‘कापूस कोंड्याची गोष्ट’ हे चित्रपट दिले आहेत. अभिनयाव्यतिरिक्त अनासपुरे यांनी अलीकडच्या काळात ‘नाम’ संस्थेसाठी केलेले काम ठळक म्हणता येतील. विदर्भ, मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आधार देण्यासाठी ही संस्था कार्यरत आहे.

- जयश्री बोकील

'थॅंक यू विठ्ठला', 'झेला', 'पाणीबाणी' हे मकरंद अनासपुरे यांनी अभिनय केलेले अलीकडचे काही चित्रपट. रानबाजार या वेब मालिकेमधील अनासपुरे ह्यानी साकारलेली भूमिका लोकप्रिय ठरली.

- मंदार जोशीचित्र-चरित्र