चित्रपट, रंगभूमी आणि छोट्या पडद्यावर चरित्र कलाकारांमध्ये प्रदीर्घ काम करणारे एक महत्त्वाचे नाव म्हणजे सविता मालपेकर. १९८८ मधील ‘आई पाहिजे’ चित्रपटाद्वारे मालपेकर यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. तेव्हापासून गेली तीन दशके त्या चरित्र भूमिकांद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करीत आहेत. ‘हाहाकार’, ‘पैंजण’, ‘नटसम्राट’, ‘स्वामी पब्लिक लिमिटेड’, ‘शिकारी’, ‘अबक’, ‘काकस्पर्श’, ‘कोकणस्थ’ हे त्यांचे उल्लेखनीय चित्रपट. आगामी ‘मी शिवाजी पार्क’ या चित्रपटातही त्यांचा अभिनय प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ‘गाढवाचं लग्न’ या नाटकामधील त्यांचा अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. ‘तेहजीब’, ‘हथियार’ या हिंदी चित्रपटांमध्येही त्या झळकल्या होत्या.
-मंदार जोशी