चित्र-चरित्र

स्मिता तळवलकर
स्मिता तळवलकर
अभिनेत्री, दिग्दर्शिका, निर्माती
५ सप्टेंबर १९५५ --- ६ ऑगस्ट २०१४

सह्याद्री वाहिनीवर वृत्तनिवेदिका म्हणून एकेकाळी बातमी सांगणार्‍या स्मिता अविनाश तळवलकर काही वर्षांनी ‘अस्मिता चित्र’ या निर्मिती संस्थेद्वारे वेगळ्या प्रवाहातील चित्रपटांची निर्मिती व दिग्दर्शन करण्यात यशस्वी ठरल्या. हा प्रवास केवढा तरी मोठा व वळणावळणाचा. स्मिता तळवलकर यांचे मूळचे नाव स्मिता सदाशिव गोविलकर. पुण्याच्या हुजूरपागा शाळेत त्या शिकल्या. त्यांनी शालेय वयातच नाटकातून भूमिका करायला सुरुवात केली. त्या वेळी त्या ‘उदय कलाकेंद्र’, ‘कुमार कलाकेंद्र’, ‘राज्य नाट्यस्पर्धां’मधून काम करत असत.
रुईया महाविद्यालयामधून तत्त्वज्ञान व मानसशास्त्र घेऊन त्यांनी बी.ए. केले, तर सोफिया महाविद्यालयामध्ये मास कम्युनिकेशनचा व पत्रकारितेचा अभ्यासक्रम पूर्ण केला. अशी भक्कम शैक्षणिक पार्श्‍वभूमी असणार्‍या स्मिता यांची संपूर्ण कारकिर्दीतील पावले विचारपूर्वक व अचूक पडली त्यात आश्‍चर्य नाही. पण योग्य वळणावर अचूक निर्णय घेण्याची त्यांची क्षमताही महत्त्वाची होती. १९७३ साली, म्हणजे वयाच्या अठराव्या वर्षीच स्मिता यांनी अविनाश विष्णू तळवलकर यांच्याशी लग्न केले व त्यानंतर चौफेर वाटचाल सुरू केली. मॉडेलिंग, वृत्तनिवेदिका, नाट्य कलाकार, चित्रपट अभिनेत्री, निर्माती, दिग्दर्शिका, लेखिका, वितरक अशा कितीतरी भूमिकांत त्यांनी स्वत:ला गुरङ्गटून टाकले. ‘छावा’ (१९८३) या नाटकाद्वारे त्या व्यावसायिक नाटकात आल्या. त्यानंतर त्यांनी ‘तू फक्त हो म्हण’, ‘अभिनय’, ‘उंच माझा झोका गं’ अशा बर्‍याच नाटकांतून भूमिका साकारल्या. सन १९८६ साली दिग्दर्शक मुरलीधर कापडी यांनी ‘तू सौभाग्यवती हो’ या चित्रपटाद्वारे त्यांना चित्रपटात आणले. ‘धाकटी सून’, ‘गडबड घोटाळा’, ‘खट्याळ सासू नाठाळ सून’ इत्यादी मराठी चित्रपटांतून भूमिका साकारताना त्यांनी कात टाकली. आपल्या यशस्वी कारकिर्दीचा विस्तार करताना त्यांनी १९८९ मध्ये ‘अस्मिता चित्र’ ही निर्मिती संस्था सुरू केली आणि अगदी वेगळ्या प्रकारच्या चित्रपटांच्या निर्मितीत पावले टाकली. ‘कळत नकळत’ हा त्यांचा पहिला चित्रपट त्यांना नवी ओळख देणारा ठरला. अस्मिता चित्र व स्मिता तळवलकर काही बौद्धिक खाद्य घेऊनच येणार याची विश्‍वासनीयता कायम वाढीला लागली, हे विशेष. ‘चौकट राजा’, ‘सवत माझी लाडकी’, ‘तू तिथं मी’, ‘सातच्या आत घरात’, ‘आनंदाचं झाड’ असे चित्रपट निर्माण करताना स्मिता तळवलकर यांनी मराठी चित्रपटसृष्टीत स्वत:चे वेगळे स्थानही निर्माण केले. त्यांनी ‘सवत माझी लाडकी’ या फॅण्टसी चित्रपटाचे दिग्दर्शनही केले. ‘कळत नकळत’ला चार राष्ट्रीय व नऊ राज्य पुरस्कार लाभल्याने स्मिता तळवलकर या नावाभोवतीचे वलय वाढले. त्यांच्या प्रत्येक चित्रपटाने मानाचे पुरस्कार पटकावले आहेत. विशेष म्हणजे स्मिता यांच्या वृत्तपत्रीय लेखनाचे ‘पिंपळपान’ (लोकसत्ता) व ‘जगावेगळी’ (तरुण भारत) असे दोन संग्रहदेखील पुस्तकरूपात प्रसिद्ध झाले आहेत.
- दिलीप ठाकूर



चित्र-चरित्र