चित्र-चरित्र

भारती आचरेकर
भारती आचरेकर
अभिनेत्री
१३ फेब्रुवारी

मा.भारती आचरेकर या मा.मणिक वर्मा यांच्या जेष्ठ कन्या. त्यांचे पूर्ण नाव सौ.भारती विजय आचरेकर. मा.भारती आचरेकर यांचे लहानपण पुण्यात गेले. मा.भारती आचरेकर यांना भावना प्रधान भूमिका करून प्रेक्षकांना रडवण्यापेक्षा दणदणीत संघर्षमय आणि विनोदी भूमिका करायला आवडते. मा.मणिक वर्मा यांना त्यांनी अनेक कार्यक्रमांतून साथ केली. वयाच्या १० व्या वर्षी जेव्हा हातात तंबोरा धरताही येत नव्हता, तेव्हा पुण्यात तुळशीबागेत मा.मणिक वर्मा यांच्या बरोबर पहिला कार्यक्रम केला. गाण्याचं बाळकडू घरातूनच मिळाले होते, मा.मणिक वर्माच्या मागे बसून तिला साथ करणं, हा अनुभव त्यांना खूप काही शिकवून गेला. तिच्यामुळे त्यांना गाण्यातला आत्मविश्वास मिळाला. त्यांनी मा.वसंतराव कुलकर्णी यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे धडे घेतले. त्यानंतर एस.एन.डी.टी. महाविद्यालयातून संगीत हा विषय घेऊन एम.ए. केलं. अर्थात जवळजवळ २०-२२ वर्ष त्यांनी मा.मणिक वर्मा यांच्या बरोबर अनेक ठिकाणी जाऊन कार्यक्रम केले. मा.भारती आचरेकर यांनी पूर्णवेळ गाणं करावं, असं अनेकांचं म्हणणं होतं.

एकदा प्रसिद्ध नाटककार मो. ग. रांगणेकर यांनी त्यांचे गाणं ऐकलं आणि 'दि हिंदू गोवा असोसिएशन'च्या 'धन्य ती गायनी कळा' या नाटकासाठी विचारलं. या नाटकाला पं. भीमसेन जोशी यांचं संगीत होतं, तर नाटकात कृष्णराव चोणकर, रामदास कामत, श्रीपाद नेवरेकर अशी संगीतातली बडीबडी मंडळी काम करत होती. ते मा. भारती आचरेकर यांचे पहिले नाटक.

'धन्य ते गायनी कळा'नंतर लगेच त्याच संस्थेचं 'तुझा तू वाढवी राजा' केलं. त्याच वेळी त्यांचे लग्न आचरेकरांशी ठरलं होतं. त्या भारती वर्माची भारती आचरेकर झाल्या. १९७२ ला दूरदर्शन केंद सुरू झालं आणि त्या अगदी पहिल्या दिवसापासून त्या तिथे रुजू झाल्या. त्या वेळचे दूरदर्शनचे संचालक चांगले होते. त्यांनी संगीत-नाटक अशा कलांमध्ये असलेली रुची बघून ते मा. भारती आचरेकर यांच्यावर त्याच प्रकारचं निमिर्तीचं काम सोपले. श्री.अरुण जोगळेकरांबरोबर मा.भारती आचरेकरांनी ‘गजरा’ कार्यक्रम सादर केला होता. आजही ‘गजरा’ मराठी मध्यमवर्गाच्या चांगलाच स्मरणात आहे. तब्बल आठ वर्षं त्या दूरदर्शन वर नोकरी करत होत्या. त्या मुळे गाणं आणि नाटक तसं बाजूलाच पडलं होतं. नाटक पूर्ण थांबलं होतं. आणि पुन्हा एकदा केवळ संगीतामुळेच त्यांना आणखी एका नाटकाची ऑफर आली. ते नाटक होतं, विजया मेहता दिग्दशित 'हमीदाबाईची कोठी.' आणि या नाटकासाठी दूरदर्शन वरील नोकरी सोडून, त्यांनी हे नाटक केले. 'हमीदाबाईची कोठी'च्या निमित्ताने त्या पुन्हा एकदा रंगभूमीवर आल्या. या नाटकाने रंगभूमीवर इतिहास घडविला. त्यानंतर एकातून एक याप्रकारे 'महासागर', 'दुभंग', 'नस्तं झेंगट' अशी नाटकं त्यांनी केली. रंगभूमीवर अशी घोडदौड सुरू असतानाच त्यांचे पती डॉ. विजय आचरेकर यांचे निधन झालं आणि मग चरितार्थासाठी म्हणून नाटकात काम करणं हेच त्यांनी ठरवले. त्या हिंदी मालिका, सिनेमा करत गेल्या. त्या मा.विजया मेहता यांच्याकडे खूप शिकल्या. त्यांनी अंजन श्रीवास्तव यांच्याबरोबर ‘वागले की दुनिया’मध्ये काम केलं होतं. चाळीमध्ये राहणारं, सर्वसामान्य मध्यमवर्गीय जोडपं त्यांनी छोटय़ा पडद्यावर साकारलं होतं. गंभीर असो वा विनोदी, सर्वच प्रकारच्या भूमिका त्या लिलया साकारतात. ‘चिडियाघर’ ही विचित्र व हास्यापद व्यक्तिमत्वांच्या कुटुंबाची एक मालिका यात मा.भारती आचरेकर यांनी अप्रतिम काम केले आहे.

एक गृहिणी, कलावंत, अशी मा.भारती आचरेकर यांची ओळख आहे. खरं तर भारतीताईंच्या घरात परंपरागत कला नांदत आहे. त्यांच्या आई मा.माणिक वर्मा, गेल्या पिढीतील संगीत क्षेत्रातील मापदंड होत्या. कलावंतांचं घर म्हटलं की, बराचसा लहरीपणा असतो. मात्र मा.भारती आचरेकरांमध्ये तो गुण आढळत नाही. त्यांचं सारं जीवन कसं नियोजनबद्ध आखीव, रेखीव. त्यामुळेच त्या सदैव नाटक-मालिका-चित्रपट-जाहिरातींतून वारंवार दिसत नाहीत. मा.भारती आचरेकर यांचा जेव्हा आपण कलावंत म्हणून विचार करतो, त्यावेळी त्यांच्या अप्रतिम अभिनयाचं सक्षम दर्शन घडतं. सारं काही सहजच.

*संजीव वेलणकर पुणे.*
९४२२३०१७३३चित्र-चरित्र