चित्र-चरित्र

नितीश भारद्वाज
नितीश भारद्वाज
अभिनेते-दिग्दर्शक
२ जून १९६३

मराठी चित्रपट-हिंदी चित्रपट आणि हिंदी मालिकांवर आपला ठसा उमटविण्यात यशस्वी झालेले व्यक्तिमत्त्व म्हणजे नितीश भारद्वाज. परळच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयामधून पदवीधर झालेल्या नितीश भारद्वाज यांनी कलेची वाट पत्करली. ‘पसंत आहे मुलगी’, ‘अनपेक्षित’, ‌‘खट्याळ सासू नाठाळ सून’, ‘तुझी माझी जमली जोडी’ हे त्यांचे यशस्वी चित्रपट. ‘नाचे नागीन गली गली’, ‘संगीत’, ‘मोहेंजोदारो’ हे त्यांचे हिंदी चित्रपट. मात्र ‘महाभारत’ मालिकेतील भगवान श्रीकृष्णांच्या भूमिकाद्वारे भारद्वाज यांना अमाप लोकप्रियता मिळाली. त्यानंतर ‘गीतारहस्य’, ‘अपराधी’ या मालिकांचे त्यांनी दिग्दर्शन केले. ‘ई टीव्ही मराठी’ वाहिनीवरील ‘जल्लोष सुवर्णयुगाचा’ या कार्यक्रमासाठी भारद्वाज यांनी रमेश देव आणि सुधा चंद्रन यांच्याबरोबर परीक्षक म्हणून काम केले. मध्यंतरीच्या काळात ते काही काळ भाजपचे खासदारही होते. १९९६ मध्ये ते जमशेदपूर येथून लोकसभेची निवडणूक जिंकले होते. ‘पितृऋण’ हा त्यांनी दिग्दर्शित केलेला पहिला मराठी चित्रपट.
मंदार जोशीचित्र-चरित्र