चित्र-चरित्र

वर्षा उसगावकर
वर्षा उसगावकर
अभिनेत्री
२८ फेब्रुवारी १९६९

वर्षा उसगावकर यांचा जन्म गोव्याच्या फोंडा तालुक्यातल्या उसगाव येथे झाला. कोकणी मातृभाषा असलेल्या या मुलीने अभिनेत्री व्हायचे असे लहानपणीच ठरवले होते. त्यांचे वडील अच्युत काशीराम उसगावकर गोवा मुक्ती संग्रामात सहभागी झाले होते. १९६२ साली गोवा मुक्त झाल्यावर ते कॅबिनेट मंत्री झाले. वर्षा यांची आई माणिक उसगावकर या एम.ए. केल्यानंतर ११ वर्षे शास्त्रीय संगीत शिकल्या. त्यामुळे आपसूकच वर्षा उसगावकर यांनीही पाचवीत असल्यापासूनच पं. सुधाकर करंदीकर यांच्याकडे जयपूर घराण्याचे शास्त्रीय संगीताचे धडे घेतले आहेत. शाळा, महाविद्यालयामध्ये शिकत असतानाच वर्षा उसगावकर नाटकात काम करत होत्या. ‘तियात्र’ या ख्रिस्तीधर्मीयांच्या रंगभूमीवरही त्यांनी केलेले कामही वैशिष्ट्यपूर्ण होते.

वर्षा उसगावकर यांनी गोव्यातूनच बी.कॉम.पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. याच काळात गोव्यातील ‘कलाशुक्लेंदु’ या नाट्यसंस्थेच्या ‘महापूर’ या नाटकात केलेल्या भूमिकेला आंतरराज्य नाट्यस्पर्धेत सुवर्णपदक मिळाले. राजकारणाचा वारसा असूनही वर्षामधील अभिनयाच्या गुणाला त्यांच्या आई-वडिलांनी आस्थेने प्रोत्साहन दिले. त्यामुळेच वर्षा उसगावकर यांनी औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातल्या नाट्यशास्त्र विभागातून अभिनयाचे प्रशिक्षण घेतले. अभिनय करण्याच्या ध्यासामुळे त्या मुंबईला आल्या. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात दिग्दर्शक दामू केंकरे यांच्या ‘कार्टी प्रेमात पडली’ या नाटकाद्वारे त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवर काम करण्यास सुरुवात केली. नंतर दामू केंकरे यांच्या प्रयत्नांमुळेच ‘तुझ्यावाचून करमेना’ या चित्रपटात वर्षा उसगावकर यांना छोटी भूमिका मिळाली.

प्रकाश बुद्धिसागर यांच्या ‘ब्रह्मचारी’ नाटकातील बोल्ड वेशभूषेमुळे अभिनेते दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांनी ‘गंमत जंमत’ (१९८७) चित्रपटातल्या भूमिकेसाठी उसगावकर यांना निवडले. हा चित्रपट अत्यंत यशस्वी ठरला. पुढे ‘पैज लग्नाची’ या चित्रपटातही त्यांनी काम केले. या दोन्ही चित्रपटातल्या भूमिकेसाठी त्यांना शासनाचे उत्कृष्ट अभिनयासाठीचे पारितोषिक मिळाले. ‘यज्ञ’, ‘पैंजण’, ‘सवत माझी लाडकी’, ‘खट्याळ सासू नाठाळ सून’, ‘सगळीकडे बोंबाबोंब’, ‘मज्जाच मज्जा’, ‘रेशीम गाठी’, ‘आत्मविश्‍वास’, ‘हमाल दे धमाल’, ‘अफलातून’, ‘पसंत आहे मुलगी’, ‘भुताचा भाऊ’, ‘एक होता विदूषक’, ‘शुभमंगल सावधान’, ‘अबोली’, ‘जमलं हो जमलं’, ‘सवाल माझ्या प्रेमाचा’, ‘तुमच्याचसाठी’ अशा जवळपास ४५ पेक्षा जास्त चित्रपटांतून त्यांनी भूमिका साकारल्या.

मराठीबरोबरच वर्षा उसगावकर यांनी बंगाली, तेलगू, कोकणी चित्रपटांतूनही अभिनय केला. तसेच ‘दूध का कर्ज’, ‘हनिमून’, ‘तिरंगा’, ‘घरजमाई’, ‘सोने की जंजीर’, ‘साथी’, ‘खलनायिका’, ‘शोहरत’, ‘घर आया मेरा परदेसी’ अशा हिंदी चित्रपटांतल्या त्यांच्या भूमिका लक्षणीय ठरल्या. या व्यतिरिक्त वर्षा उसगावकर यांनी महालक्ष्मी लॉटरी, लिंटास, अमूल बटर, सर्फ, लक्स, निरमा यांसारख्या अनेक जाहिरातींतही काम केलेले आहे. त्यांनी हिंदी नाटकांबरोबर ‘महाभारत’, ‘झॉंसी की रानी’ यासारख्या हिंदी मालिकांतून अभिनय केला. ‘इतिहास के गवाह’, ‘कभी इधर कभी उधर’, ‘अलविदा डार्लिंग’, ‘चंद्रकांता’, ‘अर्धांगिनी’ ‘कभी कभी’ या मालिकांमध्येही त्यांनी काम केलेले आहे. याचबरोबरीने वर्षा उसगावकर यांनी लंडनच्या चॅनेल फोरसाठी ‘प्लेफुल म्युज’ या कार्यक्रमात काम केले. त्याच वेळेस दिग्दर्शक अजय शर्मा यांच्याशी त्यांची ओळख झाली व त्यांच्यासोबतच त्या विवाहबद्ध झाल्या.

१९९४ पासून त्यांनी स्टेज शो करायला सुरुवात केली. तसेच ‘वर्षा उसगावकर नाईट’ या वाद्यवृदांमध्येही त्या गातात. त्यांनी महेश कोठारे यांच्या ‘धांगडधिंगा’ या चित्रपटासाठी पार्श्‍वगायन केलेले आहे. तसेच गोव्याच्या उल्हास बुयॉंव यांच्या ‘रूप तुझें लायता पिशे’ या कोकणी अल्बमसाठी त्या गाणी गायल्या. वर्षा उसगावकर यांनी केवळ चार मराठी नाटकांमध्ये काम केलेले आहे. त्यातील ‘ब्रह्मचारी’ नाटकाचे जवळजवळ दोनशे प्रयोग केले आहेत. ‘डबल गेम’ नाटकाचे शंभर प्रयोग झालेले आहेत.

संगीताचा अभ्यास, आवड असल्याने वर्षा उसगावकर यांनी स्वत:चे ‘रिक्षावाला’ आणि ‘आमची बालवाडी’ हे दोन अल्बम तयार केले. ‘म्युझिक मस्ती गप्पा गाणी’ या सांगीतिक कार्यक्रमाचे संचालनही त्यांनी केले. अनेक मालिकांत, चित्रपटांत त्या आजही व्यग्र आहेत. ‘हुतूतू’, ‘सुपर नानी’ हे त्यांचे अलीकडचे काही हिंदी चित्रपट.

'सुख म्हणजे नक्की काय असतं' ह्या २०२१ मधील टीव्ही मालिकेतील वर्षा उसगावकर ह्यांची भूमिका गाजली. २०२२ मध्ये वर्षा उसगावकर यांनी 'शेर शिवराज' तसेच 'सारखं काहीतरी होतंय' या नाटकात काम केलं.

-मंदार जोशीचित्र-चरित्र