चित्र-चरित्र

विजय चव्हाण
विजय चव्हाण
अभिनेता
८ फेब्रुवारी --- २४ ऑगस्ट २०१८

मराठी सिनेमासृष्टीमध्ये चार दशकांहून अधिक काळ विविधरंगी भूमिका करून रसिकांना खदखदून हसायला लावणारा एक चतुरस्त्र नट म्हणजे विजय चव्हाण. महाराष्ट्राच्या भूमीत जन्मलेलं हे व्यक्तिमत्त्व मराठी सिनेमासृष्टीत येण्यापूर्वी रंगभूमीवर विविध नाटकांमधून रसिकांना मंत्रमुग्ध करीत होतं. मराठी आणि हिंदी रंगभूमी, छोटा पडदा किंवा रुपेरी पडदा गाजवणाऱ्या या कलाकारानं प्रत्येक भूमिका करताना त्या भूमिकेला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न केला. अनेक नामवंत कलाकारांसोबत काम करताना सहाय्य्क कलाकार म्हणून स्वतःच्या भूमिकेची वेगळीच छाप पडणारा हा कलाकार. 'तू सुखकर्ता ', 'झिलग्यांची खोली ', सगळे सभ्य पुरुष ', 'सासरेबुवा जरा जपून ', ' भागम भाग ' यांसारख्या अनेक नाटकांमधून रसिकांना आपल्या अभिनयाचा दर्शन घडवीत राहिला. पण या अभिनेत्यानं 'मोरूची मावशी ' या नाटकात साकारलेला अभिनय आपणा साऱ्यांच्या चांगलाच लक्षात राहिला. उंच बांध्याचा, रांगडा व्यक्तिमत्व असणारा आणि विनोदाची अचूक जाण असलेला हा कलाकार जेंव्हा साडी नेसून मावशीची भूमिका साकारतो तेव्हा तितकाच नाजूक वाटतो. या नाटकाचे अनेक प्रयोग झाले आणि बऱ्याच प्रयोगांना हाऊसफुलचे बोर्डही लागले. पण तेव्हा हा रंगभूमीपुरता हा नट मर्यादित नव्हता. त्याला त्याच्या अभिनयाचे कौशल्य चित्रपसृष्टीतही दाखवायच होत. आणि अखेर त्यांना पहिला चित्रपट मिळाला तो १९८५ साली 'वहिनीची माया'. यात रवींद्र बेर्डे आणि रमेश भाटकारांसोबत विजय चव्हाण हा नवीन कलाकार आपल्याला अभिनय करताना पाहायला मिळाला. पण त्यानंतर मात्र त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. 'घोळात घोळ ', 'धुमाकूळ ', 'बलिदान ', 'शेम टू शेम', 'माहेरची साडी' यासारख्या विविध सिनेमांमधून आपल्याला विजय चव्हाण विविध भूमिका साकारताना पाहायला मिळाले. पण त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली ती महेश कोठारेंच्या काही सिनेमांमुळे 'शुभमंगल सावधान ' या सिनेमा मध्ये महेश कोठारेंनी पहिल्यांदा विजय चव्हाण यांच कास्टिंग केलं. अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे चित्रपट सृष्टीमध्ये विनोद अभिनेता म्हणून प्रसिद्ध असतानाच सहाय्यक नटही तितकाच प्रभावी विनोद करू शकतो हे विजय चव्हाण यांच्या अभिनयाने दाखवून दिलं. महेश कोठारेंच्या प्रत्येक सिनेमांचा भाग बनले ते विजय चव्हाण 'झपाटलेला ', 'माझा छकुला ', 'चिमणी पाखरं', 'पछाडलेला ', २००६ सालचा 'शुभमंगल सावधान ', ' जबरदस्त ', ' दुभंग ' या महेश कोठारेंच्या प्रत्येक सिनेमांमध्ये विजय चव्हाण हे अभिनय करताना दिसले. 'या गोल गोल डब्यातला ', 'हलाल ', 'वन रूम किचन ' यांसारख्या सिनेमांमध्ये विजय चव्हाणांनी केलेली भूमिका रसिकांच्या चांगलीच लक्षात राहते.

-मंदार जोशीचित्र-चरित्र