चित्र-चरित्र

मधुकर तोरडमल
मधुकर तोरडमल
लेखक-अभिनेते-निर्माते-दिग्दर्शक
२४ जुलै १९३२ --- २ जुलै २०१७

मराठी रंगभूमी आणि चित्रपट माध्यमांमध्ये लेखन, अभिनय, दिग्दर्शन आणि अनुवाद या चार आघाड्यांवर उत्तम काम केलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे प्रा. मधुकर तोरडमल. अनेक विद्यार्थी आणि कलावंतांना त्यांनी घडविले. १९७१ पासून ते रंगभूमीवर कार्यरत होते. मनोरंजन क्षेत्रामध्ये त्यांना ‘मामा’ म्हणून ओळखले जायचे. १० वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर तोरडमल यांचे काका त्यांना एका शाळेत घेऊन गेले. तिथे त्यांना अभिनयाची गोडी लागली. अहमदनगर येथे काही काळ प्राध्यापक म्हणून काम केल्यानंतर ते पुन्हा कला क्षेत्राकडे परतले. ‘रसिकरंजन’ नावाची नाट्यसंस्था स्थापन करून त्यांनी अनेक नाटके सादर केली. प्रा. मधुकर तोरडमल यांचे सर्वाधिक लोकप्रिय नाटक म्हणजे ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’. लेखन, दिग्दर्शन, निर्मिती आणि भूमिका असे हे बहुपदरी नाटक खूप गाजले. त्यातील इरसाल प्राध्यापक बारटक्के मधुकररावांनी भन्नाट रंगवला. त्याचे पाच हजारांवर प्रयोग झाले. ‘अखेरचा सवाल’, ‘बेईमान’, ‘मत्स्यगंधा’, ‘घरात फुलला पारिजात’ ही त्यांची अन्य गाजलेली नाटके. प्रा. तोरडमल यांनी मोजकेच चित्रपट केले. परंतु, त्यामधील त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या. ‘आत्मविश्वास’, ‘आपली माणसे’, ‘बाळा गाऊ कशी अंगाई’, ‘राख’, ‘सिंहासन’ हे त्यांचे उल्लेखनीय चित्रपट.
-मंदार जोशी



चित्र-चरित्र