चित्र-चरित्र

गिरीश कर्नाड
गिरीश कर्नाड
अभिनेता-दिग्दर्शक
१९ मे १९३८ --- १० जून २०१९

गिरीश कर्नाड म्हटलं की 'तुघलक' आणि 'हयवदन' ही दोन प्रमुख नाटके चटकन डोळ्यासमोर येतात. कारण ती बहुसंख्य भारतीय भाषांत भाषांतरीत झाली आहेत. पण या व्यतिरिक्तही त्यांची अनेक नाटके गाजली. शिवाय केवळ नाटक हेच त्यांचं कार्यक्षेत्र आहे, असंही नाही, आपलं बहुतांश लेखन कन्नडमध्ये करणाऱ्या या ज्येष्ठ नाट्यकर्मीची मातृभाषा मात्र कन्नड नव्हती. मातृभाषा होती कोकणी. त्यांचे प्राथमिक शिक्षण झालं मराठीत. कर्नाड कुटुंबिय कोकणी असलं तरी त्यांचा जन्म मुंबई जवळच्या माथेरानचा. पुढे हे कुटुंब कर्नाटकात स्थलांतरीत झालं आणि त्यांनी कन्नड भाषा आपलीशी केली. गिरीश कर्नाड यांचे शालेय शिक्षण पुण्यात झाले. गणित आणि संख्याशास्त्र हे विषय घेऊन कर्नाड प्रथम श्रेणीत बी.ए. उत्तीर्ण झाले. त्यावेळेस बालगंधर्व, किर्लोस्कर नाटक कंपन्यांच्या नाटकांचे त्यांच्यावर संस्कार झाले. त्यांचे उच्च शिक्षण लिंकन कॉलेज, ऑक्सफर्ड येथे झाले. कर्नाड हे शिकागो विद्यापीठाचे हंगामी प्राध्यापक आणि फुलब्राइट विद्वान होते. त्यांनी नाट्यक्षेत्रात स्वतःला झोकून दिले. त्यांच्या नाटकांनी भारतात व परदेशांत बरेच नाव कमावले. गिरीश कर्नाड यांचे चित्रपट दिग्दर्शक म्हणून पदार्पण ‘वंशवृक्ष’ या चित्रपटाद्वारे झाले. हा चित्रपट एस्‌. एल्‌. भैरप्पा यांच्या कन्नड कादंबरीवर आधारित होता. या चित्रपटाला अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले. कर्नाड यांनी संस्कार या प्रायोगिक चित्रपटातही काम केले होते. नंतर कर्नाड यांनी बऱ्याच कन्नड आणि हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शन केले. त्यांचे तब्बलियू नीनादे मगने व ओंदनोंदू कालादल्ली हे काही प्रसिद्ध कन्नड चित्रपट, आणि उत्सव आणि गोधुली हे हिंदी चित्रपट आहेत. गिरीश कर्नाड यांचा कानुरू हेग्गदिती हा, कुवेंपू यांच्या कादंबरीवर आधारित कन्नड चित्रपटही नावाजला गेला आहे. कर्नाड यांची १९६१ नंतर ययाती, तुघलक अग्नी और बरखा, नागमंडळ, अंजू मल्लिगे अशी अनेक नाटके गाजली. ‘संस्कार’ या कन्नड चित्रपटापासून त्यांच्या चित्रपट कारकिर्दीस सुरुवात झाली. कर्नाड यांनी दिग्दर्शित केलेला ‘उत्सव’ आजही रसिकांच्या मनात घर करून आहे. हिंदी, मल्याळम, तेलुगू, तमिळ, मराठी अशा ७० हून अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केल्या. १९८२ मध्ये जब्बार पटेल दिग्दर्शित ‘उंबरठा’ चित्रपटामध्ये अभिनेत्री स्मिता पाटील यांच्या पतीची त्यांनी केलेली भूमिका प्रेक्षकांच्या स्मरणात राहिली. गिरीश कर्नाड यांनी आपल्या नाटकात पौराणिक, ऐतिहासिक व्यक्तिरेखांच्या माध्यमातून आधुनिक आशय व्यक्त केला. सोशिकता ही नाटकांतील स्त्री व्यक्तिरेखांची परंपरा त्यांनी मोडली. त्यांच्या नाटकांतील स्त्री व्यक्तिरेखा डिमांडिंग आहेत. कर्नाड यांनी आपल्या नाटकात केलेली पारंपरिक मांडणी, आशय यांची पुनर्मांडणी अद्भुत आहे. कन्नड आणि इंग्रजी भाषेत लिखाण केले असूनही त्यांनी नेहमी स्वत:ला मराठी संस्कृतीशी जोडून ठेवले होते. गिरीश कर्नाड यांनी ’आडाडता आयुष्य’ (खेळता खेळता आयुष्य) या नावाने कानडी भाषेत आत्मचरित्र लिहिले. त्याचे उमा कुलकर्णी यांनी, ’घडले कसे’ या नावाने मराठीत भाषांतर केले आहे. त्यातले कथानक आई-वडिलांचा वादग्रस्त विवाह, या घटनेपासून सुरू होऊन स्वत:च्या लग्नापाशी थांबते. गिरीश कर्नाड यांना भारत सरकारने पद्मभूषण, पद्मश्री व ज्ञानपीठ पुरस्कार देऊन गौरव केला आहे. गिरीश कर्नाड यांनी १९७४-७५ मध्ये पुण्यातील भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्थेचे संचालकपद भूषिवले होते. गिरीश कर्नाड हे १९७६-७८ मध्ये कर्नाटक साहित्य अकादमीचे अध्यक्ष होते आणि १९८८-९३ मध्ये नाटक अकादमीचे सभापती होते. त्यांना त्यांच्या नाट्यक्षेत्रातील योगदानासाठी कर्नाटक विद्यापीठाने डॉक्टरेटने आणि युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्नियाने डी.लिट. या पदवीने सन्मानित केले होते. गिरीश कर्नाड यांना कालिदास सन्मान पुरस्कार, तन्वीर सन्मान पुरस्कार, नागमंडलसाठी कर्नाटक साहित्य अकादमी पुरस्कार, भूमिका चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पटकथेसाठी राष्ट्रीय पुरस्कार, सर्वोत्कृष्ट चित्रपट कनक पुरंदरसाठी सुवर्ण कमल, ’वंशवृक्ष’साठी उत्तम दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय पुरस्कार, ’संस्कार’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे राष्ट्रपती सुवर्ण पदक, संगीत नाटक अकादमीचा नाट्यलेखनासाठी पुरस्कार, साहित्य अकादमी पुरस्कार, होमी भाभा फेलोशिप असे अनेक सन्मान व पुरस्कार मिळाले होते. 'युनेस्को' तर्फे जागतिक रंगभूमीच्याश राजदूत म्हणून मा.गिरीश कर्नाड यांची निवड झाली होती.
- संजीव वेलणकर, पुणेचित्र-चरित्र