चित्र-चरित्र

मास्टर भगवान
मास्टर भगवान
अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक, स्टुडिओमालक
१ ऑगस्ट १९१३ --- ४ फेब्रुवारी २००२

‘अलबेला मस्ताना’ अशी हिंदी चित्रपट जगतामध्ये ओळख असणार्‍या मास्टर भगवान यांचे भगवान आबाजी पालव हे संपूर्ण नाव. त्यांचे वडील गिरणी कामगार होते. भगवान यांचे शालेय शिक्षण झाल्यावर त्यांच्या वडिलांनी त्यांना गिरणीत नोकरी लावण्याची खटपट सुरू केली. पण शारीरिक व्यायाम करण्याकडे भगवान यांचा कल होता. तसेच बालपणातच त्यांना मा. विठ्ठल यांच्या भूमिका असणारे चित्रपट पाहण्याचा छंद जडला होता. त्या काळात स्टंट चित्रपटातून भूमिका करणार्‍या अभिनेत्यांशी व्यायामशाळेतच त्यांचा परिचय झाला. त्यांत होते वसंतराव पहिलवान आणि बाबूराव पहिलवान. हे त्या वेळेस मूकपटात नाव कमावण्यासाठी धडपडत होते. भगवान यांचे हे वेड, त्यांची शारीरिक ठेवण पाहून वसंतराव पहिलवान यांनी दिग्दर्शक दादा गुंजाळ यांच्याशी त्यांची ओळख करून दिली. त्यांनी भगवान यांना छोटीछोटी काम देण्यास सुरुवात केली.
‘बेवफा आशिक’ या १९३१ सालच्या चित्रपटात भगवानदादांना सर्वप्रथम मोठी भूमिका मिळाली, तीही विनोदी भूमिका. त्यानंतर त्यांनी ‘दैवी खजाना’, ‘जलता जिगर’, ‘प्यारी’, ‘कट्यार’ यासारखे चित्रपट केले. १९३५ सालचा ‘हिम्मते मर्दा’ हा भगवानदादांचा पहिला बोलपट. त्यात त्यांनी बाजी मारली. अभिनयाबरोबरच चित्रपटाचे दिग्दर्शनही त्यांनी केले. या चित्रपटाचे संगीतकार मीर साहेब होते व त्यांचे साहाय्यक म्हणून सी. रामचंद्र काम पाहत. भगवान यांचा पुढला बोलपट होता ‘क्रिमिनल’. हा चित्रपट भरपूर चालला.
भगवानदादांना मद्रासहून दोन चित्रपटांसाठी विचारणा झाली. चित्रपट होते ‘जयकोडी’ आणि ‘वनमोहिनी’. त्या चित्रपटांचे संगीत करण्यासाठी त्यांनी सी. रामचंद्र यांना संधी दिली व त्या दोघांनी तडक मद्रास गाठले. तमिळ भाषेतील हे दोन्ही चित्रपट खूपच लोकप्रिय झाले. मुंबईत आल्यावर भगवानदादांनी एकापाठोपाठ ‘सुखी जीवन’, ‘बदला’, ‘बहादूर दोस्त’, ‘मतवाले’, ‘बहादुर प्रताप’, ‘लालच’, ‘जलन’ यांसारखे चित्रपट काढले. स्वत:च्या मनासारखे चित्रपट काढता यावेत म्हणून त्यांनी ‘जागृती पिक्चर्स’ आणि चेंबूर येथे ‘जागृती स्टुडिओ’ची स्थापना केली. बाळ बेळगावकर हे त्या काळी ‘शृंगार’ नावाचे चित्रपट साप्ताहिक काढत. त्यांच्या मदतीने भगवानदादांनी जागृती स्टुडिओत चित्रपटविषयक लेखन करणार्‍या लेखकांचे एक स्नेहसंमेलन आयोजित केले. त्यात प्रमुख पाहुणे म्हणून सी. रामचंद्र आणि लता मंगेशकर हजर होते. मराठी चित्रपट जगतात अशा तर्‍हेचा सोहळा होण्याचा हा एकमेव प्रसंग होता.
मा. विठ्ठल हे भगवानदादांचा आदर्श. त्या आदर्शाबरोबर काम करण्याची संधी मिळावी म्हणून त्यांनी ‘नगम-ए-सहारा’ या अरेबियन वातावरणावरच्या पोशाखी चित्रपटाची निर्मिती केली. त्यांनी मा. विठ्ठल यांना मोठ्या मानाने बोलावून घेतले आणि चित्रपट तयार केला व कमल टॉकीजमध्ये मोठ्या थाटामाटात चित्रपटाचे प्रदर्शन केले. कमल टॉकीज म्हणजे आजचा अलंकार सिनेमा. चित्रपट निर्माण करून आपल्या गुरूचे ऋण त्यांनी एका तर्‍हेने फेडले.
सी. रामचंद्र हे भगवानदादांच्या चित्रपटांना ‘अण्णासाहेब’ या नावाने संगीत देत. हिंदी चित्रपट जगतात सी. रामचंद्र यांच्या नावाचा फार मोठा दबदबा होता. त्यांनी भगवानदादांना सुचवले की, ‘‘तू आता सामाजिक चित्रपट काढ, त्याला मी ‘सी. रामचंद्र’ या नावाने संगीत देतो.’’ त्यामुळे भगवानदादांनी ‘अलबेला’ची निर्मिती केली. १४ डिसेंबर १९५१ रोजी मुंबईच्या ‘इंपिरियल’ सिनेमामध्ये ‘अलबेला’चे प्रदर्शन झाले व त्याच्या पुढच्या आठवड्यात राज कपूर यांचा ‘आवारा’ २१ डिसेंबर १९५१ रोजी ‘इंपिरियल’च्या समोरच्या ‘ऑपेरा हाऊस’मध्ये झळकला आणि त्यात बाजी मारली ती ‘अलबेला’ने. त्यानंतर भगवानदादांनी ‘झमेला’, ‘रंगीला’, ‘हल्लागुल्ला’, ‘भागम्भाग’, ‘शोला जो भडके’ यांसारखे सामाजिक चित्रपट निर्माण केले. शांतारामबापूंच्या ‘झनक झनक पायल बाजे’, ‘स्त्री’ आणि मद्रासच्या ‘चोरी चोरी’ यांसारखे चित्रपट केले. ‘भगवान नृत्य’ हे त्यांचे वैशिष्ट्य होते.
१९५७ सालच्या राजा ठाकूर यांच्या ‘उतावळा नारद’ या मराठी चित्रपटातून त्यांनी सर्वप्रथम मराठी चित्रपटात काम केले. त्यानंतर अनेक मराठी-हिंदी चित्रपटातून त्यांनी भूमिका केल्या. वृद्धापकाळाने त्यांचे मुंबईत निधन झाले.
- द. भा. सामंत



चित्र-चरित्र