चित्र-चरित्र

मेघराजराजे भोसले
मेघराजराजे भोसले
निर्माते
२५ नोव्हेंबर १९७४

मेघराज राजे भोसले यांचा जन्म बारामतीजवळच्या सणसरचा. भवानीनगर येथे त्यांचं प्राथमिक तसेच माध्यमिक शालेय शिक्षण झाले. पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधून त्यांनी पदवी घेतली. लहानपणापासूनच चित्रपट, नाट्य क्षेत्राची आवड असल्यामुळे ते कला क्षेत्राकडे वळले. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्षपद भूषविणाऱ्या मेघराज राजे भोसले यांनी १९९७ मध्ये ‘पांडव एंटरप्रायजेस’ या चित्रपट निर्मिती संस्थेची स्थापना करून ‘जाऊ तिथे खाऊ’, ‘मास्तर एके मास्तर’, ‘डंक्यावर डंका’, ‘संत वामनभाऊ’ या चार मराठी चित्रपटांची निर्मिती केली. गेल्या दोन दशकांपासून ते सांस्कृतिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. याच संस्थेतर्फे त्यांनी पंधरा मराठी नाटके तसेच वाद्यवृंद कार्यक्रमांचीही निर्मिती केली. खास महिलांसाठी लावणीप्रधान कार्यक्रमाची निर्मिती केली. त्याचे एक हजाराहून अधिक प्रयोग झाले. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षपदाबरोबरच ते बालगंधर्व परिवार, पुणे, ऑल आर्टिस्ट वेल्फेअर असोसिएशन, पुणे, मराठी लोककला, लावणी निर्माता आणि कलाकार संघ, नाट्य निर्माता संघ, पुणे, कलासंस्कृती परिवार, पुणे, सांगाती फाऊंडेशन, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पुणे आदी संस्थांचेही ते अध्यक्ष आहेत. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष या नात्याने चित्रपटसृष्टीच्या हितासाठीचे अनेक उपक्रम त्यांनी वेळोवेळी राबविले.

-मंदार जोशीचित्र-चरित्र