चित्र-चरित्र

सावनी रवींद्र
सावनी रवींद्र
पार्श्वगायिका
२२ जुलै १९८९

सध्याची आघाडीची पार्श्वगायिका म्हणजे सावनी रवींद्र. शास्त्रीय गायक आणि गायक अभिनेता असलेले तिचे वडील डॉ. रविंद्र घांगुर्डे आणि मराठी संगीत नाटकातील गायिका अभिनेत्री डॉ.वंदना घांगुर्डे ह्या मात्यापित्यांकडून तिला बालपणापासून संगीताचे धडे मिळाले. वयाच्या ८ व्या वर्षापासून तिने मराठी सुगम संगीताचे शिक्षण सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक पं. यशवंत देव यांच्याकडून घेण्यास सुरूवात केली. ‘नादब्रह्म’ परिवाराने आयोजित केलेल्या केलेल्या श्री यशवंत देव यांच्या अमृतमहोत्सवी सत्कारप्रसंगी सादर केलेल्या 'देवगाणी' या कार्यक्रमात श्रीमती आशा भोसले यांच्या उपस्थितीत गायन करण्याची संधी तिला मिळाली. या कार्यक्रमातील तिचे गायन ऐकून महाराष्ट्राचे तत्कालीन सांस्कृतिक मंत्री प्रा. रामकृष्ण मोरे यांनी तिची निवड भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या भेटीसाठी पाठविण्यात येणा-या महाराष्ट्राच्या संघात केली. १४ नोव्हेंबर २००२ रोजी सावनीने राष्ट्रपती भवनात राष्ट्रपतींची भेट घेतली. याप्रसंगी यशवंत देवांनी रचलेल्य़ा गीताने आणि सावनीच्या स्वरांनी अवघे राष्ट्रपती भवन भारावून गेले होते! पुण्यामधील फर्ग्युसन महाविद्यालयातून सावनीने आपले शिक्षण घेतले. रवि दाते यांच्याकडे ग़ज़लचे तर तर पं. पंढरीनाथ कोल्हापुरे यांच्याकडून तिने शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले आहे. बीए संस्कृत आणि एमए मराठीपर्यंत तिनं शिक्षण घेतलेले आहे. भारती विश्वविद्यालयातून तिने एमए म्युजिक ही पदवी संपादित केलेली आहे

"होणार सून मी या घरची" या लोकप्रिय मालिकेमध्ये सावनीने गायलेल्या "तू मला,मी तुला गुणगुणू लागलो पांघरु लागलो सावरू लागलो " या गीतामुळे तिचा आवाज घराघरात पोहोचला आहे. या गीताने रसिकांवर भुरळ घातली आहे. २०११ मध्ये संपन्न झालेल्या "आयडीया सा रे ग म पा" कार्यक्रमाच्या अंतिम फेरीतील ५ स्पर्धकांमध्ये सावनीचा समावेश होता.कोकणी भाषेतसद्धा तिने गाणी गायली आहेत.नुकतेच तिने तामिळ गायन क्षेत्रात पदार्पण केले आहे.आतापर्यंत तिने चार तामिळ गाणी गायली आहेत.

`'गझल का सफर', 'ब्लॅक ऍन्ड व्हाईट', 'गुलझार - बात पश्मिने कि' यासारख्या अनेक कार्यक्रमातून तिन आपल्या स्वरांची जादू पसरवली आहे. ब्लॅक ऍन्ड व्हाईट या कार्यक्रमाचे प्रयोग अमेरिका, लंडन, दुबई, अबुधाबी इथंही झाले आहेत.अजय अतुल यांच्या दुबई,अमेरिका याठिकाणी झालेल्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये तिने सहभाग घेतला होता.आतापर्यंत देशात तसेच परदेशात उदा.मस्कत,सिंगापूर,इस्त्राईल,कॅनडा,झिंम्बांबे या देशात तिचे गायनाचे कार्यक्रम झालेले आहेत.
'अजिंठा', 'अजब लग्नाची गजब गोष्ट', 'भैरू पैलवान कि जय','ती रात्र', 'मानसन्मान', 'दांडगी मुलं','पाच नार एक बेजार','नीळकंठ मास्तर','गुरूपौर्णिमा','कुणी घर देता का घर','प्राइम टाइम','पिंडदान','शॉर्टकट','कॅरी ऑन देशपांडे या चित्रपटांसाठी तिनं पार्श्वगायन केलं आहे. संगीताचे कार्यक्रम, चित्रपट या बरोबरच तिचे 'आशाये' हा हिंदी, तर 'अजूनही' आणि 'कॅनव्हास' हे दोन मराठी अल्बम रसिकांच्या पसंतीस उतरले आहेत.

'बार्डो' या मराठी चित्रपटासाठी सावनीला सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेचा पुरस्कार मिळालेला आहे.

-मंदार जोशीचित्र-चरित्र