चित्र-चरित्र

चंद्रशेखर गाडगीळ
चंद्रशेखर गाडगीळ
पार्श्वगायक
२६ जून --- २ ऑक्टोबर २०१४

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रतिभावान पार्श्वगायक म्हणजे चंद्रशेखर गाडगीळ. ‘निसर्गराजा ऐक सांगतो’, ‘कोण होतीस तू काय झालीस तू’ या लोकप्रिय गीतांसह ‘कुदरत’ चित्रपटाच्या शीर्षक गीतामुळे त्यांना मोठी लोकप्रियता मिळाली. लहानपणापासूनच राकट पण तितकाच श्रवणीय आवाज लाभलेल्या चंद्रशेखर गाडगीळ यांचे त्याकाळी बालगंधर्व यांनी भरभरुन कौतुक केले होते. पंडित हृदयनाथ मंगेशकर, यशवंत देव, पंडित गोविंदप्रसाद जयपूरवाले, पंडित मनोहर चिमटे, पंडित सदाशिवराव जाधव यासारख्या दिग्गजांकडे त्यांनी गायनाचे शास्त्रोक्त धडे घेतले होते. ऑर्केस्ट्रा क्षेत्रमध्ये त्यांनी आपल्या गायना कारकीर्दीची सुरुवात केली. एका कार्यक्रमात संगीतकार राम कदम आलेले असताना त्यांनी गाडगीळ यांचा आवाज ऐकून ,चित्रपटात पाश्र्वगायनाची त्यांना संधी दिली. पुढे अनेक हिंदी-मराठी चित्रपटांमधून एकापेक्षाएक सुरेल गाणी सादर करुन कानसेनांना अक्षरश: मंत्रमुगध केले. त्यांचे “कुदरत” चित्रपटातील “सुखदुख की हर एक माला” आणि “अशांती” चित्रपटातील “शक्ती दे मां” ही गीतं आज देखील रसिकांच्या मनात घर करुन आहे. तर मराठीत “निसर्गराजा ऐक सांगतो”, “कोण होतीस तू, काय झालीस तू”, “अजून आठवे ती रात पावसाळी”’, “अरे कोंडला कोंडला देव”, “दूर का तू साजणी”, “जाई ग जाई पांडोबा”, “पांडोबा पोरगी फसली पांडोबा ”, “माणसं रे माणसं”, “देवमानुस देवळात आला”, “अन्‌ हल्लगीच्या तालावर”, “अरूपास पाहे रूपी तोच भाग्यवंत निसर्गात भरूनी राहे अनादि अनंत” ही गाडगीळ यांची आवाजातील गाणी प्रचंड लोकप्रिय ठरली! तसंच ‘अष्टविनायक’ या मराठी चित्रपटातील “अष्टविनायका तुझा महिमा कसा” या गीतातील दोन कडवी गाडगीळ यांनी स्वरबद्ध केली होती. मराठीमध्ये राम कदम तर हिंदीत आर.डी.बर्मन, लक्ष्मीकांत प्यारेलाल, रवींद्र जैन अश्या संगीतकारांबरोबर त्यांनी काम केले आहे. केवळ गायक म्हणूनच नव्हे तर संगीतकार म्हणूनही चंद्रशेखर गाडगीळ यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. हिंदी चित्रपटांमध्ये राजेश खन्ना यांच्यावर चित्रीत झालेल्या अनेक गाण्यांना गाडगीळ यांनी स्वरसाज चढवला आहे. मन्ना डे आणि महमद रफी यांच्या गायनातील सुरांची सर्फा आपल्याही गळ्यात यावी, यासाठी अभिजात संगीताबरोबरच उच्चार आणि शब्दफेक यांचा त्यांनी अभ्यास केला होता. गायिका रश्मीसमवेत त्यांनी “रश्मी ऑर्केस्ट्रा”ची स्थापना केली. पुढे चंद्रशेखर गाडगीळ यांनी ‘स्कूल ऑफ म्युझिक’ या संस्थेची स्थापना केली. युवा संगीतकारांना, गायकांना त्यांनी व्यासपीठ मिळवून दिले. “माणसापरिस मेंढरं बरी” या चित्रपटातील एका गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक म्हणून चंद्रशेखर गाडगीळ यांना राज्य शासनाच्या पुरस्काराने, तर २०१० यावर्षीच्या “राम कदम कलागौरव” पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.
-मंदार जोशी



चित्र-चरित्र